माहीम ते वांद्रे लोकलप्रवास ठरतोय जीवघेणा, मोबाइलचोर करताहेत प्रवाशांवर हल्ला


माहीम ते वांद्रे लोकलप्रवास ठरतोय जीवघेणा, मोबाइलचोर करताहेत प्रवाशांवर हल्ला
SHARES

मोबाइल चोरीच्या वाढत्या प्रमाणामुळे पश्चिम रेल्वेवरील माहीम ते वांद्रे दरम्यानचा प्रवास लोकल प्रवाशांसाठी धोकादायक बनला आहे. गुरूवारी रात्री १०.०५ च्या सुमारास बोरीवली स्लो लोकलमधील एका प्रवाशावर मोबाइल चोरीच्या उद्देशातून जीवघेणा हल्ला झाला. या प्रवाशाचं नाव भूपेंद्र चोणकर (४७) असं आहे. त्यांनी त्वरीत वांद्रे स्थानकावर उतरत अज्ञात चोरांविरोधात तक्रार नोंदवली. 


कसा झाला हल्ला?

मी आॅफीस सुटल्यानंतर परळ रेल्वे स्थानकातून खारला जाण्यासाठी रात्री ९.५५ वाजेची बोरीवली स्लो लोकल पकडली. मोटरमनपासून फर्स्ट क्लासला जोडलेल्या सेकंड क्लासच्या तिसऱ्या डब्यात मी उभा होतो. बसण्यासाठी जागा नसल्याने मी डाव्या बाजूच्या दरवाजाजवळ उभा होतो. माहीम स्थानक सोडल्यानंतर सिग्नल लागल्याने लोकल माहीम खाडीच्या अगोदर येऊन स्लो झाली. 

तेवढ्यात ट्रॅकजवळच लपून बसलेल्या मोबाइल चोराने दरवाजाजवळ उभ्या असलेल्या प्रवाशाच्या हातावर लोखंडी राॅडने जोरदार फटका मारला. नेमकं काय झालंय हे पाहण्यासाठी मी पुढे वाकलो तोच माझ्यावरही या चोराने मोबाइल खाली न पडल्याच्या रागातून राॅडचा फटका मारला. एवढं कमी की काय त्याने दगड उचलून जोरात आत भिरकावला. हा दगड माझ्या डोक्याला लागल्याने माझ्या डोक्याला आणि हाताला जखम झाली, असं भूपेंद्र चोणकर यांनी सांगितलं.



पोलिसांना हवीय फ्लड लाईट्स

त्यानंतर चोणकर यांनी त्वरीत वांद्रे स्थानकात उतरून पोलिसांत तक्रार नोंदवली. दरम्यान त्यांच्यावर भाभा रुग्णालयात उपचार करण्यात आले. महत्त्वाचं म्हणजे ज्या वेळेस ही घटना घडली, त्याच सुमारास वांद्रे रेल्वे पोलिसांची तेथे गस्त सुरू होती. तरीही मोबाइल चोरांनी हा प्रकार केला. माहीम ते वांद्रे दरम्यान दाट अंधार असून खाडीलगतच्या झाडीत मोबाइल चोर लपून बसतात आणि अंधाराचा फायदा घेत प्रवाशांवर हल्ला करून जवळच्या झोपडपट्टीत पळून जातात.

एवढंच नव्हे, तर हे चोर पोलिसांवरही दगडफेक करत असल्याचं वांद्रे रेल्वे पोलिसांनी सांगितलं. आम्ही अनेकदा या परिसरात फ्लड लाईट्स लावण्याची मागणी रेल्वे प्रशासनाकडे केली आहे. परंतु ते या मागणीकडे दुर्लक्ष करतात. त्यामुळे जोपर्यंत येथे फ्लड लाईट्स लागत नाही, तोपर्यंत असे प्रकार घडतच राहतील, असंही त्यांनी स्पष्ट केलं.     


मुलुंडमध्येही अशीच घटना

याचप्रमाणे, लोकलच्या दारात उभ्या असलेल्या प्रवाशांना मारुन त्यांच्याकडील मोबाइल हिसकावून पळ काढणाऱ्या तिघा चोरांना मध्य रेल्वे पोलिसांनी रेल्वे पोलिसांनी अटक केली आहे. कुणाल जगताप, कुणाल झांझोड ऊर्फ वाल्मिकी, चेतन ऊर्फ ऋतिक मच्छारे अशी त्यांची नावे आहेत.

हे तिघे आरोपी मुलुंड ते ठाणे दरम्यान लोकलमधील दारात उभ्या असलेल्या प्रवाशांना मारुन त्यांच्या हातातील मोबाइल हिसकावत होते. हा समिषा मार्कंडे यांनी पोलिसांत तक्रार नोंदवल्यावर पोलिसांनी त्वरीत कारवाई करून चोरांना अटक केली. 



नेमका प्रकार काय ?

समिषा मार्कंडे (३६) २७ ऑक्टोबरला लोकलच्या दारात उभ्या होत्या. तेव्हा रेल्वे ट्रॅकवरच्या पोलवर उभं राहून दोघांनी समिषा यांच्या हातावर फटका मारला. या जोरदार फटक्याने त्यांच्या हातातील ६२ हजार ५०० रुपयांचा मोबाइल खाली पडला. त्यानंतर चोरांनी हा मोबाइल उचलून पळ काढला. समिषा यांनी याप्रकरणी तत्काळ ठाणे पोलिसांकडे तक्रार दाखल केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करत तिघांना अटक केली.

या तिघांकडून चोरलेले १८ मोबाईल जप्त करण्यात आले आहेत.  या तिघांनीही गुन्ह्याची कबुली दिली असून, चोरीचे मोबाइल कुठे-कठे विकले? याचीही माहिती दिली आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा