'अंड्या चा फंडा' सिनेमाचा ट्रेलर लाँच

 Mumbai
'अंड्या चा फंडा' सिनेमाचा ट्रेलर लाँच

धमाल मैत्रीचा गूढ फंडा मांडणारा 'अंड्याचा फंडा' हा आगामी सिनेमा येत्या 30 जूनला प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. बालपणाच्या मैत्रीवर आधारित असलेला हा सिनेमा अध्यास क्रिएशनचे विजय शेट्टी यांची निर्मिती असून प्रशांत पुजारी आणि इंदिरा शेट्टी यांनी त्याची सहनिर्मिती केली आहे. शिवाय 'सी.आय.डी.' आणि 'आहट' यांसारख्या मालिकांचे कथालेखन करणारे संतोष शेट्टी यांच्या दिग्दर्शकीय नजरेतून साकारण्यात आलेला हा सिनेमा रसिकांचे खुमासदार मनोरंजन करणारा आहे. 

अथर्व बेडेकर, शुभम परब आणि मृणाल जाधव या तीन बालकलाकारांच्या अभिनयाची जुगलबंदी असलेल्या या सिनेमाचा नुकताच ट्रेलर लाँच करण्यात आला. या सिनेमाच्या ट्रेलर लाँचवेळी सिनेमाच्या संपूर्ण टीमसोबतच 'सी.आय.डी.' फेम शिवाजी साटम, दयानंद शेट्टी आणि नरेंद्र गुप्ता या प्रसिद्ध तिकडींनीदेखील हजेरी लावली होती. 'अंड्या चा फंडा' या सिनेमाला प्रोत्साहन देण्यासाठी अभिनेता संजय कुलकर्णी तसेच 'सी.आय.डी.'च्या संपूर्ण कलाकारांनी उपस्थिती लावत, कार्यक्रमात एक वेगळीच चमक आणली.


दोन जिवलग मित्र आणि त्यांच्या कुरापती दाखवणाऱ्या या सिनेमाचा ट्रेलर प्रत्येकाला आपल्या बालमित्राची आठवण करून देणारा ठरेल, असा आहे. या सिनेमाच्या ट्रेलरमध्ये धमाल मैत्रीबरोबरच आणखीन बरेच काही दडले असल्याचे दिसून येते. शिवाय अनेक वर्ष सिनेसृष्टीपासून दूर राहिलेली अभिनेत्री दीपा चौधरीदेखील या ट्रेलरमध्ये दिसून येते. विशेष म्हणजे यात तिची प्रमुख भूमिका असून, या चित्रपटामार्फत ती पुन्हा एकदा सिनेसृष्टीत कमबॅक करणार आहे. 'अंड्या चा फंडा' या सिनेमाचा ट्रेलर पाहताना हा सिनेमा एका गूढ कथेचा मागोवा घेत असल्याचे लक्षात येते. पण हे गूढ नेमके काय आहे याचे स्पष्टीकरण मिळत नसल्याने प्रेक्षकांची उत्कंठा वाढवण्यास 'अंड्या चा फंडा' या सिनेमाचा ट्रेलर पूर्णतः यशस्वी ठरला आहे.

सिनेमाच्या ट्रेलरसोबतच अथर्व आणि शुभमवर आधारित असलेले 'डुबुक डुबुक' हे गाणेदेखील उपस्थित पाहुण्यांसमोर सादर करण्यात आले. अंड्या आणि फंडयाच्या अनोख्या मैत्रीची झलक या गाण्यात पाहायला मिळते. लहानपणाची निरागस मैत्री आणि मैत्रीतील निस्वार्थ प्रेम दाखवणारे हे गाणे आहे. हर्षवर्धन वावरे यांनी गायलेल्या या गाण्याचे लेखन क्षितीज पटवर्धन यांनी केले असून, त्याचे अमितराज यांनी संगीतदिग्दर्शन केले आहे.

दिग्दर्शक संतोष शेट्टी यांची कथा असलेल्या या सिनेमाची पटकथा आणि संवाद अंबर हडप, गणेश पंडित आणि श्रीपाद जोशी यांनी लिहिली असल्यामुळे 'अंड्या चा फंडा' या सिनेमात दर्जेदार लेखनाची गंमत पाहायला मिळणर आहे. लवकरच प्रदर्शित होत असलेल्या या सिनेमात अथर्व बेडेकर, शुभम परब, मृणाल जाधव या बालकलाकारांसोबतच दीपा चौधरी, सुशांत शेलार आणि अरुण नलावडे यांची देखील प्रमुख भूमिका असणार आहे.

Loading Comments