Advertisement

'सनम हॉटलाईन'ला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद

अभिनेता पुष्कर जोग आणि सई लोकूर यांच्या सनम हॉटलाईन या वेब सीरिजला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे.

'सनम हॉटलाईन'ला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद
SHARES

अभिनेता पुष्कर जोग आणि सई लोकूर यांच्या सनम हॉटलाईन या वेब सीरिजला प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद मिळत आहे. हंगामा डिजिटल मीडियाच्या 'हंगामा प्ले' या प्लॅटफॉर्मवर मराठी आणि हिंदी या दोन भाषांमध्ये ही सीरिज लाँच करण्यात आली आहे. कॅफेमराठी स्टुडीओजने या वेब सीरिजची निर्मिती केली आहे. तर आकाश गुरसाले यांनी या वेबसीरिजचं दिग्दर्शन केलं आहे. पुष्कर जोग आणि सई लोकूर यांच्यासह ज्येष्ठ अभिनेते विनय येडेकर, उदय नेने यांच्या महत्त्वाच्या भूमिका आहेत.

धमाल असं कथानक या वेब सीरिजमध्ये दाखवण्यात आलं आहे. इशान (पुष्कर जोग) आणि त्याचा मित्र अभिजीत (उदय नेने) यांना कॉल सेंटरमधली नोकरी गमवावी लागते. त्यानंतर काहीतरी रोमांचक करण्यासाठी हे दोघे सनम हॉटलाईन ही अडल्ट हॉटलाईन सुरू करतात. ग्राहकांच्या कल्पना आणि इच्छांचे समाधान तंत्रज्ञानाच्या साह्याने करणारी ही सेवा असते. शिवानी (सई लोकूर) ही दोघांची सहकारी आणि इशानची प्रेयसी ही या मित्रांच्या लहानशा स्टार्टअपमध्ये सहभागी होते. त्यांच्या छोटेखानी व्यवसायाला मिळणाऱ्या यशाचा आनंद फार काळ टिकत नाही. त्यांच्या काही ग्राहकांना खंडणीसाठी कॉल येऊ लागतात. तिघांच्या आयुष्याला विनोदी कलाटणी मिळते. सनम हॉटलाईनचे ग्राहक खंडणी जाळ्यात अडकत जातात आणि पुढे काय होते हे जाणून घेण्यासाठी ही वेब सीरिज पहावी लागेल. वेब सीरिज लाँच झाल्यानंतर प्रेक्षकांचा दमदार प्रतिसाद लाभतो आहे.

'कॅफेमराठी’मध्ये आम्ही मनोरंजक आणि प्रेक्षकांना गुंतवून ठेवणाऱ्या वेब सीरिजची निर्मिती करत आहोत. ‘सनम हॉटलाईन’ ही विनोदी ढंगाची वेब सिरीज आहे. त्यामुळेच वेबसिरीज प्रेक्षकांना आवडते आहे. मराठी मनोरंजन क्षेत्रातील काही नामवंत कलाकारांनी उत्तम भूमिका साकारल्या आहेत. हंगामा प्ले’समवेत पुन्हा एकदा काम करण्याची संधी फारच मजेदार होती. आम्हाला या मंचाच्या विस्तृत वितरण नेटवर्कद्वारे सर्वदूर पसरलेल्या आमच्या प्रेक्षकांपर्यंत पोहोचता आले', असं कॅफे मराठी स्टुडीओजचे सह-संस्थापक आणि सीईओ निखिल रायबोले यांनी म्हटलं. 

आता ही वेबसिरीज 'हंगामा'च्या हंगामा प्ले’ या व्हिडिओ ऑन डिमांड प्लॅटफॉर्मवर उपलब्ध आहे. तसंच, एमएक्स प्लेयर, एअरटेल एक्स्ट्रीम अॅप, व्ही मूव्हीज अँड टीव्ही, अमेझॉन फायर टीव्ही, टाटा स्काय बिंज, डिशस्मार्ट स्टीक, डी२एच स्ट्रीम, डिशस्मार्ट हब, शिवाय मेघबेला ब्रॉडबॅंड, अलियान्स ब्रॉडबँड, एसीटी फायबरनेट आणि नेटप्लस यांच्यासारखे आयएसपी तसंच, टीसीएल, वनप्लस टीव्ही, सोनी ब्राविया, सीव्हीटीई, तोशिबा आणि क्लाऊडवॉकर अशा स्मार्ट टीव्हीवर हंगामा प्ले’च्या माध्यमातून सनम हॉटलाईन आता उपलब्ध आहे. त्याशिवाय, हंगामाच्या शाओमी समवेतच्या भागीदारीनं ग्राहक हंगामा प्लेद्वारे मी टीव्ही’वर ही सीरिज पाहू शकतील. तसंच, कालांतरानं सोनीलाइव आणि फ्लीपकार्ट व्हीडिओवर देखील स्ट्रीम उपलब्ध होणार आहे.

'डिजीटल माध्यमावर काम करताना प्रयोगशील काम करण्याची संधी मिळाली. कॅफेमराठी सोबत काम करण्याचा अनुभव अतिशय उत्तम होता. आता वेब सीरिजविषयी प्रेक्षकांच्या येणाऱ्या प्रतिक्रिया उत्साहवर्धक आहेत', असं या वेबसिरीजबाबत अभिनेता पुष्कर जोग यानं म्हटलं.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा