खराब वातावरणामुळे या आजारांची तीव्रता वाढण्याची शक्यता आहे. त्यामुळे सर्वसामान्यांनी आरोग्याची काळजी घ्यावी, गार पदार्थांचे अति प्रमाणामध्ये सेवन करू नये.
सार्वजनिक आणि खासगी रुग्णालयांमध्ये ताप, पोटदुखी, अंगदुखी, त्वचेला पुरळ येण्यासह टॉन्सिल्सचा त्रास जाणवणाऱ्या बालरुग्ण्यांच्या संख्येत वाढ झाली आहे. उष्म्यामुळे संसर्ग होण्याची शक्यता असलेल्या विषाणूंचा प्रादुर्भाव वाढतो. त्यांना योग्यवेळी प्रतिबंध केला नाही, तर त्यामुळे आजारांची तीव्रता वाढते.
मधुमेहाचा विकार असणाऱ्या रुग्णांना उन्हाळ्यामध्ये प्रमाणापेक्षा अधिक लघवी होते. उन्हाळ्यामध्ये घाम आणि मूत्रविसर्जनाच्या माध्यमातून अधिक प्रमाणात पाणी शरीराबाहेर टाकले जाते. परंतु त्या तुलनेत पाणी प्यायले जात नाही. त्यामुळे अशक्तपणा, चक्कर येण्यासारखा त्रास सुरू होतो.
अनेक रुग्णांची रोगप्रतिकारकशक्ती कमी असते. अशा रुग्णांना संसर्ग होण्याची शक्यता अधिक असते. त्यामुळे त्यांनी उष्मा वाढण्याच्या दिवसांमध्ये काळजी घ्यायला हवी. लहान मुले, गर्भवती स्त्रिया यांनी कोणत्याही प्रकारचा संसर्ग होईल अशा वातावरणामध्ये जाऊ नये, गर्दीच्या जागा टाळाव्यात.
उन्हाळ्याच्या कालावधीत पाणी कमी प्यायल्यामुळे मूत्रमार्गातील संसर्ग वाढतो. हा संसर्ग टाळण्यासाठी शीतपेये अतिरिक्त प्रमाणामध्ये पिऊ नयेत. डॉक्टरांचा सल्ला न घेता प्रतिजैविके घेतल्यामुळे मूत्रपिंडाच्या कार्यावरही परिणाम होऊ शकतो, हे लक्षात ठेवायला हवे.