Advertisement

'सारेगमप' - घे पंगा,कर दंगा !


'सारेगमप' - घे पंगा,कर दंगा !
SHARES

संगीत म्हणजे मराठमोळ्या संस्कृतीचा अविभाज्य घटक आहे. महाराष्ट्राच्या महावाहिनीने अर्थात झी मराठीने,सुरुवातीपासून मराठी माणसाची ही संगीताची आवड आपल्या दर्जेदार कार्यक्रमांमधून जोपासली आहे. मराठी संगीत क्षेत्रातील लोकप्रिय कार्यक्रम 'सारेगमप' हे त्याचं उत्तम उदाहरण ! लवकरच सारेगमप आपल्या सर्वांच्या भेटीला येत आहे.

जगभरातील रसिक श्रोत्यांना स्वरांच्या सरीत चिंब भिजवण्यासाठी सारेगमपचं नवं पर्व सज्ज झालंय. चित्रपटसृष्टीतील नामवंत दिग्दर्शक आणि निर्माते रवी जाधव या पर्वात परीक्षकाच्या भूमिकेत आपल्याला पाहायला मिळणार आहे आणि त्यांना साथ लाभणार आहे गायिका बेला शेंडे यांची. महाराष्ट्राचा लाडका लिटिल चॅम्प रोहित राऊत या पर्वात सूत्रसंचालकाच्या भूमिकेत दिसणार आहे.जगभरातील मराठी रसिकांसाठी सारेगमपच्या नवीन पर्वाची सांगीतिक यात्रा अविस्मरणीय ठरेल.

राष्ट्रीय पारितोषिक विजेते, मराठी-हिंदी चित्रपटसृष्टीतील आघाडीचे दिग्दर्शक-निर्माते रवी जाधव आपलं मत व्यक्त करताना म्हणतात,"सर्वप्रथम सारेगमपचा परीक्षक ही भूमिका पार पाडण्यासाठी मी खूप उत्सुक आहे. महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात दडलेलं टॅलेंट शोधून काढणं खरंच आव्हानात्मक आहे, याचं कारण म्हणजे आजकलची तरुणपिढी संगीताबाबत इतकी जागरूक आहे आणि त्यांचं झपाटून टाकणारं सादरीकरण ऐकून त्यांच्यात डावं उजवं करणं खूप अवघड आहे. तरीही, जगभरातील संगीतप्रेमींना आपलासा वाटेल असा आवाज या स्पर्धेतून शोधून काढणं आणि मराठी संगीत क्षेत्राला नवं गानरत्न मिळवून देण्याचा माझा प्रामाणिक प्रयत्न असेल".

अनेक भाषांमधून आपल्या सुमधुर गायनाने रसिकांच्या मनाला भुलवणाऱ्या, मराठी चित्रपटसृष्टीतील सुप्रसिद्ध गायिका बेला शेंडे म्हणतात, "सारेगमप हा फक्त एक सिंगिंग रिऍलिटी शो नसून हा सुरांचा महायज्ञ आहे. आपली कला जगासमोर सादर करण्याची सुवर्णसंधी देणारा, मराठी मनांना आपलासा वाटणारा हा मंच आहे. महाराष्ट्रातल्या तरुणाईची ही अफाट ऊर्जा पाहून मी थक्क झाले. स्पर्धकांना मार्गदर्शन करताना, त्यांचे विचार जाणून घेताना मलाही खूप शिकायला मिळतंय.परीक्षकाची ही भूमिका मी खरंच खूप एन्जॉय करतेय. गुणवान स्पर्धक आपल्या गायकीने हा मंच भारावून टाकतील, यात शंकाच नाही. या पर्वात स्वरांचा हा दंगा महाराष्ट्रभर धुमाकूळ घालणार एवढं मात्र नक्की".

सारेगमपच्या नव्या पर्वात स्पर्धकांचा सुरेल पंगा, सप्तसुरांचा दंगा उडवून देण्यासाठी सज्ज झाला आहे. १३ नोव्हेंबरपासून, दर सोमवार आणि मंगळवार रात्री. ९.३० वाजता झी मराठी वाहिनीवर पाहता येणार आहे.



संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा