Advertisement

हे वॉटरफॉल की दारूचे अड्डे?


हे वॉटरफॉल की दारूचे अड्डे?
SHARES

हिरवागार डोंगर, घनदाट जंगलातून जाणारी रानवाट आणि पांढरा शुभ्र धबधबा आणि खळखळ वाहणारी नदी... मस्त आल्हाददायक, आनंददायी आणि प्रसन्न वातावरण होतं. मला तर तिथून घरी जाण्याची इच्छाच होत नव्हती. पावसाळा म्हटला की, माझे दरवर्षीचे तीन-चार प्लॅन्स असतातच. यावर्षी म्हटलं भिवपुरी धबधब्याला भेट द्यावी. मुंबईहून ९० किलोमीटर अंतरावरचा भिवपुरी धबधबा तसा प्रसिद्ध. ठरल्यानुसार आमची गँग धबधब्याजवळ पोहोचली. तिथलं चित्र पाहून तर आम्ही चकितच झालो. ना कचरा, ना दारुच्या बाटल्या, ना प्लॅस्टिक... मला तर विश्वासच बसत नव्हता.

धबधब्याजवळचा परिसर म्हटला की, डोळ्यांसमोर उभं राहतं ते केवळ एकच चित्र आणि ते म्हणजे दारुच्या बाटल्या, प्लॅस्टिकच्या पिशव्या, पेपरप्लेट्सचा कचरा...पण भिवपुरी धबधब्याचा काही तरी भलताच मामला होता! अगदी हॅरी पॉटरनं जादूची छडी फिरवावी आणि उकिरडा गायब व्हावा, अशातला प्रकार भासत होता. पण हे तितकं काही सोपं नव्हतं. पण हे सर्व शक्य झालं ते निसर्गप्रेमी धर्मेश बरई यांच्या पुढाकारामुळे. धर्मेश बरई यांची संस्था 'एन्व्हायर्नमेंट लाईफ'च्या प्रयत्नांमुळे भिवपुरी धबधब्याजवळचा परिसर आज ऑक्सिजन घेतोय. 


यासंदर्भात धर्मेश बरई यांच्याशी केलेली बातचित... 


वॉटरफॉल क्लीनअप ड्राईव्हची संकल्पना कशी सुचली?


मी २०१० साली खोपोलीच्या झेनिथ वॉटरफॉलवर गेलो होतो. तिकडचं दृश्य भयानक होतं. सगळीकडे दारुच्या बाटल्या, काचा, कचरा, प्लॅस्टिक पडलेलं होतं. कित्येकांच्या पायाला त्या काचा लागत होत्या. मी ३० हून अधिक वॉटरफॉलला भेट दिली आहे. सर्वत्र एकच चित्र. हे चित्र पाहून मला जाणवलं की खरंच इथे क्लिनअपची गरज आहे. पण सुरुवात कशी करायची हे मला कळत नव्हतं. त्यामुळे मी गुगलवर माहिती घेण्याचा प्रयत्न केला. मला चीनचा एक व्हिडिओ सापडला. तिथे 'वॉटरफॉल क्लीनअप ड्राइव्ह' उपक्रम राबवला जातो. त्यावरुन मला 'वॉटरफॉल क्लिनअप ड्राइव्ह'ची संकल्पना सुचली. भारतात पहिलाच असा उपक्रम आम्ही राबवत आहोत. यासाठी आम्ही वॉटरफॉल जवळ राहणाऱ्या गावकऱ्यांनाही या उपक्रमात सहभागी करुन घेतलं.


येत्या काळात कोणत्या वॉटरफॉलवर तुम्ही क्लीनअप मोहीम राबवणार आहात?


या वेळी आम्ही भिवपुरी क्लीनअप मोहीम राबवण्याची जोखीम उचलली. पण पावसाळ्यात वॉटरफॉल क्लीनअप करणं खूप अवघड असतं. कारण प्रचंड पाऊस पडत असतो. अनेकांना यायला जमत नाही. त्यामुळे पावसाळ्यात ही मोहीम राबवणं कठिण जातं. पण आता पावसाळ्यानंतरच म्हणजे ऑक्टोबर किंवा नोव्हेंबरमध्ये आम्ही वॉटरफॉल क्लीनअपची मोहीम राबवणार आहोत. पुढचा कोणता वॉटरफॉल असेल हे अजून निश्चित नाही. वसईचा तुंगारेश्वर, नानेघाट किंवा रोहा हे वॉटरफॉल सध्या आमच्या लिस्टमध्ये आहेत. त्यामुळे येत्या काळात कुठल्या वॉटरफॉलवर क्लीनअप करायचं यावर लवकरच निर्णय घेऊ.


आतापर्यंत कुठे-कुठे वॉटरफॉल क्लीनअप मोहीम राबवली? प्रशासनानं किती साथ दिली?


केवळ भिवपुरीच नाही तर कर्जत, नेरळ, वसई, खारघर, बदलापूर इथले आठ धबधबे स्वच्छ केले आहेत. आनंदवाडी, जुम्मापट्टी, टपालवाडी, झेनिथ, चिंचोटी, कोंडेश्वर, पांडवकडा आणि भिवपुरी या धबधब्यांवर स्वच्छता मोहीम राबवण्यात आली. इतक्या मोठ्या प्रमाणात दारुच्या बाटल्या आणि कचरा निघाला की, जास्त स्वयंसेवक नसते, तर हे शक्य झालं नसतं. स्वयंसेवी संस्थांसोबत प्रशासनानंही हातभार लावला. कोंडेश्वर वॉटरफॉल क्लीनअपसाठी तिथले नगरसेवक प्रशांत कुलकर्णी यांच्याकडे आम्ही मदत मागितली. त्यांच्यामुळे पालिकेतील काही कामगार आमच्यासोबत या क्लीनअप ड्राईव्हमध्ये सहभागी झाले. तेव्हा कुठे हजार किलो कचरा कोंडेश्वर वॉटरफॉल परिसरातून निघाला होता.


- धर्मेश बरई, मुख्य समन्वयक, एन्व्हायर्नमेंट लाईफ

धर्मेश बरई यांनी यासंदर्भात महाराष्ट्र टुरिजम डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन आणि सीएमओ कार्यालयाला पत्र लिहिलं आहे. त्यात त्यांनी निसर्गरम्य स्थळांवर दारुबंदीची मागणी केली आहे. दारुबंदी झाली, तर अपघात आणि इतर अनुचित घटना घडणार नाहीत.

'एन्व्हायर्नमेंट लाईफ' या संस्थेच्या सदस्यांनी सुरू केलेल्या मोहिमेला हातभार लावला तो मुंबईतील कॉलेजमधल्या विद्यार्थ्यांनी, उमरोली आणि आशाणे ग्रामपंचायत सदस्यांनी, आनंदवाडीमधल्या स्थानिक गावकऱ्यांनी आणि काही ट्रेकर्स ग्रुपनी. या स्वच्छता मोहिमेत मुंबईतील जीटीबी नगरचे गुरुनानक महाविद्यालय, नेरळ विद्यामंदिर, जे जे कॉलेजचे काही विद्यार्थीही सहभागी होते. सहा-सात तास भिवपुरी परिसर स्वच्छ केल्यानंतर निसर्गानं जवळपास अडीच हजार किलो कचरा बाहेर ओकला. बापरे...सर्वात धक्कादायक म्हणजे या कचऱ्यात ९० टक्के दारुच्या बाटल्या होत्या!


आम्ही जेव्हा वॉटरफॉल परिसरात क्लीनअपसाठी गेलो होतो, तेव्हा किती तरी ग्रुप दारू पीत तिकडे बसले होते. यामुळे मुलींच्या सुरक्षेचा प्रश्न निर्माण होतो. दारू पिऊन कुठलाही अपघात होऊ शकतो. त्यामुळे वॉटरफॉलच्या जागी दारू बंद केली पाहिजे. या शिवाय महिलांसाठी चेंजिंग रूम्स आणि टॉयलेटची सुविधा देण्यात आली पाहिजे. सर्वात महत्त्वाचं म्हणजे अशा ठिकाणी सुरक्षा गार्ड तैनात केले पाहिजेत.

- तृप्ती बरई, सदस्य, एन्व्हायर्नमेंट लाईफ

निसर्गरम्य स्थळी दारुच्या बाटल्या नेण्यास परवानगी नाही. तरी पर्यटक नियम धाब्यावर बसवून सर्रास दारुच्या बाटल्या आणतात.

