कॅन्सर आणि ब्रेन ट्युमरला मात देत त्याने मिळवले 78.60 टक्के!

Mumbai
कॅन्सर आणि ब्रेन ट्युमरला मात देत त्याने मिळवले 78.60 टक्के!
कॅन्सर आणि ब्रेन ट्युमरला मात देत त्याने मिळवले 78.60 टक्के!
See all
मुंबई  -  

कॅन्सरचं नुसतं नाव जरी ऐकलं तरी अंगाचा थरकाप हाेतो. हा जीवघेणा आजार जडला की कॅन्सरग्रस्त असह्य होणाऱ्या वेदना अन् तितक्याच वेदनादायी उपचारांमुळे जीवन-मरणाच्या परीक्षेत जगण्याची उमेदच हरवून बसतात. मग ज्याला कॅन्सरसोबतच ब्रेन ट्युमरही झालाय, अशी व्यक्ती किती त्रासातून गेली असेल, याची कल्पनाही करवत नाही. मात्र डोंबिवलीत राहणाऱ्या किशोरवयीन सागर परमारने ब्रेन ट्युमरसहित कॅन्सरवर एकदा नव्हे, तीनदा मात तर केलीच, पण दहावीच्या परीक्षेत 78.60 टक्के मिळवून कॅन्सरग्रस्तांना जगण्याचा नवा मूलमंत्रही दिला आहे.

सागरला 2012 मध्ये हाडांचा कॅन्सर झाला होता. उपचारानंतर सागर वर्षभर ठीक होता. पण, कॅन्सर हा आजार असा आहे की, तो सहजासहजी पाठ सोडत नाही. 2014 मध्ये या आजाराने सागरला पुन्हा जखडले. तीव्र औषधांचा मारा आणि शरीराची खालावलेली अवस्था यातून बाहेर पडत असतानाच त्याला 2016 मध्ये ब्रेन ट्यूमर झाल्याचं डॉक्टरांनी सांगितलं.

सागरच्या जागी दुसरी कुठलीही व्यक्ती असती, तरी जीवन संघर्षात हार मानून ती शेवटच्या घटका मोजत बसली असती. पण अशाही परिस्थितीत सागर खचला नाही. कारण त्याला द्यायची होती दहावीची परीक्षा. डोंबिवलीच्या आयईएस चंद्रकांत पाटकर या विद्यालयात शिकणाऱ्या सागरनं इतर सामान्य मुलांप्रमाणेच यशस्वी करिअरची स्वप्न बघितली होती. ही स्वप्न पूर्ण करण्यातला महत्त्वाचा टप्पा म्हणजे दहावी. सागरनं मोठ्या धाडसानं दहावीच्या परीक्षेची तयारी सुरू केली. सागरच्या या मेहनतीत आणि जीवन संघर्षात त्याच्या शिक्षकांनीही मोलाची साथ दिली.

परीक्षेच्या काळात प्रत्येक विद्यार्थी एकाग्र चित्ताने अभ्यास करण्यात गुंतलेला असताना सागरला उपचारांचे अग्निदिव्यही पार करायचे होते. आयुष्याची ही तारेवरची कसरत करताना सागर पेपर देऊन रोज रेडिएशन घेण्यासाठी टाटा रुग्णालयात जायचा. तर दुसऱ्या बाजूला त्याच्या तल्लख बुद्धीची त्याच्याच मेंदूशी लढाई सुरू होती. ट्युमरवर उपचार सुरू असतानाच सागरने दहावीची परीक्षा दिली. या लढाईत बाजी कोण मारणार? याची उत्सुकता त्याचे आई-वडील, शिक्षक, विद्यार्थी मित्र आणि त्याच्यावर उपचार करणाऱ्या डॉक्टरांना लागली होती. पण या लढाईत विजय माझाच होणार, या आत्मविश्वासाच्या जोरावर सागर मात्र निश्चिंत होता. अखेर झालंही तसंच. दहावीचा निकाल जाहीर झाला आणि या निकालात बाजी मारली सागरनंच. तो डिस्टिंक्शनमध्ये उत्तीर्ण झाला.

सागरला आता एमबीए करायचं आहे. एमबीएतही चांगले गुण मिळवण्यासाठी तो नेटाने प्रयत्न करणार आहे. त्याच्या या प्रयत्नात त्याला यश मिळो हीच शुभेच्छा...

दररोज पेपर देऊन रेडिएशन थेरेपीसाठी मला परळच्या टाटा रुग्णालयात जावे लागायचे. दोन वाजता पेपर झाल्यावर मी डोंबिवलीवरुन थेट रुग्णालयात जात होतो. त्यानंतर घरी आल्यावर मी अभ्यास करायचो. आईवडिलांनी मला खूप पाठिेंबा दिला. माझ्या उपचारांसाठी डॉक्टरांनीही मला खूप मदत केली. मला फक्त 60 टक्के मिळतील असं वाटलं होतं. पण, अपेक्षापेक्षा जास्त टक्के मला मिळाले म्हणून खूप आनंद होतोय.
- सागर परमार, विद्यार्थी


सागर माझा मुलगा आहे, याचा मला खूप अभिमान आहे. जेव्हा त्याचा रिझल्ट लागला, तेव्हा मी 15, 20 मिनिटं स्तब्ध झाले होते. त्याला परीक्षा देण्यासाठी मी नको म्हणत होते. पण, त्याने जिद्दीने अभ्यास केला आणि उपचारही घेतले. त्याला शाळेतून आणि रुग्णालयातून चांगला सपोर्ट मिळाला. खरंतर अपेक्षेपेक्षा त्याला जास्त मार्क्स मिळाले आहेत. आम्हाला आनंद आणि नवल दोन्ही वाटतं.
- हीना परमार, सागरची आई


सागरची प्रकृती आधीपेक्षा ठीक आहे. त्याने आपली ट्रीटमेंट आणि अभ्यास सांभाळून हे एवढं मोठं यश संपादन केलं आहे. सागरकडून खूप काही शिकण्यासारखं आहे. जेव्हा त्याची परीक्षा सुरू होती, तेव्हा त्याच्यावर रेडिएशनची ट्रीटमेंट सुरू होती. तीन महिन्यांपूर्वी आम्ही त्याच्यावर रेडिएशनची ट्रीटमेंट केली होती. केमिओथेरेपी आणि रेडिएशनची मोठी प्रोसेस असते. 2012 पासून त्याच्यावर ट्रीटमेंट सुरू होती. सागर खूप हूशार आहे. आता तो ठीक आहे.
- डॉ. सिद्धार्थ लष्कर, कर्करोगतज्ज्ञ, टाटा रुग्णालय

Loading Comments

संबंधित बातम्या

© 2018 MumbaiLive. All Rights Reserved.