Advertisement

मराठी अभिनेते रवींद्र महाजनींचे निधन, घरात आढळला मृतदेह

रवींद्र महाजनी हे अभिनेता गश्मिर महाजनीचे वडिल आहेत.

मराठी अभिनेते रवींद्र महाजनींचे निधन, घरात आढळला मृतदेह
SHARES

मराठी चित्रपटसृष्टी गाजवणारे प्रसिध्द अभिनेते रवींद्र महाजनी (Ravindra Mahajani) (७७) यांचे आकस्मित निधन झाले आहे. ते मावळ तालुक्यातील आंबे येथे वास्तव्यास होते. एका बंद खोलीत शुक्रवारी सायंकाळी चारच्या सुमारास त्यांचा मृतदेह आढळला. 

अभिनेते महाजनी हे गेल्या काही दिवसांपासून आंबी येथे एका फ्लॅटमध्ये राहण्यासाठी आले होते. दरम्यान शुक्रवारी त्यांच्या फ्लॅटमधून दुर्गंधी आल्याने नागरिकांनी पोलिसांना माहिती दिली. त्यानुसार पोलीस घटनास्थळी दाखल झाले.

फ्लॅटचा दरवाजा तोडून पोलिसांनी घरात प्रवेश केला. त्यावेळी महाजनी यांचा मृतदेह आढळून आला. दोन ते तीन दिवसांपूर्वी मृत्यू झाला असावा, असा अंदाज पोलिसांनी व्यक्त केला आहे. महाजनी यांच्या कुटुंबीयांना याबाबत माहिती देण्यात आली आहे.

महाजनी यांचा मुलगा अभिनेता गश्मिर मुंबईत राहायला आहे. गश्मिरला पोलिसांनी ही माहिती दिली असून, ते तळेगाव दाभाडे येथे रवाना झाले आहेत.

शविच्छेदनानंतर महाजनी यांचा मृतदेह ताब्यात देण्यात येणार आहे, अशी माहिती पोलिसांनी दिली. महाजनी यांचा मृत्यू दोन ते तीन दिवसांपूर्वी झाल्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

रविंद्र महाजनी यांना तर मराठी सृष्टीतला चॉकलेट हिरो म्हणून ओळख मिळालेली होती. मात्र ही ओळख मिळवण्यासाठी त्यांना अपार मेहनत घ्यावी लागली, काम मिळावे म्हणून अनेक निर्मात्यांचे उंबरठे सुद्धा झिजवावे लागले होते. 


रवींद्र महाजनी यांचा जन्म बेळगाव येथे झाला. त्यांचे वडील ह. रा. महाजनी हे ज्येष्ठ पत्रकार. त्यांचं संपूर्ण बालपण मुंबईत गेले. त्यांना लहानपणापासूनच अभिनयाची आवड होती.

ते शालेय जीवनापासून नाटकात, चित्रपटातच शाळेच्या स्नेहसंमेलनात काम करत होते. त्यांनी खालसा महाविद्यालयामध्ये बी. ए. शिक्षण पूर्ण झाल्यानंतर रवींद्र महाजनी यांनी चित्रपटसृष्टीत नशीब अजमावण्यासाठी प्रयत्न सुरू केले.

मधुसूदन कालेलकर यांच्या 'जाणता अजाणता' या नाटकातून महाजनींना खऱ्या अर्थाने पहिली संधी मिळाली. शांतारामबापूंनी या नाटकाचा एक प्रयोग पाहिला आणि रवींद्र महाजनींना 'झुंज' या चित्रपटात मुख्य भूमिकेची संधी मिळाली.

१९७४ साली आलेला हा चित्रपट खूप गाजला आणि त्यानंतर रवींद्र महाजनी नावाचा नवा तारा मराठी चित्रपट सृष्टीला मिळाला होता.

दिवसा निर्मात्यांकडे काम मिळवण्यासाठी त्यांचे उंबरठे झिजवणे आणि रात्री टॅक्सी चालवून चार पैसे कमवणे असे ते जवळपास तीन वर्षे स्ट्रगल करत राहिले. मात्र संपादकाचा मुलगा टॅक्सी चालवतो म्हणून नातेवाईकांनी त्यांच्याकडे पाठ फिरवली होती.

मधुसूदन कालेलकर यांनी रविंद्र महाजनी यांना एका नाटकात काम दिले. जाणता अजाणता या नाटकामुळे रविंद्र महाजनी प्रसिद्धीस आले. कालेलकर यांनी त्यांच्याकडे पाहूनच तो राजहंस एक हे नाटक लिहिले. यातूनच झुंज हा चित्रपट साकारण्याची संधी त्यांना मिळाली.

झुंज चित्रपटाने रविंद्र महाजनी प्रकाशझोतात आले. अनेक निर्मात्यांनी त्यांना आपल्या चित्रपटात घेण्यासाठी रांगा लावल्या. लक्ष्मी, देवता, गोंधळात गोंधळ, मुंबईचा फौजदार, हळदी कुंकू अशा चित्रपटांमधून रविंद्र महाजनी नावाचा देखणा नायक प्रेक्षकांच्या भेटीला येत राहिला.संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा