Advertisement

...आणि रोहित शेट्टीने महावीरला दिली शाबासकी


...आणि रोहित शेट्टीने महावीरला दिली शाबासकी
SHARES

मागील काही वर्षांमध्ये तंत्रज्ञांनाही कलाकारांइतकंच ग्लॅमर प्राप्त झालं आहे. साऊंड रेकॅार्डीस्ट रेसूल फुक्कुटी तसंच महावीर साबन्नावरसारखे तंत्रज्ञ याला कारणीभूत आहेत. पडद्यामागे राहून सिनेमाच्या प्रक्रियेत महत्त्वाच्या ठरणाऱ्या ध्वनी संकलनाच्या जादूई तंत्राची दखल घ्यायला भाग पाडत महावीरने राष्ट्रीय पुरस्काराला गवसणी घालण्यात यश मिळवलं आहे. 

श्रीलंकेतील सिंहली भाषेतील सिनेमासाठी काम केलेला महावीर सध्या रोहित शेट्टीच्या सिनेमासाठी ध्वनी संकलन करत आहे. रोहितसारख्या निर्मात्याच्या पहिल्या मराठी सिनेमात काम करण्याचा अनुभव महावीरने ‘मुंबई लाइव्ह’शी बोलताना शेअर केला.


राष्ट्रीय-राज्य पुरस्कारांवर मोहोर

कारकिर्दीच्या सुरुवातीच्या काळात महावीरने राष्ट्रीय पुरस्कारावर आपली मोहोर उमटवत सर्वांचं लक्ष वेधून घेतलं. दिग्दर्शक भाऊराव कऱ्हाडे यांच्या ‘ख्वाडा’ या सिनेमासाठी महावीरला राष्ट्रीय पुररस्कार देण्यात आला होता. त्यानंतर आलेल्या ‘दशक्रिया’ या सिनेमासाठी त्याने महाराष्ट्र राज्य सरकारचा पुरस्कार पटकावला.


रोहितचा सिनेमा

हिंदी सिनेसृष्टीतील धडाकेबाज निर्माता-दिग्दर्शक अशी ओळख असलेला रोहित शेट्टी सध्या ‘स्कूल, कॅालेज आणि लाईफ’ या मराठी सिनेमाची निर्मिती करत आहे. या सिनेमाच्या दिग्दर्शनाची जबाबदारी रोहितने विहान सूर्यवंशी या नवोदित तरुण दिग्दर्शकाकडे सोपवली असून, साऊंड रेकॅार्डींगचं काम महावीर करत आहे.


असा मिळाला सिनेमा

रोहितच्या या सिनेमासाठी साऊंड रेकॅार्डीस्ट म्हणून काम करण्याची संधी मिळण्याबाबत महावीर म्हणाला की, रोहितसरांशी माझा थेट संपर्क नव्हता. रोहितसरांना ‘स्कूल कॅालेज आणि लाईफ’ या सिनेमासाठी साऊंड रेकॅार्डीस्टची गरज होती. त्यांच्या सिनेमाचे डीओपी संतोष रेड्डी माझे मित्र आहेत. त्यांनी माझं नाव सुचवलं. प्रोडक्शनकडून मला फोन आला. त्यानंतर विहानशी भेट झाली. विहानमुळे रोहितसरांना भेटलो.


रोहितने दिली शाबासकी

‘स्कूल कॅालेज आणि लाईफ’ या सिनेमासाठी माझी निवड करण्यापूर्वी भारतीय सिनेसृष्टीतील काही नावाजलेल्या साऊंड रेकॅार्डीस्टची टेस्ट रोहितसरांनी घेतली होती, पण त्यांना त्यांचं काम आवडलं नाही. त्यामुळे मला संधी मिळाली. त्यांना ट्रायल दिली. माझं काम पाहून ते बेहद्द खुश झाले आणि पाठीवर शाबासकीची थाप मारली.


जीवनाच्या तीन टप्प्यातील गोष्ट

‘स्कूल कॅालेज आणि लाईफ’ या शीर्षकावरूनच या सिनेमात काहीतरी विशेष दडल्याची जाणीव होते. वास्तवातही तसंच काहीसं आहे. शीर्षकाप्रमाणेच हा सिनेमा जीवनातील तीन टप्प्यांमधील गोष्ट दाखवणारा आहे. ८०, ९० आणि २००० अशा तीन दशकांमधील फेजेस या सिनेमात पाहायला मिळतील.


तीन डझन सिनेमे नावावर

महावीरने आजवर जवळजवळ ३६ सिनेमांसाठी ध्वनी संकलनाचं काम केलं आहे. यात २० साऊथच्या, एक सिंहली, तर इतर मराठी-हिंदी भाषेतील सिनेमांचा समावेश आहे. हिंदीमध्ये महावीरने ‘एजंट विनोद’ आणि ‘फंसते फंसाते’ या सिनेमांसाठी साऊंड रेकॅार्डींग केलं आहे.


तीन मराठी, तीन कन्नड

आजघडीला महावीरकडे तीन मराठी आणि तीन कन्नड सिनेमे आहेत. ‘विरुपा’, ‘नापी चरामी’ आणि ‘गिफ्ट बॅाक्स’ या कन्नड भाषेतील सिनेमांच्या कामात महावीर सध्या बिझी आहे. यासोबतच रोहितच्या या सिनेमासह ‘रमाई’ आणि ‘अदृश्य’ या आणखी दोन मराठी सिनेमांसाठी महावीर काम करत आहे. श्रीलंकन सिनेमा मागोमाग इंग्रजी आणि फ्रेंच भाषेतील सिनेमांसाठी महावीरची बोलणी सुरू आहेत. त्यामुळे महावीर भविष्यात हॅालिवुडच्या दिशेने झेप घेणार हे नक्की.हेही वाचा - 

बोनी-अनिलच्या उपस्थितीत ‘धडक’चा ट्रेलर लाँच

Exclusive: अशा राजकारण्यांना धरून बडवायला हवं- शरद पोंक्षे
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा