Advertisement

चुकीचे लेबलिंग असलेल्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा साठा एफडीएकडून जप्त


चुकीचे लेबलिंग असलेल्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा साठा एफडीएकडून जप्त
SHARES

प्रसुतीदरम्यान महिला आणि जनावरांसाठी वापरण्यात येणाऱ्या ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा मोठा साठा नुकताच अन्न आणि औषध प्रशासना (एफडीए)च्या ठाणे विभागाने जप्त केला आहे. औषध आणि सौंदर्य प्रसाधन कायद्यानुसार औषधांवर-इंजेक्शनवर योग्य ते लेबलिंग असणे बंधनकारक आहे. असे असताना या इंजेक्शनच्या लेबलिंगमध्ये उत्पादकाने कायद्याचे उल्लंघन केल्याची धक्कादायक बाबही एफडीएच्या या कारवाईतून उघड झाली आहे.

लेबलिंग योग्य नसणे ही गंभीर बाब असल्याचे म्हणत तज्ज्ञांनी ही औषधे बनावट असण्याची शक्यता व्यक्त करतानाच ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा हा काळाबाजार असण्याची शक्यताही व्यक्त केली आहे. त्यामुळे या इंजेक्शनचा वापर करताना डॉक्टरांसह रुग्ण आणि रुग्णांच्या नातेवाईकांनी योग्य ती काळजी घेण्याची गरज निर्माण झाली आहे.


काय आहेत ऑक्सिटोसीनचे दुष्परिणाम?

प्रसुतीदरम्यान महिला आणि जनावरांसाठी वापरण्यात येणाऱ्या या इंजेक्शनचा मोठ्या प्रमाणावर गैरवापर होतो. कारण, इंजेक्शन दुभत्या गाई-म्हशींना दिल्यास दूध वाढते. त्यामुळे, तबेल्यावाल्यांकडून असे इंजेक्शन गाई-म्हशींना मोठ्या प्रमाणात दिले जात असून त्याचा दुष्परिणाम गाई-म्हशींवर होत असल्याचे निदर्शनास आले आहे. त्याचवेळी ऑक्सिटोसीन इंजेक्शन दिलेल्या गाई-म्हशींचे दूध पिणे हे लहान मुलींसाठी घातक ठरू शकते. कारण, यामुळे ऑक्सिटोसीन हार्मोन्सवर परिणाम होऊन मुली लवकर वयात येण्याची दाट शक्यता असते.

यामुळेच, या इंजेक्शनच्या विक्रीचे नियम अत्यंत कडक करत दुभत्या गाई-म्हशींसाठी ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा वापर करण्यावर प्रतिबंध घालण्यात आले आहेत. त्यानुसार, या इंजेक्शनची विक्री खुल्या बाजारात करण्यावर बंदी असून स्त्री रोग तज्ज्ञ, तसेच जनावरांच्या डॉक्टरांनाच या इंजेक्शनची विक्री औषध विक्रेत्यांकडून केली जाणेही बंधनकारक आहे.

असे असताना ठाणे पश्चिम येथील मे. लाईफ केअर मेडिको या औषध दुकानातून एफडीएने ऑक्सिटोसीन इंजेक्शनचा साठा जप्त केला आहे. या इंजेक्शनवर कायद्यानुसार सर्व माहिती असलेले लेबलिंग करणे बंधनकारक आहे. असे असताना जप्त करण्यात आलेल्या इंजेक्शनच्या साठ्यातील 1 एमएलच्या इंजेक्शनवर 'नॉट फॉर ह्युमन युज, फॉर अॅनिमल ट्रीटमेन्ट ओन्ली' असे लेबलिंग होते. मात्र, त्याचवेळी त्यावर जनावराचा चेहरा असणे गरजेचे असताना असा चेहरा या लेबलवर नव्हता. जनावरांच्या वापरासाठी हे इंजेक्शन असल्याचे बोलले जात असताना 'डोस-अॅज डिरेक्टेड बाय फिजिशियन' असे नमूदही केले होते.

तर, दुसरीकडे इंजेक्शनच्या मोठ्या बाटल्यांवरील लेबलवर हे इंजेक्शन कुणासाठी आहे? आणि कुणाच्या सल्ल्याने घ्यावे? हा मजकुरच गायब होता. तर जनावरांचा चेहराही नव्हता. त्यामुळे हा साठा जप्त करत यासाठी प्रतिबंधित केला आहे. तर उत्पादकांनी त्वरीत या इंजेक्शनचे उत्पादन थांबवावे तर वितरकांनी इंजेक्शनचे वितरण थांबवावे यासंबंधीची कारवाईही एफडीएकडून करण्यात आल्याची माहिती एफडीएतील वरिष्ठ अधिकाऱ्याने दिली आहे. दरम्यान, उत्पादक पंजाबचा तर वितरक उत्तर प्रदेशचा असल्याने संबंधित राज्याच्या औषध नियंत्रकांनी या कंपन्यांविरोधात त्वरीत कारवाई करावी, यासंबंधी कळवण्यात आल्याचेही या अधिकाऱ्याने सांगितले आहे.


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा