Advertisement

नवं वर्ष असावं फुलपाखरासारखं स्वच्छंदी!


नवं वर्ष असावं फुलपाखरासारखं स्वच्छंदी!
SHARES

दुर्वा मालिकेत राजकारणातील सशक्त महिलेची भूमिका सकारल्यानंतर फुलपाखरू मालिकेत काॅलेजगोईंग बबली गर्लच्या भूमिकेत प्रेक्षक स्वीकारतील का? अशी हृताला शंका होती. पण प्रेक्षकांनी या दोन्ही भूमिकांवर भरभरून प्रेम केलं. २०१७ मध्ये मनासारखं काम करता आलं, त्याचप्रमाणे २०१८ मध्येही स्वच्छंदीपतणे भूमिका साकारता याव्यात, अशी हृताची अपेक्षा आहे. आपल्या अभिनयातील कारकिर्दीबद्दल आणि नव्या वर्षातील संकल्पांबद्दल अभिनेत्री हृता दुर्गुळेसोबत मारलेल्या या गप्पा..


दुर्वा मालिकेनंतर फुलपाखरूतली भूमिका किती आव्हानात्मक होती?

दुर्वा ही माझी पहिली मालिका. या मालिकेत मी माझ्या वयापेक्षा मोठी व्यक्तीरेखा साकारत होते. प्रेक्षकांना माझी भूमिका आवडली. पण यामुळे माझ्यावर गंभीर व्यक्तीरेखेचा स्टॅम्प पडेल का? अशी भीती मला वाटत होती. पण सुदैवानं मला फुलपाखरू मालिकेविषयी विचारण्यात आलं. या मालिकेमुळे मला माझी इमेज ब्रेक करता आली. या मालिकेत मी माझ्याच वयाच्या तरूणीची भूमिका साकारतेय. वैदेही हे त्या व्यतीरेखेचं नाव. फुलपाखरूमुळे मला मंदार देवस्थळी यांच्याबरोबर काम करण्याची संधी मिळाली. त्यांच्याकडून खूप काही शिकायला मिळत आहे.


फुलपाखरूमधील रोमॅन्टीक साँग खूप गाजलं, प्रेक्षकांकडून कशा प्रतिक्रिया आल्या?

मला सुरूवातीला रोमॅन्टीक साँग करताना खूप भिती वाटली. पण ते गाणं चांगलं होण्यामागे मंदार सरांचा मोठा वाटा आहे. सगळं क्रेडीट त्यांना आहे. साँग शूट करण्याची मंदार सरांची वेगळी पद्धत आहे. ते गाणं शूट करताना प्रत्येक बारकावे आम्हाला समजावून सांगतात. या गाण्यावर प्रेक्षकांनी खरंच मनापासून प्रेम केलं. खरतरं मला गाता येत नाही. कारण मी जिथं कुठे जाते तिथं हे गाण गावं, अशी इच्छा प्रेक्षक व्यक्त करतात.


नाटक किंवा चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला कधी येणार?

मला नाटक आणि चित्रपटात काम करायला नक्कीच आवडेल. पण उत्तम कथा हवी. मी याबाबतीत खूप चुझी आहे. योग्य स्क्रिप्ट मिळाल्यावर मी पटकन नाटक स्वीकारेन. पण, सध्या तरी मालिकांवर माझा फोकस आहे.


तुझा २०१७ मधील आठवणीत राहणारा क्षण कुठला?

२०१७ हे वर्ष माझ्यासाठी खूप लकी ठरलं. २४ एप्रिल २०१७ ला माझी फुलपाखरू ही मालिका सुरू झाली. फुलपाखरूमध्ये वैदेहीची एन्ट्री झाली. प्रेक्षक मला या भूमिकेत स्वीकारतील की नाही याविषयी मला खूप भीती वाटत होती? पण मला प्रेक्षकांनी स्वीकारलं, त्यामुळे २०१७ मधील आठवणीत राहणारा क्षण म्हणजे वैदेहीची एन्ट्री हाच आहे.


नवीन वर्ष कसं सेलिब्रेट करणार?

दरवर्षी मी माझ्या कुटुंबासोबतच नवीन वर्ष सेलिब्रेट करते. माझे आई, बाबा आणि भाऊ असे आम्ही चौघे मिळून एकत्र सेलिब्रेशन करतो. दरवर्षी आम्ही नवीन एखाद्या ठिकाणी डिनरला जातो. नव्या वर्षाच्या सुरूवातीला कुटुंबाबरोबर वेळ घालवावा, अशी माझ्या बाबांची शिकवण आहे.


नवीन वर्षाचा संकल्प काय आहे?

दरवर्षी मी दररोज नित्यनेमाने व्यायाम करेन, असा संकल्प करते, पण तो कधीच पूर्ण होत नाही. यावर्षीही हाच संकल्प मी करणार आहे आणि तो पूर्णही करणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा