स्टेंटच्या नावाने रूग्णांची लूट ?

 Mumbai
स्टेंटच्या नावाने रूग्णांची लूट ?

मुंबई - स्टेंटच्या किंमती सर्वसामान्यांच्या आवाक्यात आल्या तरी रूग्णांची आर्थिक लूट मुंबईतील रूग्णालयांकडून सुरू असल्याच्या तक्रारी अन्न आणि औषध प्रशासन(एफडीए) विभागाला प्राप्त झाल्या आहेत. नामांकित लिलावतीसह केईएम रूग्णालयाविरोधात या तक्रारी आहे. या तक्रारीनुसार एफडीएने या दोन्ही रूग्णालयांची चौकशी केली असता तक्रारीत काहीही तथ्य आढळले नसल्याची माहिती एफडीएच्या सहआयुक्त (औषध) विनिता थॉमस यांनी दिली आहे.

एकीकडे रूग्णांच्या तक्रारी येत असताना दुसरीकडे चौकशीत काही हाती लागत नसल्याने खरंच रूग्णांची लूट सुरू आहे का याबाबत संभ्रम निर्माण झाला आहे. 14 फेब्रुवारीपासून स्टेंटच्या किंमती कमी झाल्याने हृदयाचा आजार असलेल्या रूग्णांना मोठा दिलासा मिळाला आहे. सुरूवातीला स्वस्त स्टेंट उपलब्ध नसल्याने रूग्णांची गैरसोय झाली होती. पण, आता नव्या किंमतीतील स्वस्त स्टेंट उपलब्ध झाले आहेत. पण तरीही रूग्णांना अॅन्जिओप्लास्टीसाठी दीड ते अडीच लाख द्यावेच लागत असल्याच्या तक्रारी होत्या. त्यामुळे एफडीए आणि केंद्र सरकारने विशेष हेल्पलाईन सुरू करत तक्रारदारांना पुढे येण्याचे आवाहन केले होते. त्यानुसार एफडीएकडे मुंबईतील लीलावती आणि केईएम रुग्णालयाबद्दल तक्रारी प्राप्त झाल्या होत्या. पण, चौकशीत अशी लूट झालीच नसल्याचे समोर आल्याचे एफडीएचे म्हणणे आहे.

कार्डीयाक स्टेंटच्या किंमती नियंत्रणात आहेत, पण शस्त्रक्रियेसाठी लागणाऱ्या इतर वैदयकिय उपकरणांच्या किंमतींवर नियंत्रण नाही. त्यामुळे इतर वैदयकिय उपकरणांचा वापर या शस्त्रक्रियेसाठी केला जात असेल आणि त्यामुळे शस्त्रक्रियेचा खर्च वाढत असेल तर त्यावर नियंत्रण आणता येत नसल्याचे थॉमस यांनी स्पष्ट केले आहे.

त्यामुळे आता रूग्णालय इतर वैदयकीय उपकरणांच्या आडून तर रूग्णांची लूट करत नाहीत ना असा प्रश्न निर्माण झाला आहे.

तक्रारी आल्या, पण तक्रारदार नॉट रिचेबल

एफडीएकडे आलेल्या तक्रारीनुसार एफडीएने रूग्णालयांची चौकशी केली. पण, तक्रारीत तथ्य आढळले नाही. त्यामुळे तक्रारदारांशी अधिक बोलून काही माहिती घेत खरंच अशी लूट सुरू आहे का हे शोधण्याचा एफडीएचा प्रयत्न आहे. पण, तक्रारदार नॉट रिचेबल असल्याने एफडीएच्या अडचणी वाढल्या आहेत.

Loading Comments