Advertisement

ऑमिक्रॉनला आळा घालण्यासाठी धारावी पॅटर्न पार्ट-२

स्थानिक प्रशासनाकडून याठिकाणी मास टेस्टिंगला सुरुवात झाली आहे. या चाचण्या मोफत केल्या जात आहेत.

ऑमिक्रॉनला आळा घालण्यासाठी धारावी पॅटर्न पार्ट-२
SHARES

मुंबईसह जगभरात कोरोनाचा नवा व्हेरिएंट ऑमिक्रॉनमुळं भितीदायक वातावरण निर्माण झालं आहे. मुंबईतही या ऑमिक्रॉनचे रुग्ण आढळले जात असून, आता मुंबईच्या धारावी परिसरात ही ऑमिक्रॉन बाधा झालेला रुग्ण आढळला. गतवर्षी कोरोनानं मुंबईत प्रवेश केल्यानंतर धारावी परिसर कोरोनाचा हॉटस्पॉट ठरला होता. त्यामुळं पुन्हा अशी स्थिती निर्माण होऊ नये यासाठी महापालिका सतर्क झाली असून तातडीच्या उपाययोजनांची अंमलबजावणी सुरु आहे.

स्थानिक प्रशासनाकडून याठिकाणी मास टेस्टिंगला सुरुवात झाली आहे. या चाचण्या मोफत केल्या जात आहेत. धारावीतील ८० टक्के लोकसंख्या सार्वजनिक शौचालये वापरते. त्यामुळं सार्वजनिक शौचालयांचे दिवसातून ५ ते ६ वेळा सॅनिटायझेशन करण्यात येईल. तसंच याठिकाणी लसीकरणाचा वेग वाढवण्यासाठी मोबाईल व्हॅक्सिन सेंटर्स तैनात करण्यात येणार आहेत. यासोबतच धारावीतील ३५० क्लिनीकची धारावी वॉरियर्सची टीम पुन्हा सक्रिय केली जाणार आहे.

मुंबई महानगरपालिकेच्या कोविड वॉर्ड रुममधून धारावीतील परिस्थितीवर विशेष लक्ष ठेवलं जात आहे. बाहेरच्या देशांमधून धारावीत येणाऱ्या प्रवाशांना ७ दिवसांचे होम क्वारंटाईन सक्तीचं करण्यात आलं आहे. या लोकांची वेळोवेळी चाचणी केली जात आहे.

राज्यात शुक्रवारी नव्या ७ ओमायक्रॉन रुग्णांची नोंद झाली असून यातील ३ रुग्ण मुंबईतील आहेत. यामध्ये धारावीतील एका रुग्णाचा समावेश होता. या रुग्णाने कोरोना लसही घेतलेली नाही. ही व्यक्ती काही दिवसांपूर्वी टांझानियाहून भारतामध्ये परतली होती. त्यानंतर आता या व्यक्तीला ऑमिक्रॉनची बाधा झाल्याचे स्पष्ट झाले आहे.

या व्यक्तीला सध्या अंधेरीच्या सेव्हन हिल्स रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. संबंधित व्यक्तीला कोरोनाची कोणतीही लक्षणे जाणवत नाहीत, मात्र त्याचा अहवाल पॉझिटिव्ह आला आहे. या व्यक्तीच्या संपर्कात दोघेजण आले होते. त्यांचाही माग काढण्यात यश आल्याची माहिती महापालिकेनं दिली होती.

ऑमिक्रॉनचा वाढता धोका लक्षात घेता मुंबईत सतर्कता बाळगली जात आहे. मुंबई पोलिसांनी ओमायक्रनच्या पार्श्वभूमीवर रॅली, मोर्चांना बंदी घातली आहे. ओमायक्रॉनच्या वाढत्या संसर्गामुळे राजकीय पक्षांना मुंबईत रॅली काढण्यास परवानगी नाकारण्यात आली आहे. 

महापालिकेकडून कोरोना चाचण्या वाढवण्यावर भर दिला जात आहे. त्यासाठी महापालिकेकडून तब्बल २० लाख अँटिजेन टेस्ट किटची खरेदी केली जाणार आहे. यासाठी निविदा काढण्यात आल्या असून त्यासाठी अनेक कंत्राटदारांनी त्यासाठी उत्सुकता दर्शविली आहे.

कंत्राटदारांमधील या स्पर्धेमुळं महापालिकेला अँटिजेन टेस्ट किट अवघ्या नऊ रुपयांमध्ये मिळू शकते. तसंच टेस्टनंतर फक्त अर्ध्या तासात अहवाल देण्याची योजनाही पालिकेने आखली आहे. त्यामुळं कोरोनाचा संसर्ग झालेल्या लोकांना ओळखून त्यांना इतरांपासून तातडीनं विलग करणं शक्य होईल.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा