• पोलिसांमधील माणसाचा शोध घेणाऱ्या 'लाल बत्ती' चा मुहूर्त
  • पोलिसांमधील माणसाचा शोध घेणाऱ्या 'लाल बत्ती' चा मुहूर्त
SHARE

‘सद्रक्षणाय खलनिग्रहणाय’ हे ब्रीद स्वीकारून पोलीस यंत्रणा समाजाच्या हितासाठी २४ तास झटत असते. या पोलीस यंत्रणेच्या चुका शोधण्यातच धन्यता मानणाऱ्या समाजाच्या डोळ्यात अंजन घालणारा ‘लाल बत्ती’ हा आगामी मराठी चित्रपट लवकरच प्रेक्षकांच्या भेटीस येत आहे.

साई सिनेमा प्रस्तुत, संतोष सोनावडेकर निर्मित आणि गिरीश मोहिते दिग्दर्शित ‘लाल बत्ती’ या चित्रपटाचा मुहूर्त राज्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि ठाण्याचे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांच्या हस्ते संपन्न झाला. या प्रसंगी निर्माते संतोष सोनावडेकर, दिग्दर्शक गिरीश मोहिते, ठाण्याचे पोलीस उप-आयुक्त मधुकर पांडे, कलाकार मंगेश देसाई, अनिल गवस यांच्यासह अनेक मान्यवर उपस्थित होते.

गुन्हेगारांशी सततचे संबंध आणि त्यामुळे कठोर बनलेलं मन असाच आपला पोलिसांविषयी समज असतो. पण ‘लाल बत्ती’ हा सिनेमा वर्दीत दडलेल्या माणसाचा शोध घेणारा आहे. पोलीसांचं वैयक्तिक आयुष्य उलगडून दाखवताना त्यांच्यातील माणुसकीचं दर्शन ‘लाल बत्ती’ या सिनेमातून होईल, असे प्रतिपादन चित्रपटाचे दिग्दर्शक गिरीश मोहिते यांनी केले. हा चित्रपट पोलिसांबद्दल समाजमनातील आदर नक्की वाढवेल अशी आशा व्यक्त करत एकनाथ शिंदे यांनी चित्रपटाच्या टीमला शुभेच्छा दिल्या.

पोलिसांच्या माणुसकीची गोष्ट सांगणाऱ्या ‘लाल बत्ती’ या चित्रपटात मंगेश देसाई, भार्गवी चिरमुले, राधा कुलकर्णी, अनिल गवस, जयेंद्र मोरे, प्रशांत मोहिते, प्रदीप घुले, शैलेश धनावडे, तेजस एस., सुरेश चौधरी आदी कलाकार भूमिका साकारणार आहेत. साई सिनेमा प्रस्तुत ‘लाल बत्ती’ या चित्रपटाची निर्मिती संतोष सोनावडेकर यांनी केली असून दिग्दर्शन गिरीश मोहिते करीत आहेत. चित्रपटाची कथा-पटकथा अभय दखणे यांची असून अरविंद जगताप यांनी संवादलेखन केले आहे. चित्रपटाच्या कथेला साजेसं अविनाश-विश्वजीत यांचं संगीत लाभणार आहे. चित्रपटाचे कलादिग्दर्शन दिगंबर तळेकर हे करत असून अतुल साळवे हे चित्रपटाचे कार्यकारी निर्माते आहेत. लवकरच चित्रपटाच्या चित्रीकरणास सुरुवात होणार आहे.

संबंधित विषय
ताज्या बातम्या