'प्रेम हे'ची नवीन गोष्ट 'सखी'

 Mumbai
'प्रेम हे'ची नवीन गोष्ट 'सखी'

दोन प्रेमींना आपले प्रेम लग्नापर्यंत पोहोचेपर्यंत अनेक समस्यांना तोंड द्यावे लागते. मात्र, लग्नानंतर त्यांचे नाते टिकले नाही तर मनाला धक्काच बसतो. विवाहाच्या अगोदर प्रत्येक प्रेमी युगुल भावी आयुष्यातील जबाबदाऱ्या सांभाळण्यास तयार असतात. एकमेकांकडून विशेष काही अपेक्षाही नसतात. परंतु, लग्नानंतर त्याच जबाबदाऱ्या पार पाडण्यावरून वाद निर्माण होतात. आणि संसार त्रासाचा होतो. त्यात मुलं असतील तर ते जोडपे अडकून जाते. त्यातील एक सावरण्याचा प्रयत्न करतो तर दुसरा तेवढ्याच जोराने तोडण्याचा आणि या अशा नात्यात एक नवीन व्यक्ती येते जी सावरणाऱ्याच्या बाजूने असते आणि मग सुरु होतो खोट्या समाजाला सांभाळत, स्वतःचं मन मारत खोटे जगण्याचा खटाटोप. 'प्रेम हे'ची या सोमवारी येणारी नवीन गोष्ट आहे 'सखी'. ही कथा आहे नुपूर आणि प्रतीम या नवरा-बायको आणि 'ती'ची...

आयुष्यात प्रत्येक वेळी 'ती' ही वाईट असतेच असं नाही. तर ती कधी कधी आपली 'सखी' ही असू शकते. येत्या सोमवारी १७ एप्रिल आणि मंगळवार १८ एप्रिलला रात्री ९ वाजता, आपल्याला मुग्धा चाफेकर आणि सौरभ गोखले यांचे एक अबोल प्रेम 'झी युवा'वर पाहायला मिळेल.

प्रतिम आणि नुपूर यांचा पहिला प्रेमविवाह आणि लगेच आर्यनसारखं गोंडस बाळ झाल्यानंतर मात्र नुपूरला या संसाराचा कंटाळा आला. तर प्रतिम मात्र संसार टिकवण्यासाठी शर्थीचे प्रयत्न करू लागला. पण नुपूरला या गोष्टीची काडीमात्र पर्वा नव्हती. उलट तिला तिचा नवरा बोअर वाटू लागला होता. आणि ती तिचं सुख बाहेर शोधू लागली होती. प्रतिमला हे सगळं समजत होतं. पण आर्यनसाठी तो मात्र सहन करत होता. याच काळात शिल्पा एक हुशार समंजस आणि साधी मुलगी बेबीसिटर म्हणून प्रतीमच्या घरात आली आणि तिने आर्यनला आणि हळूहळू प्रतिमला आपलंस केलं. प्रतिमला एक सखी मिळाली होती. पण हे सगळं कसं आणि कितीवेळ सुरु राहील? प्रतिम आणि नुपूरच्या नात्याचं काय  होईल? प्रतिम आणि शिल्पा एकमेकांना सांगू शकतील का की ते एकमेकांवर प्रेम करत आहेत? समाज हे मान्य करेल का? या सर्व प्रश्नांची उत्तरं मिळतील 'प्रेम हे'च्या नवीन 'सखी' ह्या गोष्टीत. 

 

Loading Comments