Advertisement

घाडगेंच्या घरी जलोष्षात साजरा होणार गुढीपाडवा


घाडगेंच्या घरी जलोष्षात साजरा होणार गुढीपाडवा
SHARES

कलर्स मराठीवरील 'घाडगे & सून' या मालिकेत प्रत्येकच सण मोठ्या जल्लोषात साजरा करण्याची प्रथा आहे. मग तो दिवाळी असो वा होळी. आता घाडगे सदनमध्ये गुढीपाडव्याची तयारी सुरू झाली आहे. अक्षय आणि अमृताच्या लग्नानंतरचा हा पहिलाच गुढीपाडवा असल्याने घाडगे परिवार हा सण मोठ्या उत्साहात साजरा करणार यात शंका नाही.

गुढी म्हणजे आनंदाचे प्रतीक. या दिवशी शुभकार्याचा प्रारंभ करण्याची प्रथा आहे. आपल्या कुटुंबांचे सर्व संकटापासून संरक्षण होण्यासाठी गुढी उभारली जाते. गुढीपाडव्याच्या निमित्ताने प्रेक्षकांच्या लाडक्या अक्षय आणि अमृताने या दिवसाच्या काही आठवणी सांगितल्या.

“घाडगे आणि सून” मालिकेत एकीकडे माई अक्षय - अमृता नव्या नात्याच्या शुभारंभाची गुढी उभारत आहेत. तर दुसरीकडे वसुधा हाती आलेल्या घटस्फोटाच्या कागदपत्रांनी हे नातं तोडेल का ही भीती अमृताच्या मनात आहे. घाडगे सदनमध्ये गुढीपाडवा आनंदाने आणि जल्लोषात साजरा होणार असून अक्षय आणि अमृताचे घटस्फोटाचे कागदपत्र वसुधा माईंना तर दाखवणार नाही ना? अक्षय आणि अमृताच्या नव्या नात्याचा शुभारंभ होणार का? हे जाणून घेण्यासाठी बघा घाडगे & सूनचा गुढीपाडवा विशेष भाग अजिबात चुकवू नका.

हिंदू वर्षारंभ चैत्रशुद्ध प्रतिपदेला येणाऱ्या गुढीपाडवा या सणाने होतो. साडेतीन मुहूर्तापैकी हा एक दिवस असल्याने चांगल्या कामाची सुरुवात या दिवशी करतात. म्हणूनच माझ्या आईने मी लहान असताना मला पाटी आणि पेन्सिल भेट म्हणून दिली. पाटी स्वच्छ धुतली त्यावर सरस्वतीचं चित्र काढून आईनं मला पाटीची पूजा करायला सांगितलं आणि तिथूनच माझ्या शिक्षणाचा श्रीगणेशा झाला. दरवर्षी आम्ही भावंड यादिवशी पाटीची पूजा करतो. निसर्गाशी नातं जोडणारा, वर्षाच्या सुरुवातीलाच मागच्या सगळ्या कडू गोष्टी विसरून मनातील नव्या गोडव्यासह नवीन वर्ष सुरू करा, असं सांगणारा गुढीपाडवा माझ्यासाठी नेहेमीच संस्मरणीय आहे.
- भाग्यश्री लिमये, अभिनेत्री

आपण आपली संस्कृती जपायला हवी असं मला वाटतं. आपण सण साजरे करायला हवे कारण, आत्ताच्या काळात त्याची आवश्यकता आहे. नाती संबंध वरवरचे झाले आहेत मोबाईल, ईमेल, यामुळे आपण नातेवाईंकांना खूप कमी भेटतो. पण, या सणाच्या निमित्ताने सगळे एकत्र येतात. त्यामुळे एकत्र येण्याची कुठलीही संधी आपण सोडता कामा नये असं मला वाटतं. नात्यांच्या नव्या सुरुवातीसाठी मला हा सण महत्वाचा वाटतो.
- चिन्मय उद्गीरकर, अभिनेता

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा