Advertisement

महापालिका शाळांमध्ये संगीतासह नृत्याचेही धडे


महापालिका शाळांमध्ये संगीतासह नृत्याचेही धडे
SHARES

मुंबईतील महापालिकेच्या शाळांमधील मुलांना दर्जेदार शिक्षण देतानाच त्यांना संगीतासह नृत्याचे धडे व्यापक प्रमाणात देण्याचा निर्णय प्रशासनाने घेतला आहे. हिंदुस्थानी शास्त्रीय संगीत पद्धतीनुसार गायन आणि वादन याचे प्रशिक्षण महापालिका शाळांमधील मुलांना मिळणारच आहे, याशिवाय कथ्थक, भरतनाट्यम आणि मोहिनीअट्टम या तीन नृत्य शैलींचंदेखील प्रशिक्षण दिलं जाणार आहे. यासाठी महापालिकेच्या सात परिमंडळांमध्ये प्रत्येकी एक संगीत अकादमी केंद्रे सुरु करण्यात आली आहेत.


महापालिका आयुक्तांची घोषणा

मनपा शाळांमधील विद्यार्थ्यांच्या कला गुणांची जोपासना होऊन विद्यार्थ्यांचा सर्वांगिण विकास व्हावा, या उद्देशाने मनपा शाळांतील विद्यार्थ्यांसाठी परिमंडळनिहाय संगीत अकादमी केंद्रे करण्याची घोषणा महापालिका आयुक्त अजोय मेहता अर्थसंकल्पीय भाषणात केली होती.

महापालिकेच्या सर्व ७ परिमंडळांमध्ये प्रत्येकी १ याप्रमाणे ७ संगीत अकादमी केंद्रं नुकतीच सुरू करण्यात आली असल्याची माहिती शिक्षणाधिकारी महेश पालकर यांनी दिली आहे.

या प्रत्येक केंद्रात किमान २५ विद्यार्थ्यांना त्यांच्या कलानुसार संबंधित कलेतील प्रशिक्षण आणि मार्गदर्शन तज्ज्ञ गुरुंद्वारे दिलं जाणार असल्याचे महेश पालकर यांनी स्पष्ट केलं. ही केंद्रे भायखळा, परळ, सांताक्रूज, मालाड, चेंबूर, मुलुंड व कांदिवली येथे सुरु करण्यात आली आहेत.


विद्यार्थ्यांचा कल पाहून देणार धडे

संगीत अकादमी केंद्रांमध्ये ८७ संगीत शिक्षकांद्वारे गायन, वादन व नृत्य इत्यादींचे प्रशिक्षण देणार आहेत. या प्रत्येक केंद्रामध्ये किमान २५ विद्यार्थी दाखल होतील, अशी अपेक्षा आहे. या विद्यार्थ्यांना सुरुवातीला गाणी, कविता इत्यादी 'लाईट म्युझिक' प्रकारातील प्रशिक्षण दिलं जाणार आहे. त्यानंतर विद्यार्थ्यांचा कल पाहून त्यांना हिंदुस्थानी शास्त्रीय संगीतानुरुप धडे दिले जाणार आहेत.


दोन तासांचं प्रशिक्षण

विद्यार्थ्यांना दर आठवड्यातून किमान दोन वेळा प्रत्येकी २ - २ तासांचे प्रशिक्षण दिले जाणार आहे. इच्छुक विद्यार्थ्यांनी किंवा त्यांच्या पालकांनी त्यांच्या शाळेतील संगीत शिक्षक किंवा मुख्याध्यापक यांच्याशी संपर्क साधावा, असे आवाहन मनपा संगीत अकादमीच्या (संगीत विभाग) प्राचार्या सुवर्णा घैसास यांनी केले आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा