Advertisement

दादासाहेब फाळकेंना मरणोत्तर 'भारतरत्न' प्रदान करण्यासाठी मोहीम


SHARES

धुंडीराज गोविंद फाळके उर्फ दादासाहेब फाळके यांना भारतीय चित्रपटांचा जनक मानले जाते. १९१३ मध्ये त्यांनी निर्मित केलेला 'राजा हरिश्चंद्र' हा मराठीच नव्हे,  तर भारतीय चित्रपटसृष्टीच्या इतिहासातील आद्य चित्रपट. १९ वर्षांच्या कारकिर्दीत फाळके यांनी ९५ चित्रपट आणि २६ लघुपटांची निर्मिती केली. त्यांच्या चित्रपटविषयक योगदानाबद्दल भारतीय चित्रसृष्टीतील सर्वांत मोठा पुरस्कार त्यांच्या नावानं दिला जातो. दादासाहेब फाळके यांनी मराठी चित्रपटसृष्टीची आणि भारतीय चित्रपटसृष्टीची मुहूर्तमेढ रोवली. याच योगदानासाठी दादासाहेब फाळके यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' (मरणोत्तर) पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं, अशी मागणी अनेकांनी केली. DPIAM म्हणजे दादासाहेब फाळके इंटरनॅशनल अवेअरनेस मिशननेसुद्धा हीच मागणी केली आहे. दादासाहेब फाळके यांच्या नावाची 'भारतरत्न' पुरस्कारासाठी शिफारस करण्यात यावी, यासाठी DPIAMनं पुढाकार घेतला आहे. #BharatRatnaToPhalke हा हॅशटॅग DPIAM वेबसाईट(www.dpiam.org.in)वर सुरू करण्यात आला आहे. तसंच फेसबुक पेजवरही याचा प्रचार सुरू आहे.

दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर हे DPIAMचे संस्थापक आहेत. तर विनय वाघ (फाईन आर्ट्सचे संचालक) आणि वीरेंद्र नायक (आयटीचे संचालक) हे कोअर टीमचा भाग आहेत. दादासाहेब फाळके यांनी चित्रपटसृष्टीला दिलेले योगदान लोकांपर्यंत पोहोचवणे हे DPIAMचे उद्दीष्ट आहे. याची सुरुवात वीरेंद्र नायक यांनी केली असून दादासाहेब फाळके यांच्या संदर्भातील माहिती देणारी एक वेबसाईट (www.dpiam.org.in) त्यांनी २१ एप्रिलपासून सुरू केली आहे. ज्यामध्ये दादासाहेब फाळके यांचे अनेक पैलू दर्शवण्यात आले आहेत. तर ३ मे २൦१७ ला दादासाहेब फाळके यांच्या पुतळ्याचं अनावरण करण्यात येणार आहे.

विनय वाघ यांनी दादासाहेब फाळके यांचा पहिला पुतळा बनवला आहे. याचे वैशिष्ट्य म्हणजे पुतळा बनवण्यासाठी दादासाहेब फाळके यांचे नातू चंद्रशेखर पुसाळकर यांच्या चेहऱ्याच्या रचनेचं माप घेण्यात आलं आहे. चंद्रशेखर पुसाळकर आणि दादासाहेब फाळके यांच्या चेहऱ्याच्या संरचनेत साधारण साम्य आहे.

'लंका दहन' (१९१७) या दादासाहेब फाळके यांनी निर्मित केलेल्या चित्रपटाला २൦१७ मध्ये शंभर वर्ष पूर्ण होत आहेत. या निमित्तानं DPIAM हे यश साजरं करणार आहे. यासोबतच दादासाहेब फाळके यांना देशाच्या सर्वोच्च नागरी सन्मान 'भारतरत्न' (मरणोत्तर) पुरस्कारानं सन्मानित करण्यात यावं यासाठी आवाहन करणार आहे.


Read this story in English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा