Advertisement

गायक वसंतराव देशपांडे यांची नात दीप्ती माटेचे 'बापजन्म' या चित्रपटातून पार्श्वगायनात पदार्पण


गायक वसंतराव देशपांडे यांची नात दीप्ती माटेचे 'बापजन्म' या चित्रपटातून पार्श्वगायनात पदार्पण
SHARES

निपुण धर्माधिकारी याचा बहुचर्चित 'बापजन्म' हा चित्रपट येत्या २९ सप्टेंबर रोजी संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे. या चित्रपटात सचिन खेडेकर, पुष्कराज चिरपुटकर, शर्वरी लोहोकरे, सत्यजित पटवर्धन हे प्रमुख भूमिका बजावत आहेत. 'बापजन्म' या चित्रपटाचे आणखी एक वैशिष्ट्य म्हणजे, या चित्रपटातून प्रख्यात शास्त्रीय गायक वसंतराव देशपांडे यांची नात दीप्ती माटे ही पार्श्वगायनात पदार्पण करत आहे. हा तिचा पहिलाच मराठी चित्रपट आहे. बापजन्म चित्रपटातील ‘मन शेवंतीचे फूल’ असे शब्द असणारे गाणे दीप्ती माटे यांनी गायले आहे. गाण्याचे बोल क्षितीज पटवर्धन यांनी लिहिले असून असून संगीत दिग्दर्शक गंधार संगोराम यांनी हे गाणं संगीतबद्ध केलं आहे.

दीप्ती माटे या प्रख्यात गायक वसंतराव देशपांडे यांची नात आणि आघाडीचा तरुण शास्त्रीय गायक राहुल देशपांडे यांची बहीण आहे. मराठी नाट्यसृष्टीत संगीत नाटकांमधून दिसणाऱ्या दीप्ती यावेळी ‘बापजन्म’ या चित्रपटातून पार्श्वगायनात पदार्पण करत आहेत.


बापजन्म चित्रपटातील ‘मन शेवंतीचे फूल’ या गाण्याच्या अनुभवाविषयी दीप्ती माटे म्हणाली की, ‘मी यापूर्वी नाट्य संगीत, त्याचबरोबर काही गझल व भावगीतेसुद्धा गायली आहेत. पण चित्रपटात कधीच गायन केले नव्हते. बापजन्म चित्रपटातील ‘मन शेवंतीचे फूल’ हे गाणे गायले, ते फक्त संगीतकार गंधारमुळे. मला हे गाणे गायला खूपच भीती वाटत होती. त्याला कारण असे होते की, माझ्या आजोबांनी व माझा भाऊ राहुल देशपांडे यांनी आमच्या घरातील गायकी इतक्या वर नेऊन ठेवली आहे की त्याला माझ्या गाण्याने कुठे धक्का लागू नये असे मला सतत वाटत राहायचे. या गाण्याच्या संगीताची पार्श्वभूमी ही पस्तीस वर्षांपूर्वीची असल्यामुळे मला खूप दडपण आले होते. पण, गंधार आणि राहुल या दोघांनी मला प्रोत्साहन दिले. या दोघांच्या पाठिंब्याशिवाय मी हे गाणे गाऊच शकले नसते.’

येत्या २९ सप्टेंबर रोजी 'बापजन्म' हा सिनेमा संपूर्ण महाराष्ट्रात प्रदर्शित होत आहे.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा