Advertisement

मराठी भाषा विभागच चौदाखडी विसरला, सेल्फी पॉईंटवरून 'अॅ', 'ऑ' गायब!


मराठी भाषा विभागच चौदाखडी विसरला, सेल्फी पॉईंटवरून 'अॅ', 'ऑ' गायब!
SHARES

आतापर्यंत मुलांना शाळेत बाराखडी शिकवली जात होती. पण मराठी शब्दोच्चारात मुलांना येणारी अडचण लक्षात घेऊन महाराष्ट्र विद्या प्राधिकरणाने बाराखडीत 'अॅ' आणि 'ऑ' या दोन अक्षरांची भर घातली. त्यामुळे मराठी भाषेची बाराखडी आता चौदाखडी झाली आहे. पण खुद्द मराठी भाषा विभागालाच स्वतःच्या धोरणांचा विसर पडला की हे त्यांचे अज्ञान म्हणावे? असा प्रश्न पडला आहे. कारण मंत्रालयातील प्रांगणात असलेल्या सेल्फी पॉईंटवर स्वरांमध्ये नव्याने आलेले 'अॅ' आणि 'ऑ' हे २ स्वर कुठे दिसलेच नाहीत.


प्रशासनाचा ढिसाळ कारभार

भाषा संवर्धन आठवड्याच्या निमित्ताने मराठी भाषा विभागातर्फे मंत्रालयात ग्रंथप्रदर्शन भरवण्यात आलं होतं. यावेळी तिथला सेल्फी पॉईंट सर्वांच्या आकर्षणाचा केंद्रबिंदू ठरला. कारण त्या सेल्फी पॉईंटवर असलेल्या स्वरांमध्ये नव्याने आलेले 'अॅ' आणि 'ऑ' आणि हे २ स्वरच दिसले नाहीत!

मराठी भाषा विभागामध्ये या संदर्भात विचारणा केली असता तो सेल्फी पॉईंट जे जे स्कूल ऑफ आर्ट्सच्या विद्यार्थ्यांकडून तयार करण्यात आला होता, असं सांगून आपली जबाबदारी झटकण्याचा प्रयत्न केला गेला. विशेष म्हणजे हा सेल्फी पॉईंट मंत्रालयात आहे. इतक्या कर्मचारी आणि अधिकाऱ्यांनी तिथे सेल्फी काढले, मात्र आक्षेप कुणीही घेतला नाही किंवा विचारणाही केली नाही.


प्रशासनाला याबाबत काही पडलेले नाही. त्यांना यात कोणताही इंटरेस्ट नसल्याने तेथील अधिकाऱ्यांनी त्याकडे लक्ष दिले नसावे. मराठी भाषेविषयी शासनाचे धोरण अतिशय ढिसाळपणाचे आहे. खुद्द धोरण बनवणाऱ्यांनाच ते माहीत नसेल, तर सामान्यांना त्याबद्दल न विचारणेच योग्य. दिव्याखाली अंधार असल्यानंतर कुठे प्रकाश पडला? हे विचारण्यात अर्थ नाही हेच खरं.

प्रकाश परब, मराठी भाषा सल्लागार समिती


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा