मराठी मालिकांसाठी त्याची शीर्षकगीते खूप महत्त्वाची असतात. या शीर्षकगीतांमधूनच प्रेक्षकांना मालिकेच्या कथेविषयी माहिती मिळते. नुकतेच 'कुंकू टिकली आणि टॅटू' या मालिकेच्या शीर्षक गीताचं रेकॉर्डिंग पुर्ण झालं आहे. या मालिकेचं शीर्षक गीत बॉलिवूड गायिका सुनिधी चौहानने गायलं आहे.
कुंकू टिकली आणि टॅटू या मालिकेच्या निमित्ताने सुनिधी चौहानचं हे पहिले मराठी शीर्षक गीत आहे. सुनिधी चौहानने या गाण्याला तिचा एक खास टच दिला आहे. ज्यामुळे हे गाणं अधिकच श्रवणीय झालं आहे. हे शीर्षक गीत मंदार चोळकर याने लिहिलं आहे. तर रोहन-रोहन यांनी या गाण्याचं संगीत दिग्दर्शन केलं आहे.
कुंकू, टिकली आणि टॅटू मालिकेतील शीर्षक गीतामध्ये सारिका निलाटकर, श्वेता पेंडसे आणि भाग्यश्री न्हावले तसेच मालिकेमध्ये आजी यांच्यावर चित्रित करण्यात आलं आहे. शीर्षक गीत चित्रित करताना तसेच ते लिहिताना मालिकेतील तीन विचारसरणीला प्राधान्य देण्यात आलं आहे.
कलर्स मराठीवर येत्या सोमवारपासून म्हणजेच २ एप्रिलपासून सुरू होणाऱ्या कुंकू टिकली आणि टॅटू या मालिकेत आधुनिकता आणि पारंपरिक या दोन्ही गोष्टींची उत्तमरीत्या सांगड घातलेली दिसून येते.