झी युवावर एक नवी मालिका ' अंजली '

 Mumbai
झी युवावर एक नवी मालिका ' अंजली '
Mumbai  -  

झी युवावर २२ मे पासून सोमवार ते शुक्रवार , रात्री ८ वाजता एक नवीन मालिका सुरु होत आहे . या मालिकेचे नाव आहे "अंजली".  ही मालिका हॉस्पिटलच्या कारभारावर आधारित असून एका इंटर्न म्हणून रुजू झालेल्या आणि डॉक्टर बनण्याची स्वप्ने असलेल्या अंजलीची ही गोष्ट आहे. या मालिकेत अंजलीच्या शीर्षक भूमिकेत सुरुची अडारकर असून हर्षद अतकरी, राजन भिसे, रेशम श्रीवर्धनकर, अभिषेक गावकर, भक्ती देसाई, उमा सरदेशमुख, योगेश सोमण, मीना सोनावणे, उमेश ठाकूर, संकेत देव, अर्चना दाणी अशा जुन्या नव्या कलाकारांची फौज आहे.

सुरुची अडारकर म्हणजेच अंजली क्षीरसागर ही नाशिक जवळच्या एका लहान गावातून आलेली एक स्वाभिमानी तरुण मुलगी. अतिशय साधी, हुशार आणि प्रेमळ असलेली अंजली सर्वांची अतिशय लाडकी आहे. तिला कोणालाही दुखवायला आवडत नाही. डॉक्टर बनण्यामागे तिची दोन मुख्य कारणे आहेत. ती  म्हणजे वडिलांचे स्वप्न पूर्ण करणे आणि ज्या ठिकाणी रुग्णालये बांधली जाऊ शकत नाहीत,  तिथल्या लोकांवर उपचार करण्यासाठी "मोबाईल रुग्णालय" सुरु करणे . 

ही स्वप्ने उराशी बाळगून घेऊन ती शहरात शिकायला येते. अतिशय नावाजलेले असे डॉ. जनार्दन खानापुरकर (राजन भिसे) यांच्या हॉस्पिटलमध्ये ती इंटर्नशिप करायला सुरुवात करते. तिच्याबरोबर अनुराधा आणि ओंकार हे दोघेसुद्धा इंटर्न म्हणून रुजू होतात. जनार्दन खानापूरकर यांचा हुशार आणि निष्णात सर्जन असेलेला मुलगा डॉ. यशस्वी खानापूरकर म्हणजेच हर्षद अतकरी अमेरिकेतून उच्च शिक्षण घेऊन हॉस्पिटलचा कार्यभार हाताळत असतो. अतिशय हुशार डॉक्टर असूनही त्याची वृत्ती रुग्णांच्या काळजीपेक्षा व्यवहारी जास्त असते. त्याला भारतातील अतिशय प्रगत आणि तंत्रज्ञानाने समृद्ध असे हॉस्पिटल बनवायचे असते. अंजलीची तत्वे आणि यशस्वीची स्वप्ने यात नेमका कोणाचा विजय होईल, हे सांगणारी ही मालिका आहे .

हॉस्पिटलच्या भावविश्वावर प्रकाशझोत टाकणारी अंजली ही मराठीतील पहिलीच मालिका आहे. अंजली कशाप्रकारे या हॉस्पिटलमध्ये तिचा इंटर्नशिप ते डॉक्टर बनण्याचा प्रवास करते आणि त्यात काय काय गोष्टी घडतात, हे पाहणे एक वेगळाच अनुभव देईल.

या मालिकेचे लेखन पराग कुलकर्णी यांनी केले असून, दगडी चाळ फेम दिग्दर्शक चंद्रकांत कणसे हे या मालिकेचे दिगदर्शक आहेत. या मालिकेचे शीर्षक गीत व्हेंटिलेटरचे संगीत दिग्दर्शक "रोहन  रोहन " यांनी केले. रोहन प्रधान याने हे शीर्षक गीत गायले आहे. संजय जाधव यांच्या ड्रीमिंग २४ सेव्हन एंटरटेनमेंट हे या मालिकेची निर्मिती करत आहेत.


Loading Comments