भंगारातल्या गाड्या चकाचक करून विकायचा, पोलिसांनी केलं गजाआड


भंगारातल्या गाड्या चकाचक करून विकायचा, पोलिसांनी केलं गजाआड
SHARES

चोरीचा माल खपवण्यासाठी अाणि अापण पकडले जाऊ नये, यासाठी अट्टल चोर काय-काय शक्कल लढवतील, याचा नेम नाही. भंगारातील गाड्या कमी किंमतीत विकत घ्यायचा अाणि त्याचा चेसी नंबर चोरीच्या गाड्यांना लावायचा अाणि या वाहनांची विक्री हजारो रुपयांना करायची, हा जणू नासीर सद्दन खान याचा धंदाच बनला होता. पण पंतनगर पोलिसांनी अशी कृत्ये करणाऱ्या टोळीचा पर्दाफाश केला अाहे. या अारोपींकडून पोलिसांनी १८ दुचाकींसह दोन कार जप्त केल्या अाहेत. या टोळीने शेकडो दुचाकी चोरून विकल्याचा पोलिसांना संशय अाहे.

नासीरने अाखली भन्नाट कल्पना

विक्रोळीच्या पार्कसाईट पोलीस ठाणे परिसरात राहणारा नासीर सद्दन खान (५०) हा पूर्वी  दुचाकी गॅरेजमध्ये कामाला होता. त्यामुळे दुचाकी वाहनांबद्दल त्याला चांगलीच माहिती झाली होती. रस्त्यावरील दुचाकी चोरून तो त्यांची बनावट कागदपत्रे बनवून विक्री करायचा. त्यामुळे अनेक वेळा त्याला जेलची हवा खावी लागली. अनेकदा पोलिसांच्या जाळयात अडकल्याने त्याने पोलिसांपासून वाचण्यासाठी एक नवीन कल्पना आखली होती. भंगारामध्ये निघणाऱ्या दुचाकी तो दोन ते पाच हजारांमध्ये कागदपत्रांसह ग्राहकांकडून खरेदी करायचा.


मुंबई, नवी मुंबईतून दुचाकी चोरल्या

विकत घेतलेल्या दुचाकीसारखंच दुसरं वाहन हेरून त्याची चोरी करायची. आपल्या गॅरेजमध्ये चोरलेली दुचाकी आणून तिचा इंजिन नंबर तो मिटवून टाकायचा. त्यानंतर भंगारातील दुचाकीचा इंजिन नंबर आणि नंबर प्लेट चोरलेल्या दुचाकीवर टाकायचा अाणि ती दुचाकी २५ ते ३० हजारांना विकायची, हा त्याचा नित्यक्रम बनला होता. यासाठी त्याने लोखंडावर नंबर टाकण्याचा साचाही बनवून घेतला होता. अशाच प्रकारे त्याने मुंबईसह नवीमुंबई आणि ठाणे परिसरातून अनेक दुचाकी चोरल्या आहेत.

अखेर चोरी पकडली गेली

नासीरच्या या क्लुप्तीची माहिती पोलिसांना मिळाली. अखेर एका दुचाकी चोरीच्या प्रकरणात पोलिसांनी नासीरला ताब्यात घेतले. चौकशी केल्यानंतर त्याने गुन्ह्यांची कबुली दिली. पोलिसांनी त्याच्याकडून १८ दुचाकी अाणि दोन चारचाकी वाहने जप्त केली अाहेत. २०१५ मध्येही वाहनचोरीच्या गुन्ह्यांत पवई पोलिसांनी त्याला अटक केली होती. त्यावेळी त्याच्याकडून २८ दुचाकी हस्तगत केल्याची माहिती झोन-७चे उपायुक्त अखिलेशकुमार सिंह यांनी दिली.

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा