अखेर सापडलेच! परमबीर सिंग लवकरच मुंबईत परतणार

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांचा पत्ता अखेर लागला आहे.

अखेर सापडलेच! परमबीर सिंग लवकरच मुंबईत परतणार
SHARES

मुंबईचे माजी पोलीस आयुक्त आणि वरिष्ठ आयपीएस अधिकारी परमबीर सिंग यांचा पत्ता अखेर लागला आहे. परमबीर हे सध्या चंदिगड इथं असल्याचे वृत्त 'टाइम्स नाऊ' वृत्तवाहिनीने दिले आहे. परमबीर सिंग यांना मुंबईतील कोर्टाने फरार घोषित केले आहे. दरम्यान, परमबीर देश सोडून गेल्याचं व सध्या बेल्जियम इथं असल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता परमबीर सिंग यांचा पत्ता लागल्यानं हे दावे खोटे ठरले आहेत.

परमबीर सिंग यांना मुंबईतील कोर्टाने फरार घोषित केले आहे. गोरेगावमधील एका खंडणीवसुलीच्या प्रकरणात परमबीर यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल असून क्राइम ब्रांचने कोर्टात विनंती केली असता परमबीर यांना फरार घोषित करण्यात आले. त्यांच्या जुहू येथील फ्लॅटच्या दरवाजावर याबाबतच्या आदेशाची प्रत चिटकवण्यात आली आहे.

परमबीर यांना ३० दिवसांत हजर राहण्यास सांगण्यात आलं असून ते हजर झाले नाहीत तर त्यांची संपत्ती जप्त करण्याची प्रक्रिया सुरू केली जाणार आहे. या पार्श्वभूमीवर गेल्या २३१ दिवसांपासून नॉट रिचेबल असलेल्या परमबीर सिंग यांचा फोन सुरू झाला असून त्यांच्याशी संपर्कही झाला आहे.

परमबीर हे भारताबाहेर नाहीत तर सध्या भारतातच आहेत. त्यांचा मुक्काम चंदिगड येथे असल्याचे स्पष्ट झाले आहे. टाइम्स नाऊने परमबीर यांच्याशी आज संपर्क साधला. यावेळी आपण लवकरच मुंबईत परतणार असल्याचे त्यांनी सांगितले. कोर्टाच्या आदेशाचे मी पालन करणार आहे. मी पोलिसांच्या तपासाला पूर्ण सहकार्य करणार असल्याचेही त्यांनी सांगितले.

परमबीर यांच्याविरुद्ध मुंबई आणि ठाण्यात विविध पाच गुन्हे दाखल आहेत. त्यात खंडणीवसुलीसह अनेक गंभीर आरोप त्यांच्यावर आहेत. त्यामुळे अटकेची टांगती तलवार असली तरी सुप्रीम कोर्टाकडून त्यांना अटकेपासून अंतरिम संरक्षण मिळाले आहे. परमबीर यांच्याविरुद्ध दाखल गुन्ह्यात अटकेची कारवाई तूर्त करण्यात येऊ नये, असे कोर्टाने सोमवारी एका आदेशात नमूद केले आहे.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा