Advertisement

साथीच्या आजारांचं सावट कायम, ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे 3 बळी


साथीच्या आजारांचं सावट कायम, ऑक्टोबरमध्ये डेंग्यूचे 3 बळी
SHARES

पावसाळा संपला तरीही अजून साथीच्या आजारांचं सावट कायम आहे. कारण, गेल्या महिन्यात म्हणजेच ऑक्टोबरमध्ये साथीच्या आजारांमुळे तब्बल 5 बळी गेल्याची नोंद करण्यात आली आहे. यात डेंग्यूमुळे 3 जणांचा बळी गेला आहे. तर, मलेरियाने 1 आणि काविळीमुळे एकाचा बळी गेला आहे.

त्यामुळे बदलत्या वातावरणात ताप, सर्दी, खोकला अशी कोणतीही लक्षणे आढळल्यास त्वरित डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन पालिकेच्या आरोग्य खात्याने केलं आहे.


शहर-उपनगरात 3 हजार 293 डेंग्यूसदृश रुग्ण

पालिकेच्या सार्वजनिक आरोग्य खात्याने दिलेल्या अहवालानुसार 1 ते 31 ऑक्टोबरदरम्यान शहर-उपनगरात 3 हजार 293 डेंग्यूसदृश रुग्ण आढळून आले आहेत. तर, मागील वर्षी ऑक्टोबर महिन्यात 4 हजार 98 रुग्णांची नोंद करण्यात आली होती. ऑक्टोबर महिन्यात डेंग्यूमुळे भांडुपमधील 35 वर्षीय गर्भवतीचा मृत्यू झाला, तिला टीबीसुद्धा झाला होता. हृदयविकाराचा त्रास असलेल्या 50 वर्षीय महिलेचाही डेंग्यूमुळे मृत्यू झाल्याचं अहवालात नमुद करण्यात आलं आहे.

कांदिवली येथील 25 वर्षीय तरुणाचाही डेंग्यूमुळे मृत्यू झाला. हा रुग्ण खासगी रुग्णालयात उपचार घेत होता. त्यानंतर प्रकृती अत्यवस्थ असल्याने त्याला पालिकेच्या रुग्णालयात दाखल करण्यात आले. त्या वेळेस त्याचा मृत्यू झाला. काविळीमुळे मालवणीतील सहा वर्षांच्या मुलाचा मृत्यू झाला. त्याच्यावरही पहिल्यांदा खासगी रुग्णालयात उपचार सुरू होते. नंतर पालिकेच्या रुग्णालयात हलवण्यात आले. याशिवाय, मलेरियाने ग्रँट रोड येथील 72 वर्षीय वृद्धाचा बळी घेतला. तर, ऑक्टोबर महिन्यात स्वाइन फ्लूचे पाच रुग्ण आढळून आले आहेत. सप्टेंबर महिन्यात ही संख्या 33 एवढी होती.


महापालिकेने केलं तातडीने सर्वेक्षण

साथीच्या आजारांच्या बळीनंतर त्या-त्या परिसरात करण्यात आलेल्या आरोग्य सर्वेक्षणात 1 हजार 980 घरांची तपासणी करण्यात आली. त्यात 8 हजार 760 नागरिकांच्या तपासण्या करण्यात आल्या. यात 13 जणांना ताप, सहा जणांना कफ, थंडी आणि तीन जणांना डायरिया आढळून आला. त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. तर मालवणी परिसरात करण्यात आलेल्या आरोग्य सर्वेक्षणात 1 हजार 300 घरांतील 4 हजार 970 लोकांना तपासण्यात आले. त्यात 4 जणांना ताप, दोघांना डायरिया आढळून आला. तर ग्रँट रोड परिसरात करण्यात आलेल्या तपासणीत 517 घरांमधील 1 हजार 710 लोकांच्या तपासण्या करण्यात आल्या.

संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा