महाराष्ट्राने खाल्ले विकिशाच्या लग्नाचे पेढे!

बिझनेसमन विक्रांत सरंजामे आणि त्याच्या पेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या ईशा निमकरच्या या लव्ह स्टोरीने प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. नुकताच मोठ्या थाटात या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. महाराष्ट्राच्या विविध भागात या लग्नानिमित्त पेढेही वाटण्यात आले.

SHARE

झी मराठी वाहिनीवर सुरू असलेल्या 'तुला पाहते रे' या मालिकेनं रसिकांना अक्षरश: वेड लावलं आहे. बिझनेसमन विक्रांत सरंजामे आणि त्याच्या पेक्षा वयाने कितीतरी लहान असलेल्या ईशा निमकरच्या या लव्ह स्टोरीने प्रेक्षकांवर मोहिनी घातली आहे. नुकताच मोठ्या थाटात या दोघांचा विवाह सोहळा पार पडला. महाराष्ट्राच्या विविध भागात या लग्नानिमित्त पेढेही वाटण्यात आले.


विकीशाच्या लग्नाचे स्टँडीज

बऱ्याच ठिकाणी विक्रांत-ईशा म्हणजेच विकीशाच्या लग्नाचे स्टँडीज लावण्यात आले होते. विशेषत: मुंबई-पुण्यासारख्या बऱ्याच शहरांमध्ये काही मिठाईच्या दुकानांमध्ये अशा प्रकारचे स्टँडीज पाहायला मिळाले. विकीशाच्या लग्नाचा दोन तासांचा हा विशेष सोहळा पाहण्यासाठी सुट्टीच्या दिवशी सर्वांनीच सातच्या आत कामं आटोपून टीव्हीसमोर ठाण मांडलं. त्यापूर्वी सकाळपासून काही जण एकमेकांना 'लग्नाला येणार ना!' अशा आशयाचे प्रश्न विचारताना दिसले.


नवीन वर्षातील पहिला शाही लग्नसोहळा

मराठी मालिकांमध्ये बऱ्यापैकी नायक आणि नायिकेच्या लग्नाला प्राधान्य असतं. सर्व प्रेक्षकांना ज्या लग्नाचे वेध लागले होते तो नवीन वर्षातील पहिलाच शाही लग्नसोहळा संपन्न झाला आहे. विकिशाच्या लग्नाच्या सर्व विधी तसंच हळद, मेहंदी, संगीत, साखरपुडा हे समारंभ भोरमध्ये अगदी धुमधडाक्यात आणि निर्विघ्नपणे पार पडले. विक्रांत सरंजामेसारख्या मोठ्या बिझनेसमनचं लग्न म्हटल्यानंतर त्या लग्नात भव्यता पण तितकीच होती.


२०० किलो पेढ्यांचं वाटप

महाराष्ट्रातील तमाम मराठी आणि इतर भाषिक रसिक प्रेक्षक या जोडीवर आणि मालिकेवर प्रेमाचा वर्षाव करतात. त्यांची लाडकी जोडी विवाहबंधनात अडकली याचा आनंद प्रेक्षकांतदेखील तितक्याच जोशात साजरा झाला. इशा आणि विक्रांत यांच्या लग्न सोहळ्यानिमित्त कोल्हापूर, नागपूर, डोंबिवली, दादर आणि ठाणे येथे २०० किलो पेढ्यांचं वाटप करून प्रेक्षकांचं तोंड गोड करण्यात आलं. 'तुला पाहते रे' ही मालिका प्रेक्षकांसाठी फक्त टीव्ही पुरतीच मर्यादित राहिली नसून, त्यातील व्यक्तिरेखा या प्रेक्षकांमधील एक झाल्या आहेत हे यावरून लक्षात येतं.

संबंधित विषय
ताज्या बातम्या