मुंबईत खंडणीप्रकरणात दाऊद इब्राहिम, छोटा शकीलचा हात


मुंबईत खंडणीप्रकरणात दाऊद इब्राहिम, छोटा शकीलचा हात
SHARES

वांद्र्यातील सामाजिक कार्यकर्त्या महिलेला खंडणीसाठी सोशल मीडियावरून जीवे मारण्याची धमकी दिल्याची माहिती पोलिस चौकशीतून पुढे आली आहे. याप्रकरणी खंडणी विरोधी पथकाने पंजाबच्या एका शार्पशूटरला अँटॉप हिल येथून शनिवारी अटक केली आहे. पोलिसांनी यापूर्वी हरीष कुमार यादव आणि बिलाल शमसी या दोघांना अटक केली होती. या प्रकरणामध्ये कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा शकील आणि अन्य दोघांचाही शोध सुरू आहे. न्यायालयाने शनिवारी अटक केलेल्या आरोपी जसबीस सिंग संतोष सिंग याला ३० जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.


काय आहे संपूर्ण प्रकार?

वांद्रे परिसरात एका नामांकित संस्थेच्या संचालिका असलेल्या महिलेस मागील अनेक दिवसांपासून दाऊद आणि छोटा शकीलचे हस्तक हरिष कुमार यादव (३०) आणि बिलाल कुतुबुद्दीन शमसी हे १ कोटी रुपयांची खंडणी मागत होते. याबाबत नोव्हेंबर महिन्यात पीडित महिलेनं खार पोलिस ठाण्यात तक्रार नोंदवली होती. हा गुन्हा पुढे अधिक तपासासाठी मुंबई पोलिसांच्या खंडणी विरोधी पथकाकडे सुपूर्द करण्यात आला. याप्रकरणी मुंबई पोलिसांनी हरीष कुमार यादव आणि बिलाल शमसी या दोघा आरोपींना अटक केली. दोघांच्या चौकशीतून मुख्य सूत्रधार ललित शर्मा आणि कुख्यात अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिम, छोटा शकील, फहीम मचमच, उस्मान चौधरी यांची नावं पुढे आली. तर ललितने या हत्येची सुपारी पंजाबचा शार्पशूटर जसबीर सिंगला दिली होती.


पत्नीविरोधातच रचला कट

आरोपी हरीषने पोलिसांना दिलेल्या कबुलीनुसार, त्याचे ललितच्या पत्नीशी संबध होते. यावरून ललित आपल्याला वारंवार धमकावत होता. ललितच्याच सांगण्यावरून आपण त्याच्या फोनवरून तक्रारदार महिलेस पैशांसाठी धमकावल्याची कबुली हरीषने पोलिसांसमोर दिली. या प्रकरणात यापूर्वी अटक झालेल्या हरिषला न्यायालयाने १७ जानेवारीपर्यंत, तर बिलाल शमसीला २३ जानेवारीपर्यंत पोलिस कोठडी सुनावली होती.


असा रचला कट

बिलालने दिलेल्या कबुलीनुसार, ललितने या हत्येची सुपारी जगबीर सिंग संतोष सिंगला दिली होती. मूळचा पंजाबच्या अमृतसरचा असलेला जगबीर हा सामाजिक कार्यकर्त्या महिलेला मारण्यासाठी मुंबईत दाखलही झाला होता. ललितने जगबीरची मुंबईच्या अँटॉप हिल परिसरातील गुरूद्वारा परिसरात राहण्याची व्यवस्था केली होती. मात्र, वेळीच सर्व कटाची माहिती पोलिसांना मिळाली. शनिवारी जगबीर अँटॉप हिल येथे लपून बसल्याची माहिती शमसीने दिल्यानंतर पोलिसांनी जगबीरला अटक केली. जगबीरच्या चौकशीत तो फार पूर्वीपासून ललितच्या संपर्कात असल्याचं समोर आलं. याचाच फायदा उठवत ललितने तक्रारदार सामाजिक कार्यकर्त्या महिलेची सुपारी जगबीरला सोशल मीडियाच्या माध्यमातून दिली होती. व्हॉट्स अॅपवर त्या महिलेचे आणि तिच्या कारचे फोटोही ललितने जगबीरला पाठवले होते. ललितच्या फेसबुक फ्रेंडलिस्टमध्येही जगबीर असून दोघांमधील काही संशयास्पद संभाषणही पोलिसांनी हस्तगत केले आहे. या हत्येसाठी जगबीरला काही लाख रुपये दिले जाणार होते. त्यानुसार त्या सामाजिक कार्यकर्ता महिलेवर जगबीर दोन दिवस पाळत ठेवून असल्याची कबुलीही त्याने पोलिसांना दिली.


आरोपींची पार्श्वभूमी

ललित शर्मावर विविध पोलिस ठाण्यात ५ गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. ललित हा वांद्र्यात राहणाऱ्या बिलालच्या संपर्कात असल्यानं पोलिसांनी बिलालला चौकशीसाठी ताब्यात घेतलं. चौकशीत आरोपी बिलाल शमसी याचा सहभाग आढळून आल्यानं पोलिसांनी त्याला अटक केली. बिलालवर पायधुनी आणि वांद्रे पोलिस ठाण्यात खंडणी, जीवे मारण्याची धमकी अशा गंभीर गुन्ह्यांची नोंद आहे. तर बिलाल दाऊद आणि छोटा शकील टोळीशी संलग्न असल्याबाबत गुन्ह्यांची नोंद आहे. बिलाल परदेशात असलेल्या अनेकांच्या संपर्कात असल्याचंही निदर्शनास आलं आहे. या सर्व प्रकरणामागे बिलालचा हात असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.


Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा