Advertisement

' लपाछपी ' सिनेमाचा ट्रेलर लाँच


SHARES

आंतरराष्ट्रीय फिल्म फेस्टिवलमध्ये झळकलेला 'लपाछपी' हा सिनेमा १४ जुलै रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. विशाल फुरियाने दिग्दर्शित केलेल्या 'लपाछपी'चा बोलबाला आता महाराष्ट्रातही होताना दिसत आहे. नुकतेच, महालक्ष्मी येथील फेमस स्टुडियोमध्ये या सिनेमाच्या ट्रेलरचे अनावरण करण्यात आले.

आजूबाजूला ऊसाचे शेत, काळोख आणि ट्रांजिस्टवर घुमणारे 'लपाछपी'चे गाणे, अशी वातावरण निर्मिती करत या सिनेमाचा ट्रेलर लॉच करण्यात आला. सिनेमाचा ट्रेलर पाहताना 'लपाछपी' सिनेमातील हॉरर कथानकाची कल्पना येते. अभिनेत्री पूजा सावंत या ट्रेलरमध्ये एका नव्या रूपातच लोकांसमोर येत असल्यामुळे, तिच्या चाहत्यांना देखील तो आश्चर्याचा धक्का आहे. या चित्रपटात पूजा ८ महिन्यांची गरोदर असून आपल्या बाळाला वाचवण्यासाठी तिची धडपड या ट्रेलरमध्ये दिसून येते. विशेष म्हणजे, एक्स्ट्रा साऊंड इफेक्टमुळे ट्रेलर पाहणाऱ्यांचा थरकाप उडाल्याशिवाय राहात नाही.

एव्हढेच नव्हे तर, रेखा भारद्वाज यांनी गायलेले 'लपाछपी' सिनेमातील बालगीत देखील रसिकांच्या अंगावर काटा उभा करते. 'एकच खेळ लपाछपीचा...' असे बोल असणारे हे गाणे या सिनेमाच्या 'भीती' ला योग्य न्याय देते. सिनेमातील या गाण्याच्या नंदिनी बोरकर मूळ गायिका असून, स्वयेश्री शसीन वर्धावे यांनी हे बालगीत लिहिले आहे. शिवाय रंजन पटनाईक, टॉनी बसुमातरी आणि उत्कर्ष धोटेकर या तिघांनी गाण्याचे संगीतदिग्दर्शन केले आहे.

या सिनेमाची कथा दिग्दर्शक विशाल फुरिया आणि विशाल कपूर यांनी लिहिली आहे. 'लपाछपी' हा सिनेमा मराठी चित्रपटसृष्टीतील सर्वोत्कृष्ट भयपट ठरण्याची शक्यता असल्याचा अंदाज, सिनेमाचा ट्रेलर पाहताना होतो. 



पूजा सावंतची मध्यवर्ती भूमिका असलेल्या या सिनेमात उषा नाईक, अनिल गावस आणि विक्रम गायकवाड या कलाकरांचीदेखील भूमिका असून, आतापर्यंत खुमासदार मनोरंजांच्या दुनियेत मश्गुल होत असलेल्या सिने चाहत्यांसाठी हा सिनेमा मनोरंजनाचा थरकाप उडवणारा ठरणार आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा