पर्यावरण संवर्धनाच्या दिशेने एक अभिनव पाऊल उचलत, नवी मुंबई (navi mumbai) महानगरपालिकेने (nmmc) गेल्या वर्षीच्या गणेश विसर्जनानंतर जमा केलेल्या 'प्लास्टर ऑफ पॅरिस'च्या (POP) 700 गणेश मूर्तींवर (idols) प्रक्रिया करून त्यापासून 760 अभ्यासाची टेबले (study tables) तयार केली आहेत.
मुंबई उच्च न्यायालयाचे निर्देश आणि महाराष्ट्र शासनाच्या पर्यावरणविषयक मार्गदर्शक तत्त्वांचे पालन करून, महानगरपालिकेने गणेशोत्सवादरम्यान 146 कृत्रिम विसर्जन तलाव उभारले होते.
या तलावांमध्ये विसर्जित केलेल्या सुमारे 8,000 POP मूर्ती गोळा करून त्या वैज्ञानिक पद्धतीने पुनर्प्रक्रियेसाठी सुरक्षितपणे साठवून ठेवण्यात आल्या होत्या.
तज्ज्ञांचे तांत्रिक मार्गदर्शन आणि 'हाइनेकेन इंडिया प्रायव्हेट लिमिटेड' व 'बीच प्लीज इंडिया लिमिटेड' यांच्या सीएसआर (CSR) निधीतून मिळालेल्या सहकार्यामुळे, 'रोटरी क्लब ऑफ नवी मुंबई'च्या संयुक्त विद्यमाने हा प्रकल्प राबवण्यात आला.
760 अभ्यासाची टेबले तयार करण्यासाठी सुमारे 1,500 किलो पुनर्प्रक्रिया केलेल्या POP चा वापर करण्यात आला.
तयार झालेली ही नवीन अभ्यासाची टेबले रबाळे येथील आंबेडकर नगरमधील 'राजर्षी छत्रपती शाहू महाराज महानगरपालिका माध्यमिक शाळा क्रमांक 104' मधील विद्यार्थ्यांना वाटप करण्यात आली आहेत.
महानगरपालिकेने सांगितले की, आता या प्रकल्पाच्या पुढील टप्प्यावर काम सुरू आहे. यामध्ये उर्वरित POP मूर्तींवर वैज्ञानिक प्रक्रिया करून त्यापासून भविष्यातील वापरासाठी पुन्हा उपयोगात आणण्यायोग्य POP तयार केले जाईल.
शाश्वत पुनर्प्रक्रिया मॉडेल विकसित करण्यासाठी 'इन्स्टिट्यूट ऑफ केमिकल टेक्नॉलॉजी' (ICT), मुंबई यांच्याशी चर्चा सुरू आहे.
महानगरपालिकेने स्पष्ट केले की, हा उपक्रम राज्याच्या 'माझी वसुंधरा' मोहिमेअंतर्गत पर्यावरण संवर्धनासाठी असलेल्या व्यापक कटिबद्धतेचा एक भाग आहे.
या मोहिमेत नवी मुंबईला महाराष्ट्रातील आघाडीच्या आणि पर्यावरणदृष्ट्या शाश्वत शहरांपैकी एक म्हणून ओळख मिळाली आहे.
