गोवंडीत टवाळखोरांकडून पून्हा पोलिसांवर हल्ला


गोवंडीत टवाळखोरांकडून पून्हा पोलिसांवर हल्ला
SHARES

देशात कोरोनाचे थैमान दिवसेंदिवस वाढत असून त्यामध्ये महाराष्ट्रातील कोरोना बाधितांचा आकडा सर्वाधिक आहे. तरी ही अनावश्यक रित्या घराबाहेर पडणाऱ्यांची संख्या कमी होताना दिसत नाही. पोलिस आणि सरकारकडून वारंवार घराबाहेर न पडण्याचे आवाहन करून सुद्धा काही ठिकाणी नियमांचे उल्लघंन केले जात आहे. परिणामी आता पोलिसांनी अशा बेजबाबदार लोकांवर गुन्हे नोंदवण्यास सुरूवात केली आहे. गोवंडीत नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवरच ६ टवाळखोरांनी दगडफेक केल्याचे पुढे आले आहे. 

 

 

मुंबईत कोरोनाच्या पाश्वभूमीवर संचार बंदी असताना नागरिकांना घराबाहेर न पडण्याचे आवाहन करण्यासाठी गेलेल्या पोलिसांवर धारावीत काही जणांनी दगडफेक केली. या घटनेत पोलिसांनी ९ जणांवर गुन्हे नोंदवले असून दोघांना अटक केली आहे. ही घटना घडून २४ तास उलटत नाही, तोच गोवंडीत पून्हा पोलिसांवर हल्ला झाल्याचे पुढे आले आहे. गोवंडीच्या शिवाजी नगर परिसरात काही जण अनावश्यक रित्या फिरत होते. त्यामुळे या लोकांना पोलिसांनी घरी जाण्यास सांगितले असता त्यांनी संताप व्यक्त करत पोलिसांना शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. पोलिसांची संख्या कमी असल्याचे पाहून या टवाळखोरांनी पोलिसांना धक्काबुक्की करण्यास सुरूवात केली. अखेर पोलिसांनी वाढीव कूमक बोलवल्यानंतर या टवाळखोरांनी तेथून पळ काढला. त्यावेळी पोलिसांना दोन आरोपींना पकडण्यात यश आले आहे. या टवाळखोरांवर  पोलिसांनी गुन्हे दाखल केले असून इतर आरोपींचा शोध सुरू आहे.  

 

दरम्यान, पोलीस कर्मचारी, डॉक्टर्स, नर्स किंवा अन्य वैद्यकिय कर्मचारी कोरोनाच्या विरोधात लढण्यासाठी दिवसरात्र काम करत आहेत. परंतु आता कोरोनाच्या पार्श्वभुमीवर बेजबाबदारपणे वागणाऱ्यांच्या आणि नियम मोडणाऱ्यांची आता खैर नाही असा इशारा महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी नागरिकांना दिला आहे. तसेच कोरोनापासून स्वत:ला वाचवायचे असेल तर 'होम क्वारंटाईन' अथवा 'हॉस्पिटल क्वारंटाईन' असे दोनच पर्याय उपलब्ध आहेत, त्यामुळे स्वत:चे आणि स्वत:च्या कुटूंबाचे संरक्षण करायचे असेल तर घरात बसा असे आवाहन अजित पवार यांनी केले आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा