Advertisement

महाराष्ट्रातील प्रगत आणि ‍डिजिटल शाळा झाल्या दुप्पट


महाराष्ट्रातील प्रगत आणि ‍डिजिटल शाळा झाल्या दुप्पट
SHARES

महाराष्ट्रात ४७ हजाराहून अधिक शाळा या प्रगत असून ६३ हजार शाळा डिजिटल झाल्याचं महाराष्ट्राच्या आर्थिेक पाहणी अहवालातून स्पष्ट झालं आहे. विशेष म्हणजे प्रगत आणि डिजिटल शाळा होण्याचे प्रमाण हे जवळपास दुप्पट झाल्याचा दावा सरकारच्या शिक्षण विभागाने केला आहे. 

प्रॅक्टिकलवर आधारीत शिक्षण देणाऱ्या शाळा आणि आयएसओ प्रमाणित शाळांच्या संख्येतही गेल्या वर्षाच्या तुलनेत वाढ झाल्याचं शिक्षण विभागाने आपल्या आर्थिक पाहणी विभागात नमूद केलं आहे. मात्र दुसरीकडे विद्यार्थीसंख्या आणि शिक्षकांकडे दुर्लक्ष असल्याचं मत शिक्षक आणि शिक्षण तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे.

शालेय मुलांच्या शैक्षणिक गुणवत्ता वाढीसाठी सन २०१५-१६ मध्ये राज्य शासनाने 'प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रम' सुरू केला.

यासाठी हा कार्यक्रम सुरू केला

एकही मूल शैक्षणिकदृष्टया अपेक्षेपेक्षा कमी असणार नाही यासाठी मुलांमधील मूलभूत क्षमता ओळखून प्रत्येक विद्यार्थ्याने वयोगटानुरुप अपेक्षित शैक्षणिक क्षमता प्राप्त केली आहे किंवा नाही, याची पडताळणी करण्याकरता प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे.


इतके विद्यार्थी शिक्षणापासून वंचित

मागील २ वर्षात सापडलेली ४८ हजार ३७९ शाळाबाह्य मुलं अजूनही शाळेत जात नसून त्यापैकी ३६ हजार १८५ मुलांना सरकारकडून विशेष प्रशिक्षण देण्याचं प्रस्तावित असल्याचं म्हटलं आहे. तर उर्वरित १५ हजार मुलांची नोंदणी करण्यात आली असल्याचं म्हटलं आहे. या अहवालामुळे राज्यात मागील २ वर्षांत सापडलेल्या शाळाबाह्य मुलांना शालेय शिक्षण विभाग शिक्षण देऊ शकलं नसल्याचं उजेडात आलं आहे.


शिक्षक संघटनांची मागणी?

शाळा प्रगत आणइ डिजिटल होण्यात सगळ्यात महत्त्वाचा वाटा शिक्षकांचा आहे. मात्र त्यांचे पगार वेळेवर न होणे, त्यांना देणाऱ्या प्रशिक्षणात हयगय करणे, त्यांच्या मागण्या दुर्लक्षित करणे असे प्रकार वारंवार समोर येत आहेत. यामुळे शिक्षक संघटनेमध्ये प्रचंड नाराजी असल्याचंही समोर येत आहे. त्यामुळे या घटकाला प्राधान्य देऊन त्यांच्याकडे लक्ष देण्याची मागणी शिक्षक संघटनांकडून होत आहे.

शाळा प्रगत आणि डिजिटल होण्यात सगळ्यात महत्त्वाचा घटक शिक्षक आहेत. शिक्षकांच्या गुणवत्तेकडे आणि त्यांच्या दर्जाकडे ही शिक्षण विभागाने लक्ष द्यायला हवं. विद्यार्थ्यांच्या आणि शाळांच्या गुणवत्तेत शिक्षक महत्त्वाची भूमिका बजावत असतात, हे शिक्षण विभागाने विसरायला नको
- उदय नरे, हंसराज मोरारजी पब्लिक स्कूल


राज्यातील प्रत्येक मूल प्रगत झालं पाहिजे, प्रगत होत जाणारं प्रत्येक मूल अप्रत्यक्षपणे राज्य आणि देशालाही विकसित आणि मजबूत बनवणार आहे. प्रगत शैक्षणिक महाराष्ट्र कार्यक्रमांतर्गत हाच संदेश शिक्षकांपर्यंत प्रभावी पद्धतीने पोहोचवण्यात येत आहे.
- विनोद तावडे, शिक्षणमंत्री

संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा