Advertisement

मुंबईत पिंगा घालणारे 'चतुर' आहेत तरी कोण?


मुंबईत पिंगा घालणारे 'चतुर' आहेत तरी कोण?
SHARES

त्याचं विचित्र रूप..पण हवाई हल्लेखोर असा त्याचा दरारा! स्वच्छ निळ्या आभाळात त्यांची टोळी जणू पकडापकडीच खेळते! काही गोल-गोल घिरट्या मारतात, तर काही झाडांवर, गवतांवर स्तब्ध बसून विश्रांती घेतात. छोटे, नाजूक आणि रंगीबेरंगी अशा चतुरांची टोळी सध्या मुंबईची टेहळणी करताना आपण पाहिली असेलच

पावसाळ्यादरम्यान हे चतुर आपल्या आवतीभोवती हवाईसफर करत असल्याचं नजरेस पडतात. या सर्वांहून अधिक गूढ या किटकांचा जीवनप्रवास आहे. चतुर फक्त पावसातच कसे दिसतात? बाकी दिवस ते कुठे असतात? ते कुठून येतात? चतुर किटकांच्या जीवनप्रवासातील याच रहस्यांचा उलगडा आम्ही करणार आहोत.


सौजन्य


चतुरांचं आयुष्य म्हणजे प्रवास...

चतुर हे खूप लांबचा प्रवास करून भारतात येतात. त्यांचा आयुष्यातील सर्वाधिक काळ हा प्रवासातच जातो. त्यामुळे त्यांची निश्चित जागा सांगणं तसं कठिणच आहे. मात्र सर्वमान्य समजाप्रमाणे हे चतुर पक्षी थेट दक्षिण आफ्रिकेहुन भारतात येतात. आफ्रिकेतून लक्षद्वीपचा टप्पा घेत ते प्रवास करतात. त्या दरम्यान त्यांचं प्रजनन होतं


पहिल्या पिढीने सुरुवात, तर चौथ्या पिढीवर शेवट!

भारतातल्या किनारपट्टीवर आल्यावर त्यांचं पुन्हा प्रजनन होतं. लक्षद्वीप बेटांचा आसरा घेत हजारो किलोमीटरचा प्रवास करताना चतुरांची चौथी पिढी मूळ जागी पोहोचलेली असते. आफ्रिकेत परत जाताना याच पद्धतीने लक्षद्वीप बेटांवर थांबा घेतला जातो. पावसाचा पाठलाग करतच चतुर प्रवास करतात. पाऊस भारतातून गेला की त्याचा पाठलाग करत चतुरही रवाना होतात. काही चतुर हे वाळवंटात देखील आढळले आहेत. फक्त बर्फाळ प्रदेश सोडला, तर उष्ण आणि दाट प्रदेशात चतुरांचा वावर आढळतो.


सौजन्य


डासांवर रामबाण उपाय चतुर

डास हे चतुरांचे मुख्य भक्ष्य आहेत. त्यामुळे काही देशांमध्ये डासांच्या संख्येवर नियंत्रण मिळवण्यासाठी चतुरांचा वापर केला जातो.


पृथ्वीवरील जुने वंशज

चतुरांना पृथ्वीवरील पहिले हवाई हल्लेखोर होण्याचा मान मिळाला आहे. पृथ्वीतलावर सुमारे ३०० ते ३५० दशलक्ष वर्षांपासून चतुरांचे अस्तित्व आहे, असं म्हटलं तर काही वावगं ठरणार नाही. चतुरांचा पूर्वज म्हणजे ६५ ते ७० सेंटीमीटर लांब असा मेगान्यूरा. त्याचे आजचे वंशज म्हणजे हे चतुर. त्यामुळे आज जिवंत असणाऱ्या सर्वात जुन्या जिवांमध्ये चतुरांचा समावेश होतो. जगभरात चतुरांच्या जवळपास 4 हजारांवर जाती आहेत. 


चतुरांची उड्डाणकला न्यारीच!

चतुरांची उडण्याची पद्धत आश्चर्यकारक असते. पुढे, तसेच मागच्या बाजूला म्हणजे रिव्हर्समध्ये, डावी आणि उजवीकडे चतुर अगदी सहज उडू शकतात. त्यामुळे कुणाला समजायच्या आतच ते उडण्याची दिशा बदलतात. ताशी ९६ किलोमीटरपर्यंत सुसाट वेग वाढवून चतुर कधी तुमच्या डोळ्यांसमोरून नाहीसे होतील, याचा पत्ता देखील लागणार नाही!


सौजन्य


चतुरांचं डोकं म्हणजेच डोळे!

मण्यांसारखे दोन संयुक्त डोळे. हे कमी की काय, आणखी तीन डोळे कपाळावर असतात. त्यामुळे चतुरांचं डोकं हे पूर्णपणे डोळ्यांनी घेरलेलं असतं. चतुरांना त्यांचं डोकं कसंही, कुठेही वळवता येतं. त्यामुळे हव्या त्या कोनातून ते पाहू शकतात. चतुरांची शरीर रचना त्यांच्या जीवनपद्धतीला साजेशी असते. चतुरांचे पंख निमुळते, चिवट आणि लवचिक असतात. त्यांच्या सहा पायांचा उपयोग चालण्यापेक्षा भिंतीवर आधार घेण्यासाठी होतो. काटेरी पाय आणि जबड्याच्या मदतीनं चतुर भक्ष्याचा हवेतच फज्जा उडवतात. चतुर हे मांसाहारी शिकारी आहेत. माश्या, मधमाश्या, डास, चिलटे, फुलपाखरं आदी किटक चतुरांचे शिकार आहेत.


सौजन्य


चतुरांच्या मीलनाची अजब तऱ्हा!

चतुरांची मीलन प्रक्रिया इतर किटकांपेक्षा खूप वेगळी आहे. आकाशातल्या ठराविक हद्दीमध्ये नर मादीची वाट पाहत पिंगा घालत असतात. मादी आल्यानंतर त्यांचा एकमेकांमागून पळण्याचा खेळ सुरू होतो. प्रथम नर आपल्या शेपटीच्या टोकाकडून त्याचे शुक्राणू पोटाच्या पुढच्या भागावरवर आणून ठेवतो. त्यानंतर नर मादीच्या पाठीवर आरूढ होऊन तिचे डोके स्वत:च्या शेपटीजवळील पायांनी पकडतो. त्यानंतर मादी आपली शेपटी मागे वळवते आणि शेपटीचे टोक नराच्या पोटापुढच्या भागावर आणते.


सौजन्य


चतुर दोन-तीन वर्ष पाण्याखाली राहतात

चतुर आपली अंडी बहुधा तळ्याच्या वा डबक्याच्या काठावर किंवा चिखलात घालतात. काही आठवड्यात अंड्यांमधून अळ्या बाहेर पडतात. या अळ्या पूर्णपणे पाण्याखाली जगतात. या अळ्या दोन-तीन वर्षांपर्यंत पाण्यातच वावरतात. पण पाण्यातून बाहेर पडताच अवघे सहा-सात महिनेच ते जगतात. जलचर छोटे किडे आणि मासे हे या अळ्यांचे भोजन असते. अळ्या असल्या तरी त्यांची शक्ती जबरदस्त असते. त्यांच्या मजबूत जबड्यानं ते शिकार करतात. पाण्यात असताना चतुरांच्या अळ्या इतर किटकांसारख्याच १५ वेळा कात टाकतात. प्रत्येक वेळी कात टाकल्यानंतर अळीचं रूप बदलत जातं.



हेही वाचा - 

प्राण्यांचे 'हे' व्हिडिओ तुम्ही पहायलाच हवेत!


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा