Advertisement

मुंबईत १ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण

घरोघरी लसीकरणाच्या मुद्‌द्यावर सुरुवातीपासून उच्च न्यायालयाने आग्रही भूमिका घेतली होती. घरोघरी लसीकरणाचा गांभीर्यांने विचार करा, अशा सूचना न्यायालयाने मुंबई महापालिका व राज्य सरकारला दिल्या होत्या

मुंबईत १ ऑगस्टपासून घरोघरी लसीकरण
SHARES

अंथरुणाला खिळलेले व घराबाहेर पडू न शकणारे ज्येष्ठ नागरिक व विकलांग व्यक्तींना त्यांच्या घरात जाऊन कोरोनाची लस देण्याचा निर्णय राज्य सरकारने घेतला आहे. यानुुसार १ ऑगस्टपासून मुंबईतून घरोघरी लसीकरण उपक्रमाला सुरुवात होणार आहे. राज्याचे महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी उच्च न्यायालयात ही माहिती दिली.

 मुख्य न्यायमूर्ती दिपांकर दत्ता आणि न्यायमूर्ती गिरीश कुलकर्णी यांच्या खंडपीठासमोर याबाबतच्या याचिकेवर सुनावणी झाली. यावेळी महाधिवक्ता आशुतोष कुंभकोणी यांनी १ ऑगस्टपासून मुंबईत घरोघरी लसीकरण सुरु करण्यात येईल, अशी माहिती दिली आहे. तर या लसी महापालिकेतर्फे देण्यात येणार असून त्या मोफत असणार आहेत, अशी माहिती मुंबई महापालिकेतर्फे ज्येष्ठ वकील अॅड. अनिल साखरे यांनी दिली.

घरोघरी लसीकरणाच्या मुद्‌द्यावर सुरुवातीपासून उच्च न्यायालयाने आग्रही भूमिका घेतली होती. घरोघरी लसीकरणाचा गांभीर्यांने विचार करा, अशा सूचना न्यायालयाने मुंबई महापालिका व राज्य सरकारला दिल्या होत्या. त्यानंतर मुंबई महापालिकेने अशी मोहिम सुरु करण्याची तयारी दर्शवली व त्यानुसार पालिकेने तयारीही सुरु केली होती.

वेगवेगळ्या सोशल मीडियाच्या माध्यमातून आणि वर्तमानपत्रांमध्ये जाहिराती देऊन प्रतिसाद मागवल्यानंतर मुंबईत ३,५०५ जणांनी प्रतिसाद दिला आहे. हा चांगला प्रतिसाद आहे. त्यामुळे मुंबईतून हा उपक्रम सुरू करण्यात येईल अशी माहिती महाधिवक्ता कुंभकोणी आणि अनिल साखरे यांनी दिली.

अंथरुणाला खिळलेल्या नागरिकांचे लसीकरण करण्यासाठी पालिकेने एक ईमेल आयडी तयार केला असून यावर गरजूंनी माहिती पाठवावी, असे आवाहन केले आहे. या माहितीच्या आधारे पालिका टप्प्याटप्प्याने या गटातील नागरिकांचे लसीकरण करणार आहे.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा