सराईत गुन्हेगाराला अखेर बेड्या

 Pali Hill
सराईत गुन्हेगाराला अखेर बेड्या

वांद्रे - तुमच्या गाडीतून धूर येतोय, तुमची गाडी खराब असून पुढे जाऊन तुमची गाडी बंद पडणार असा बनाव करून कार चालकांना गंडवणाऱ्या एका सराईत गुन्हेगाराला वांद्रे पोलिसांनी अटक केलीय. ईद ए मिलादच्या दिवशी आरिफ गौस मोईनुद्दीन शेख हा आरोपी माहिम दर्ग्यात दर्शनासाठी येणार असल्याची माहिती पोलिसांना मिळाली आणि त्याला माहिम दर्ग्यातून पोलिसांनी अटक केली. आरिफ शेख हा स्वत:ला गॅरेजचा मालक म्हणत असला तरी तो एक सराईत गुन्हेगार आहे. आपल्या गॅरेजच्या नावाखाली तो लोकांना फसवतं असे. गाडीतून धूर येतोय, गाडी खराब आहे असा बनाव करून तो कार चालकांना आपल्या गॅरेजमध्ये नेत असे, त्यानंतर गाडीतील काही पार्ट खराब असून, ते बदलण्याच्या नावाखाली तो त्यांच्याकडून हजारो रुपये उकळत असे. प्रत्यक्षात हा आरिफ शेख जुनेच पार्ट पॉलिश करून ते बसवत असे. 2015 साली वांद्रे परिसरात या आरिफनं एका आयएएस ऑफिसरला अशाच प्रकारे फसवलं होतं. याबाबत या ऑफिसरनं थेट मुंबई पोलीस आयुक्तांना तक्रार केली होती. याचा शोध घेण्याचा पोलिसांनी अनेकदा प्रयत्न केला मात्र पोलिसांना यश येत नव्हतं. अखेर ईद-ए-मिलादच्या दिवशी हा माहिम दर्ग्यात येणार असल्याची खबर पोलिसांना मिळाली आणि पोलिसांनी त्याला बेड्या ठोकल्या.

Loading Comments