मजा, मस्ती करायला आपण निसर्गाच्या सानिध्यात जातो. पण त्यासोबतच पर्यावरणाचाही विचार करणंही गरजेचं आहे. आपण तिकडे खातो, तो कचरा तिकडेच टाकतो. तो कचरा तिकडेच राहून कुजतो. त्यात जर कुणाला दुखापत झाली तर त्यातून इन्फेक्शन होऊ शकतं. पाण्याच्या तळाला जाऊन त्या बाटल्या तशाच राहतात. त्यात कचरा साचतो. त्यामुळे पाणीही खराब होते. हे खराब पाणी पोटात गेल्यावर पर्यटकांना अनेक आजार होऊ शकतात.

- डॉ. नयना शिर्के, हिंदुजा हॉस्पिटल, खार

पावसाळ्यात पर्यटनामुळे नक्कीच आसपासच्या गावकऱ्यांना रोजगार मिळतो. पण एका नाण्याच्या दोन बाजू असतात ना, त्याचप्रमाणे गावकऱ्यांना पर्यटकांच्या काही गोष्टींमुळे त्रासही होतो.

दारू पिऊन पर्यटक येतात किंवा तिथेच दारू पितात. गावातूनच येण्याजाण्याचा रस्ता असल्यानं काही अनुचित घटना घडण्याची भिती गावकऱ्यांमध्ये असते. कित्येकदा 'दारू पिऊ नका' असं सांगायलाही भीती वाटते. एक-दोनदा 'इथे दारू पिऊ नका' असं सांगण्याचा प्रयत्न केला होता. पण समोरचा दारूच्या नशेत असल्यानं शिवीगाळ करायचा. पोलिसात याबद्दल तक्रारही केली. गावकऱ्यांना रोजगार मिळत असला, तरी काही गोष्टींचा त्रास होतो. गावातली मंडळी कधी धबधब्यावर किंवा शेतावर गेली की, तिकडे दारूच्या बाटल्यांचा खच किंवा फुटलेल्या बाटल्यांच्या काचा पडलेल्या असतात. त्यामुळे अनेकदा गावकऱ्यांना दुखापतही झाली आहे. 

- सोपान खानगे, सदस्य, ग्रामपंचायतमुंबईजवळ असलेले लोकल टुरिझम स्पॉर्ट्स हे खूप महत्त्वाचे आहेत. त्यामुळे महाराष्ट्र टुरिझम डेव्हलपमेंटनं खालील गोष्टींकडे लक्ष देणं आवश्यक आहे.

१) धबधबा परिसरात दारू नेण्यावर बंदी आवश्यक
२) चेंजिंग रूम आणि शौचालय या सोयी-सुविधांची आवश्यकता
३) देखरेखीसाठी सुरक्षा गार्ड किंवा पोलिस तैनात करण्याची गरज
४) सर्व वॉटरफॉलजवळ माहिती देणारे बोर्ड असले पाहिजे. वॉटरफॉलचं नाव, तो वॉटरफॉल कोणत्या झोनमध्ये येतो? त्या झोनचा कोण हेड आहे?
५) काय करावं आणि काय करू नये याचे सूचना फलक लावले पाहिजेत.
६) लोकल टुरिझमला प्रमोट करुन त्याला अर्निंग सोर्स बनवता येऊ शकतो. वॉटरफॉल सारख्या जागी प्रवेश फी आकारली गेली पाहिजे. जेणेकरुन त्याचा फायदा महाराष्ट्र टुरिझमला होईल.
७) काही ठिकाणी कचऱ्याचे डबे नसतात. त्यामुळे कचऱ्याचे डबे जागोजागी लावले पाहिजेत.
८) मुंबईजवळील वॉटरफॉल्सच्या ठिकाणी विकास झाला, तर तिथल्या गावकऱ्यांनाही रोजगार मिळू शकतो.भंडारदरा, माळशेज, भूशी डॅम, चिंचोटी या सर्व वॉटरफॉलच्या ठिकाणी चांगल्या सोईसुविधा पुरवण्यात आल्या आहेत. अशाच सोईसुविधा मुंबई जवळच्या वॉटरफॉल्सच्या इथे पुरवणे आवश्यक आहे. याचा फायदा हा पर्यटन क्षेत्रालाच होईल. जेवढी जबाबदारी ही प्रशासनाची आहे, तेवढीच जबाबदारी ही आपलीसुद्धा आहे.
डाऊनलोड करा Mumbai live APP आणि रहा अपडेट

मुंबईशी जोडलेली प्रत्येक बातमी आणि अपडेट मिळवण्यासाठी Mumbai live च्या फेसबुक पेजला लाईक करा

(खाली दिलेल्या कमेंट बॉक्समध्ये तुमच्या प्रतिक्रिया अवश्य द्या)

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा