Advertisement

कांदिवलीतील ‘तो’ डोंगर धोकादायक, भुसभुशीत असल्यानं ढासळण्याची भीती

मंगळवारी कांदिवलीत डोंगराचा अर्धा भाग ढासला होता. पण पूर्ण डोंगर भुसभुशीत असल्यानं भविष्यात हा डोंगर धोकादायक ठरू शकतो.

कांदिवलीतील ‘तो’ डोंगर धोकादायक, भुसभुशीत असल्यानं ढासळण्याची भीती
SHARES

मुसळधार पावसामुळे मंगळवारी सकाळी कांदिवली परिसरातील बांडडोंगरीजवळ पश्चिम द्रुतगती महामार्गावर दरड कोसळून वाहतूक कोंडी झाली होती. मातीचा ढिगारा हटवून महामार्गावरील दोन मार्गिका वाहतुकीसाठी मोकळा करण्यात आला आहे. पण सध्या हा डोंगर धोकादायक ठकू शकतो, असं भूगर्भशास्त्रज्ञांचं म्हणणं आहे.

परंतु डोंगराचा काही भाग ढासळण्याची शक्यता आहे. ही बाब लक्षात घेत उर्वरित मातीचा ढिगारा उपसण्याचं निर्णय मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएनं संयुक्तपणे घेतला आहे. त्यामुळे तूर्तास या परिसरातील द्रुतगती महामार्गावरील दोन मार्गिका वाहतुकीसाठी बंदच ठेवण्यात येणार आहेत.

मुंबईत सोमवारी रात्रीपासूनच मुसळधार पाऊस कोसळत होता. त्यामुळे मंगळवारी सकाळी बांडडोंगरी जवळील डोंगराचा काही भाग ढासळला. याचा परिणाम वाहतूकिवर झाला. पश्चिम द्रुतगती महामार्गावरील वाहतूक ठप्प झाली. मुंबई महापालिका आणि एमएमआरडीएच्या अधिकाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेतली. मातीचा ढिगारा उपसून महामार्ग वाहतुकीसाठी मोकळा करण्याचे काम युद्धपातळीवर हाती घेण्यात आले.

भूगर्भशास्त्र अभ्यासकांना घटनास्थळी पाचारण करण्यात आलं. संबंधित डोंगरावर विद्युतपुरवठा करणाऱ्या वाहिन्यांचा मनोरा उभा आहे. तसंच डोंगर भुसभुशीत आहे. ढिगारा उपसताना दरड कोसळण्याची भीती आहे. ही बाब लक्षात येताच तज्ज्ञ मंडळींच्या सल्ल्यानुसार महामार्गावरील उर्वरित मातीचा ढिगारा हटवण्याचं काम हाती घेण्याचा निर्णय दोन्ही यंत्रणांनी घेतला.

महामार्गावरील दोन मार्गिका माती हटवून मंगळवारी सायंकाळी ५ वाजता वाहतुकीसाठी खुल्या करण्यात आल्या. उर्वरित दोन मार्गिकांवरील मातीचा ढिगारा दोन-तीन दिवसांत हटवून रस्ता वाहतुकीसाठी खुला करण्यात येईल, असं अधिकाऱ्यांनी सांगितलं.





संबंधित विषय