गेट वे वरील प्रवासी बोटींवर चोरीचे डिझेल : तिघांना अटक


गेट वे वरील प्रवासी बोटींवर चोरीचे डिझेल : तिघांना अटक
SHARES

मुंबईतील तेल माफिया राजू पंडित याच्या मुसक्या पोर्ट झोन पोलिसांनी आवळल्यानंतर चोरीचे पेट्रोल आणि डिझेलची खरेदी करणाऱ्यांवरही कारवाईचा बडगा उभारला आहे. मुंबईच्या गेट वे येथील प्रवासी बोटीतील तिघांना पोलिसांनी चोरीचे तेल खरेदी करताना अटक केली असून दोन बोटी हस्तगत केल्या आहेत.

 

पोलिसांनी गस्त वाढवली

मुंबई शहरापासून काही अंतरावर असलेल्या प्राचिन एलिफंटा लेणी पाहण्याबरोबरच समुद्राचा फेर फटका मारण्यासाठी नागरिक मोठ्या प्रमाणात गेट वे जवळ येतात. गेट वेवरून बोटीतून प्रवास हा सर्वच प्रवाशांच्या आकर्षणाचा केंद्र. मात्र देशातील इंधन दरवाढीमुळे बोट चालक चिंतेत असल्यानं त्यांनी समुद्रातील तेल तस्करांकडून तेलाची खरेदी करण्यास सुरुवात केल्याची माहिती पोर्ट झोन पोलिसांना मिळाली. त्यानुसार पोलिसांनी समुद्र परिसरात गस्ती वाढवली होती.


पोलिसांच्या कारवाईत...

१५ सप्टेंबर रोजी पोलिस रात्रीच्या वेळी गस्त घालत असताना भाऊचा धक्का येथून काही अंतरावर खारफुटीत दोन प्रवासी बोटी संशयास्पद उभ्या दिसल्या, यातील एका बोटीचे नाव हे एम. एल. सराह आणि दुसरीचे ओशियन स्टार होतं. पोलिसांनी दोन्ही बोटींची झडती घेतली असता या बोटीवर सल्लाउद्दीन शेख(३०), जहीरूल इस्लाम (२५), अर्जुन पारधी (५०) हे तिघे होते. यातील एका बोटीत २४५ लिटर डिझेल होते. तर दुसऱ्या बोटीत १६० लिटर डिझेल होतं.


तिघांना अटक

या डिझेल खरेदीची आरोपींकडे कोणतीही अधिकृत माहिती नव्हती. चौकशी केली असता त्यांनी हे डिझेल तेल माफिंयांकडून अर्ध्या किंमतीत खरेदी केलं होतं. या प्रकरणी पोलिसांनी तिघांवर गुन्हा नोंदवत त्यांना अटक केली आहे. पोलिस प्रवासी बोटींना डिझेल पुरवणाऱ्या मुख्य आरोपीचा शोध घेत असल्याचं पोर्ट झोन पोलिसांनी सांगितलं.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा