चौकशी आयोगासमोर गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट, परमबीर सिंह यांना इशारा

परमबीर सिंग यांना आयोगाने चौकशीसाठी चौथ्यांदा सुनावणीची तारीख दिली होती मात्र ते हजर राहिले नाहीत.

चौकशी आयोगासमोर गैरहजर राहिल्यास अटक वॉरंट, परमबीर सिंह यांना इशारा
SHARES

राज्याचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावरील भ्रष्टाचाराच्या आरोपांची चौकशी करणार्‍या चांदिवाल आयोगासमोर मुंबईचे माजी पोलीस आयुक्त  परमबीर सिंह सातत्यानं गैरहजर राहत आहे. आयोगानं सोमवारी यावर तीव्र नाराजी व्यक्त केली.  7 सप्टेंबरला होणाऱ्या सुनावणीलाही जर ते गैरहजर राहिले तर त्यांच्याविरोधात वॉरंट जारी केले जाईल, अशी तंबी चांदिवाल आयोगानं दिली आहे.

पोलीस दलातून निलंबीत करण्यात आलेले पो. निरिक्षक सचिन वाझे यांना ऍंन्टालिया स्फोटक प्रकरण आणि मनसुख हिरेन हत्या प्रकरणात सध्या केंद्रीय पोलीसांच्या ताब्यात आहेत. त्यांचाही जबाब न्यायालयीन आयोगाने नोंदवून घेतला आहे. परमबीर सिंग यांना आयोगाने चौकशीसाठी चौथ्यांदा सुनावणीची तारीख दिली होती मात्र ते हजर राहिले नाहीत.

मुंबई उच्च न्यायालयान या प्रकरणी दाखल झालेल्या याचिकेची दखल घेत सीबीआय चौकशीचे आदेश दिले होते. तर राज्य सरकारनंही या आरोपांची समांतर न्यायालयीन चौकशी करण्यासाठी मुंबई उच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायमूर्ती चांदिवाल यांच्या अध्यक्षतेखाली चौकशी आयोगामार्फत सुरू केली आहे. या चौकशी आयोगानं  परमबीर सिंह यांना याप्रकरणी आपलं प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे निर्देश दिले आहेत. 

प्रतिज्ञापत्र सादर न करता परमबीर सिंह चौकशीला सातत्याने गैरहजर राहिले आहेत. याची दखल घेत आयोगानं सुरूवातीला जून महिन्यात परमबीर यांना 5 हजारांचा, 19 ऑगस्टला 25 हजाराचा आणि  25 ऑगस्टला पुन्हा 25 हजाराचा दंड ठोठावला आहे. दंडाची ही रक्कम मुख्यमंत्री कोविड मदतनिधीत जमा करण्याचे निर्देश देत 30 ऑगस्टला सुनावणी निश्‍चित केली होती. मात्र या सुनावणीलाही परमबीर सिंह गैरहजर राहिल्यानं आयोगानं संताप व्यक्त केला. तसेच पुढील सुनावणीला जर गैरहजर राहिल्यास वॉरंट जारी केला जाईल, अशी तंबी देत सुनावणी 7 सप्टेंबरपर्यंत तहकूब केली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा