Advertisement

रोहित शेट्टी मराठी कलाकारांना चित्रपटात संधी का देतो? म्हणाला, महाराष्ट्राचा...

मराठी कलाकारांना आपल्या चित्रपटात कास्ट करण्यामागचे खरे कारण रोहितने हास्यजत्रेच्या मंचावर उघड केले आहे.

रोहित शेट्टी मराठी कलाकारांना चित्रपटात संधी का देतो? म्हणाला, महाराष्ट्राचा...
SHARES

रोहित शेट्टीचा मल्टीस्टारर 'सर्कस' हा चित्रपट आज सर्वत्र प्रदर्शित झाला आहे. रणवीर सिंगची प्रमुख भूमिका असलेल्या या चित्रपटाची चाहत्यांना खूप उत्सुकता होती. रोहितच्या या चित्रपटात रणवीर सिंग, जॅकलिन फर्नांडिस, संजय मिश्रा, पूजा हेगडे, वरुण शर्मा, जॉनी लिव्हर आणि मुरली शर्मा यांच्यासह सिद्धार्थ जाधव, विजय पाटकर, अश्विनी काळसेकर, सुलभा आर्या या मराठमोळ्या कलाकारांच्याही महत्त्वपूर्ण भूमिका आहेत. आपल्या या चित्रपटाच्या प्रमोशनच्या निमित्ताने रोहितने नुकतीच चित्रपटातील कलाकारांसह 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या लोकप्रिय कार्यक्रमात हजेरी लावली.

खरं तर रोहितच्या चित्रपटांमध्ये मराठी कलाकार हमखास झळकतात. मराठी कलाकारांना आपल्या चित्रपटात कास्ट करण्यामागचे खरे कारण रोहितने हास्यजत्रेच्या मंचावर उघड केले आहे.

रोहित म्हणाला, "माझ्या चित्रपटांमध्ये अनेक मराठी कलाकार दिसतात. तुझ्या चित्रपटात तू मराठी कलाकारांना का घेतोस असा प्रश्न मला अनेक जण विचारतात. यावर माझे असे एक ठाम मत आहे. मला प्रामाणिकपणे वाटते की मराठी कलाकार हे खूप प्रतिभावान आहेत आणि असे असूनही ते तितकेच साधेही आहेत. ते अहंकारी नसतात."

रोहित पुढे म्हणाला, "आपल्याला उत्तम अभिनय येतो म्हणून नखरे करणारे अनेक कलाकार इंडस्ट्रीत आहेत. पण मराठी कलाकार कुठल्याही परिस्थितीशी जुळवून घेतात. यासोबतच मला माझ्या चित्रपटांमधून जे उत्पन्न मिळते त्यात 60 टक्के वाटा महाराष्ट्राचा आहे. त्यामुळेच माझ्या चित्रपटात जाणीवपूर्वक मराठी कलाकार असतात," असे म्हणत रोहित शेट्टीने मराठी कलाकारांचे कौतुक केले आहे.

महाराष्ट्राची हास्यजत्राच्या मंचावर मराठी कलाकारांसह सर्कसच्या टीमने खूप धमाल केली. दरम्यान आज प्रदर्शित झालेल्या या चित्रपटाची टक्कर अजय देवगणच्या 'दृश्यम 2' आणि जेम्स कॅमेरॉन यांच्या 'अवतार 2'सोबत आहे. आता या चित्रपटांना 'सर्कस' कशी टक्कर देणार हे चित्र लवकरच स्पष्ट होईल.



हेही वाचा

...तर पठाण चित्रपट प्रदर्शित होऊ देणार नाही, भाजप नेते राम कदम यांची धमकी

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा