राज्य मंडळाने दहावी, बारावीच्या परीक्षांचं वेळापत्रक नुकतंच जाहीर केलं आहे. त्यानंतर आयसीएसई बोर्डानेही दहावी आणि बारावीच्या परीक्षेचं वेळापत्रक जाहीर केलं आहे. यानुसार, दहावीची परीक्षा ५ मे ते ७ जूनपर्यंत होणार आहे. तर बारावीची परीक्षा ८ एप्रिल ते १६ जूनपर्यंत होणार आहे.

परीक्षेचं वेळापत्रक आयसीएसईच्या www.cisce.org या संकेतस्थळावर प्रसिद्ध करण्यात आले आहे. ही परीक्षा घेताना कोरोनासंदर्भात केंद्रांनी दिलेल्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करण्याच्या सूचना बोर्डाकडून शाळांना देण्यात आल्या आहेत.

विद्यार्थ्यांना दिलेल्या वेळेमध्ये परीक्षा केंद्रावर हजर राहणं बंधनकारक आहे. एखादा विद्यार्थी दिलेल्या वेळेपेक्षा अर्धा तास उशीराने पोहोचल्यास त्याला उशीरा पोहचण्याचे योग्य कारण न देता आल्यास परीक्षेसाठी प्रवेश दिला जाणार नाही.

विद्यार्थ्यांना प्रश्नपत्रिका वाचता यावी यासाठी परीक्षेच्या १५ मिनिटे अगोदर प्रश्नपत्रिका दिली जाणार आहे. मात्र परीक्षेला सुरुवात दिलेल्या वेळेलाच होणार आहे. परीक्षेदरम्यान विद्यार्थ्याच्या तोंडावर मास्क बंधनकारक असून, दोन विद्यार्थ्यांमधील अंतर सहा फुटापेक्षा जास्त ठेवण्याच्या सूचना शाळांना देण्यात आल्या आहेत.