Advertisement

स्तनदा माताही घेऊ शकणार लस

स्तनदा मातांनाही कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे.

स्तनदा माताही घेऊ शकणार लस
SHARES

केंद्र सरकारच्या आरोग्य व कुटुंब कल्याण मंत्रालयानं दिनांक १९ मे २०२१ रोजी निर्गमित केलेल्या सुचनांनुसार, स्तनदा मातांनाही कोविड-१९ प्रतिबंधक लसीकरणाची परवानगी देण्यात आली आहे. त्यानुसार, मुंबईतील शासकीय व महानगरपालिका लसीकरण केंद्रांवर थेट येऊन नोंदणी करणाऱ्या (वॉक इन) स्तनदा मातांना कोविड लस देण्यात येणार आहे.

स्तनदा मातांना लस देताना योग्य त्या मार्गदर्शक सुचनांचं पालन करुन लसीकरण करण्यात येणार आहे. यामध्ये प्रसुती झाल्याचा दिनांक, स्थळ यांसह आवश्यक वैद्यकीय कागदपत्रं तसेच वैद्यकीय माहिती समवेत बाळगणे आवश्यक आहे.

आठवड्याचे पहिले ३ दिवस म्हणजे सोमवार, मंगळवार, बुधवार या ३ दिवशी थेट येणाऱ्या विविध पात्र नागरिकांना लसीकरण करण्यात येते. त्यामध्ये आता स्तनदा मातांनाही समाविष्ट करण्यात आले आहे. म्हणजेच सोमवार, मंगळवार, बुधवार या ३ दिवशी थेट येणाऱ्या (वॉक इन) स्तनदा मातांचे लसीकरण केंद्रामध्ये जागेवरच नोंदणी करुन लागलीच त्यांना लस देण्यात येईल.

गरोदर स्त्रियांना जर कोविड प्रतिबंधक लस घ्यायची असल्यास त्या स्त्रियांना, त्यांच्यावर उपचार करीत असलेल्या स्त्री रोग तज्ज्ञाने त्यांच्या शीर्षपत्रावर (लेटरहेड), कोविड लस देण्याबाबत तसे लेखी प्रमाणपत्र देणे आवश्यक असेल. हे प्रमाणपत्र गरोदर स्त्रियांनी स्वतः स्त्री रोग तज्ज्ञाकडून प्राप्त केल्यानंतर कोविड लस घेण्याबाबत स्वतःचे संमतीपत्र देखील द्यावे लागेल.

स्त्री रोग तज्ज्ञाचे प्रमाणपत्र आणि संमतीपत्र अशी दोन्ही कागदपत्रं लसीकरण केंद्रावर येताना सोबत आणावी आणि लसीकरण केंद्राकडे सुपूर्द करावी. त्यानुसार, त्यांना कोविड प्रतिबंधक लस देण्याबाबत कार्यवाही करण्यात येईल.

मुंबईत आता कोरोनाची दुसरी लाट ओसरत असल्याचं दिसून येत आहे. मुंबईतील दैनंदिन रुग्णसंख्येत घट होत आहे. सोमवारी मुंबईत कोरोनाचे नवीन १ हजार ५७ रुग्ण आढळले. तर १ हजार ३१२ रुग्ण बरे झाल आहेत. नवीन रुग्णांपेक्षा बरे होण्याची रुग्णांची संख्या रोज अधिक आहे. 

सोमवारी मुंबईत ४८ रुग्णांचा मृत्यू झाला. यामध्ये २६ रुग्ण सहव्याधींनी ग्रस्त होते. मृतांमध्ये ३ रुग्ण ४० वर्षांखालील, १९ रुग्ण ४० ते ६० वयोगटातील आणि २६ रुग्ण ६० वर्षांवरील होते. २८ पुरुष आणि २० महिलांचा मृत्यू झाला. मृतांचा एकूण आकडा आता १४ हजार ६७१ झाला आहे. 



हेही वाचा - 

मुंबईतील तीन कोविड सेंटर १ जूनपर्यंत बंद, नवीन रुग्णांना प्रवेश नाही

कोरोनातून बरी होऊन बंगळुरुहून मुंबईला परतली दीपिका

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा