Advertisement

ऑक्सिजन पुरवठ्यात आणीबाणी उद्भवू नये यासाठी कार्यपद्धती निश्चित


ऑक्सिजन पुरवठ्यात आणीबाणी उद्भवू नये यासाठी कार्यपद्धती निश्चित
SHARES

कोरोनाच्‍या वाढत्या प्रादुर्भावामुळं रुग्‍णांसाठी ऑक्सिजनची गरज सातत्‍यानं वाढत आहे. या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिका प्रशासनानं मुंबईतील सर्वच रुग्‍णालयांना प्राणवायूचा सुयोग्‍य व काटकसरीनं उपयोग करण्‍याच्‍या सूचना यापूर्वीच केल्‍या आहेत. त्‍यासोबत आता प्राणवायूची कमतरता मुंबई क्षेत्रातील कोणत्याही रुग्णालयास जाणवत असल्‍यास वेळीच प्राणवायू साठा पुरवता यावा, यासाठी बृहन्‍मुंबई महापालिकेनं कार्यपद्धती निश्चित केली आहे. ही कार्यपद्धती प्रशासनातील सर्व संबंधित घटकांसह मुंबईतील सर्व रुग्‍णालयांनी तंतोतंत पाळावी, असे निर्देश महापालिका आयुक्त इकबाल सिंह चहल यांनी प्रशासनाला दिले आहेत.

ऑक्सिजन पुरवठ्याबाबतची कार्यपद्धती

महानगरपालिकेचे प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) यांच्या कार्यालयात एक सांख्यिकी तक्‍ता (डेटा शीट) तयार करून त्यामध्ये विभागनिहाय सर्व खासगी रुग्णालयांची माहिती प्रसिद्ध करावी. या तक्‍त्‍यामध्‍ये सर्व प्रकारच्या कोविड रुग्णालयांची नावे व त्यांना प्राणवायू पुरविणाऱ्या पुरवठादाराचे नाव, त्याचप्रमाणे सदर रुग्णालयामध्ये किती ड्यूरा, जंबो आणि छोटे प्राणवायू सिलेंडर उपलब्ध आहेत, याबद्दलची माहिती समाविष्‍ट करण्‍यात येईल.

ही माहिती महानगरपालिकेच्या विभागीय नियंत्रण कक्षाला तसेच अन्‍न व औषध प्रशासन (FDA) नियंत्रण कक्षाला उपलब्ध करून देण्यात येईल. याव्यतिरिक्त विभाग कार्यालयात इतर रुग्णालय कार्यरत असतील तर त्याबाबतची माहिती विभाग कार्यालय अद्ययावत करतील व प्रमुख अभियंता (यांत्रिकी व विद्युत) यांना eemechsouth.me@mcgm.gov.in या ई-मेलवर अवगत करतील.

ही सुधारीत माहिती विभागीय नियंत्रण कक्षाला तसेच अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्षाला उपलब्ध करुन देण्यात येईल.

प्राणवायूचा पुरवठा रुग्णालयात योग्य वेळेत व्हावा, यासाठी पुढीलप्रमाणे उपाययोजना करण्यात येतील.

अ) रुग्णालयाने प्राणवायूची मागणी पुरवठादाराकडे किमान २४ तास किंवा त्यांच्या करारनाम्याप्रमाणे, यातील जो कालावधी जवळ असेल त्याआधी करावी.
ब) १६ तासामध्ये हा पुरवठा उपलब्ध न झाल्यास रुग्णालय याबाबत विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षाला कळवतील.
क) विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्ष पुरवठादारांशी संपर्क करून प्राणवायूचा पुरवठा वेळेवर होईल, याची खातरजमा करतील. जर विभागातील नियंत्रण कक्षाला कळविल्यानंतर दोन तासांमध्ये प्राणवायूचा पुरवठा करणे शक्य होत नसल्यास विभागातील नियंत्रण कक्ष याबाबत अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्षाला कळवतील.
ड) अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्ष पुरवठादारांशी संपर्क करून प्राणवायूचा पुरवठा वेळेवर होईल, याची खातरजमा करतील. जर अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्ष कळविल्यानंतर दोन तासांमध्ये प्राणवायूचा पुरवठा करणे शक्य होत नसल्यास अन्‍न व औषध प्रशासन नियंत्रण कक्ष याबाबत गरजेनुसार विभागीय समन्वय कार्यकारी अभियंता यांना संपर्क साधतील आणि माहिती देतील.
इ) विभागीय समन्वय कार्यकारी अभियंता हे आवश्‍यकतेनुसार वाहनांमधून रुग्णालयांना प्राणवायूचा पुरवठा करतील आणि याबाबत वरिष्ठांना कळवतील.

३. सर्व वैद्यकीय अधिकारी त्यांच्या अखत्यारितील कोविड रुग्णालयास प्राणवायूचा पुरवठा सुरळीत होण्याकरीता या सूचनांचे पालन करण्यासाठी कळवतील.*

४. त्याचप्रमाणे विभाग कार्यालयातील नियंत्रण कक्षातील अधिकारी संबंधित रुग्णालयाच्या संपर्कात राहून तेथील प्राणवायू सिलेंडर्सची नोंद ठेवतील.

शनिवार १७ एप्रिल रोजी महापालिकेच्‍या ६ रुग्‍णालयांमधून १६८ रुग्‍णांना प्राणवायू उपलब्‍ध असलेल्‍या महापालिकेच्‍याच इतर रुग्‍णालयांमध्‍ये अक्षरशः युद्ध पातळीवर कार्यवाही करुन सुरक्षितपणे स्‍थलांतर‍ित करण्‍यात आले होते. त्‍यानंतर बुधवार २१ एप्रिल रोजी घाटकोपर येथील एच. जे. दोशी घाटकोपर हिंदू सभा रुग्णालयामध्ये ऑक्सिजनचा तुटवडा निर्माण झाला. या रुग्‍णालयातील प्राणवायू साठा काहीसा शिल्लक राहिला होता. यावेळी महापालिकेनं युद्ध पातळीवर परिस्थिती हाताळत या ठिकाणी ऑक्सिजनचा पुरवठा करून दिला.

या २ घटनांच्‍या पार्श्‍वभूमीवर मुंबई महापालिकेनं एक कार्यपद्धतीच सुनि‍श्चित केली आहे. ऑक्सिजन संदर्भात आणीबाणीची परिस्थिती वारंवार रुग्‍णालयांमध्‍ये उद्भवणार नाही, यासाठी निश्चित कार्यपद्धती तयार करण्यात आली आहे. या कार्यपद्धतीची प्रभावी अंमलबजावणी करण्यासाठी उप आयुक्त (विशेष) संजोग कबरे, प्रमुख अभियंता कृष्णा पेरेकर, कार्यकारी अभियंता संजय शिंदे आणि वैद्यकीय अधिकारी डॉ. हरिदास राठोड हे समन्वय अधिकारी म्हणून काम पाहणार आहेत. 

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा