Advertisement

'ते' दोघे 12 वर्षांपासून रेखाटतात वास्तवादी चित्रं


'ते' दोघे 12 वर्षांपासून रेखाटतात वास्तवादी चित्रं
SHARES

इच्छाशक्ती असेल, तर सर्व काही साध्य करता येते. याचेच एक उदाहरण म्हणजे चित्रकार निलेश पाटील आणि गोकुळ पाटील. अलिबागला राहणारे निलेश आणि वांगणीला राहणारे गोकुळ हे दोघे एकमेकांचे अगदी जिवलग मित्र आहेत.

कलेची आवड असल्यामुळे 12 वर्षांपूर्वी आर्ट मास्टरसाठी खोपोलीच्या जनता शिक्षण संस्थेत शिक्षण घेण्यासाठी आलेल्या निलेश आणि गोकुळ या दोन मित्रांची भेट झाली. बालपणापासून चित्रकलेची आवड असलेल्या या दोघांची कलेची आवड जुळली आणि पुढील काळात वास्तववादी चित्रे रेखाटण्याचा दोघांनी निर्णय घेतला.



गेल्या 12 वर्षांत या दोन्ही कलाकारांनी हजारो चित्रे रेखाटली आहेत. 32 वर्षांचे निलेश आणि 35 वर्षांचे गोकुळ हे दोघेही चित्रकलेचे शिक्षक आहेत. निलेश सध्या अलिबागच्या कोकण एज्युकेशन सोसायटी इंग्रजी माध्यमाच्या शाळेत पहिली ते सातवीच्या विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवतात, तर गोकुळ एेरोलीच्या डी. ए. व्ही. पब्लिक स्कूलच्या पाचवी ते 12 वी पर्यंतच्या विद्यार्थ्यांना चित्रकला शिकवतात.


कोणकोणत्या कला रसिकांनी खरेदी केली चित्रे?

भारतात मुंबईसह महाराष्ट्रभरात या दोघांची चित्रे कलाप्रेमींनी खरेदी केली आहेत. त्याचबरोबर अमेरिका, लंडन, मलेशिया येथील कला प्रेमींनी देखील त्यांची चित्रे खरेदी केली आहेत. आजपर्यंत मिळालेल्या पैशातून अनेक सामाजिक संस्था तसेच तत्सम संस्थांना आर्थिक मदत देखील केली आहे.



सध्या कुठे सुरू आहे चित्र प्रदर्शन?

वरळीच्या नेहरू सेंटरमध्ये 31 ऑक्टोबर ते 6 नोव्हेंबरदरम्यान गोकुळ पाटील आणि निलेश पाटील यांच्या चित्रांचे प्रदर्शन भरवण्यात आले आहे. यामध्ये 10 ते 25 हजार रुपये किंमतीच्या 48 चित्रांचा समावेश आहे. ही सर्व चित्रे वास्तवावर आधारित आहेत. हे प्रदर्शन रसिक प्रेक्षकांसाठी सकाळी 11 ते सायंकाळी 7 या वेळेत खुले राहाणार असून ते विनामूल्य आहे.



वास्तववादी चित्रकला निवडण्याचे कारण?

गोकुळ हे मूळचे जळगावचे, तर निलेश निसर्गरम्य अलिबागचे. त्यामुळे ग्रामीण सौंदर्याची जन्मत:च ओढ असलेल्या या दोन्ही कलाकारांनी लुप्त होत असलेल्या ग्रामीण संस्कृतीला चित्ररुपात जतन करण्यासाठी निसर्गाचा आविष्कार असलेल्या वास्तववादी चित्रकलेची निवड केली. आज हजारो चित्रे रेखाटली असून त्यांनी अनेक चित्रे विकलीदेखील आहेत. पण विषय मात्र निसर्ग आणि वास्तववादी ग्रामीण जीवन हाच ठेवलेला आहे. या चित्रांमध्ये धनगर कुटुंब, कोळ्यांची होडी, किल्ला, कोकणातील निसर्गरम्य दृश्य, ग्रामीण भागातील सकाळ असे एक ना अनेक विषय हाताळलेले पाहायला मिळतात.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा