Advertisement

...आणि त्यांनी मराठी शाळेला पुनर्जीवन दिलं!


...आणि त्यांनी मराठी शाळेला पुनर्जीवन दिलं!
SHARES

मराठी शाळांमध्ये रोडावत चाललेली मुलांची संख्या, शाळांची झालेली दयनीय अवस्था यामुळे सध्या मराठी शाळांचाच अस्तित्त्वाचा प्रश्न निर्माण झाला आहे. त्यामुळे आता गरज आहे ती मराठी शाळा वाचवण्याची. 'या मराठी शाळा वाचवण्यासाठी माजी विद्यार्थ्यांनी पुढे यावे', असे आवाहन एका माजी विद्यार्थ्यानेच केले आहे.

शिरोडकर शाळेच्या १९७८च्या बॅचचे मुकुंद माडेकर. ज्या शाळाने आपल्याला घडवले त्या शाळेची ही अवस्था मुकुंद यांना पहावेना. आपल्या 'पास्ट फॉर फ्यूचर' या संस्थेच्या माध्यमातून त्यांनी शाळेला जमेल तशी मदत केली. कधी मुलांना वह्या, गणवेश पुरवले, तर कधी मुलांसाठी शाळेत वॉटर प्यूरिफायर बसवले. पण तरीही त्यांचं मन शांत बसत नव्हतं. आपण शाळेसाठी काहीतरी केलं पाहिजे, मराठी शाळांकडे मुलांनी पाठ न फिरवता, आनंदात प्रवेश घ्यावा, ज्या शाळेने कधीकाळी क्रिकेटर, लेखक, कवी घडवले, त्या शाळेची अवस्था बदलायला हवी, अशी त्यांची इच्छा होती. त्यांच्या लक्षात आलं, की मराठी शाळेत रोडवत जाणाऱ्या मुलांच्या संख्येमागे खरे कारण आहे ते शाळेचे वातावरण.



इंग्रजी माध्यमाच्या शाळांच्या तुलनेत मराठी शाळांचे वर्ग, वर्गाचे वातावरण हे मुलांसाठी पोषक नसते. नवीन अत्याधुनिक तंत्रज्ञानाने शाळा सुसज्ज नसते. तुटलेली बाकं, अनेक वर्ष रंगरंगोटी न केलेले वर्ग, कोंदट वातावरण यामुळे पालक मराठी शाळेत मुलांना पाठवायला तयार नसतात. त्यामुळे आता केवळ ओरड न करता मराठी शाळांचा कायापालट करायचा असे त्यांनी ठरवले. आणि या कार्यात साथ दिली ती त्यांचे बंधू मुरारी मडेकर यांनी.

शाळेतील वर्गात पूर्णपणे रंगरंगोटी केली, तुटलेली बाकं दुरूस्त केली. जुन्या फळ्याच्या जागी वर्गात प्रोजेक्टर आणि नवी ऑडिओ सिस्टीम बसवण्यात आली. ही आदर्श वर्गांची पहिली पायरी आहे. एका वर्गासाठी साधारण २ लाख खर्च आला. त्यामुळे शाळेतील प्रत्येक वर्ग सुसज्ज असावा, असे आम्हाला वाटते. त्यामुळे शाळेच्या सर्व माजी विद्यार्थ्यांनी आपली शाळा वाचवण्यासाठी पुढे यावे.

मुकुंद माडेकर, माजी विद्यार्थी



१९७८ ते १९९१ च्या बॅचच्या मुलांनी आपल्या लाडक्या शिरोडकर शाळेला वाचवण्याचा ध्यास घेतला. शाळेतील एका वर्गाचा अक्षरश: कायापालट केला. शाळेच्या वर्गाचे रूपच पालटून टाकले. एक 'आदर्श वर्ग' तयार केला. आणि हे सर्व केले ते केवळ एका आठवड्याच्या कालावधीत. गणपतीच्या सुट्टीचा योग्य वापर या माजी विद्यार्थ्यांनी केला आणि वर्गाचे रूपडेच पालटले.



त्यांनाही मोह आवरला नाही

ज्या शाळेत आपण पहिल्यांदा खडू हातात घेतला आणि चित्र काढले, त्या शाळेची अवस्था सुलेखनकार अच्युत पालव यांनाही बघवली नाही. वर्गाचे रुपडे पालटण्यात त्यांचाही खारीचा वाटा आहे. शाळेला रंगरंगोटी केल्यानंतर त्यांनी आपल्या शेैलीत एका भितींवर कॅलिग्रॅफी केली. आणि त्या वर्गाचे सौंदर्य आणखीनच खुलले.



डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा