Advertisement

राज्य सरकार मेडिकल स्टाफचा आरोग्य विमा काढण्याच्या विचारात

कोरोना व्हायरस विरोधात लढा देणाऱ्या मेडिकल स्टाफचा राज्य सरकार आरोग्य विमा काढण्याचा विचार करत आहे.

राज्य सरकार मेडिकल स्टाफचा आरोग्य विमा काढण्याच्या विचारात
SHARES

कोरोना व्हायरसच्या रुग्णांची सेवा करणाऱ्या मेडिकल स्टाफचा आता विमा उतरवला जाणार आहे. राज्य सरकार अशा मेडिकल स्टाफचा आरोग्य विमा काढण्याचा विचार करत आहे. आरोग्य मंत्री राजेश टोपे यांनी फेसबूक लाइव्हच्या माध्यमातून यासंदर्भातील माहिती जारी केली आहे. एवढेच नव्हे, तर कोरोना विरोधात सैनिकांप्रमाणे लढणारे डॉक्टर, नर्स आणि मेडिकल स्टाफला इंसेंटिव्ह देण्याची योजना सुद्धा तयार केली जात आहे असं राजेश टोपे म्हणाले आहेत.


रुग्णांनी कुठं जावं?

कोरोना व्हायरस रुग्णांवर उपचार करत असताना वैद्यकीय कर्मचाऱ्यांनी आपले प्राण पणाला लावले आहेत. यासोबतच, काही खासगी डॉक्टरांनी आपल्या क्लिनिक आणि सामान्य आरोग्य सेवा बंद केल्याचं देखील निदर्शनास आलं आहे. कोरोनाच्या भीतीनं त्यांनी सामान्यांना आरोग्य सेवा देणं सुद्धा बंद केलं आहे. केवळ ओपीडीच नव्हे, तर आपातकालीन सेवा सुद्धा त्यांनी बंद केल्या आहेत. अशा खासगी डॉक्टरांनी कृपया आपल्या सेवा सुरूच ठेवाव्यात असं आवाहन आरोग्य मंत्र्यांनी यावेळी बोलताना केलं.

खासगी डॉक्टरांची ही वागणूक चुकीची आहे. कुठलाही आजार झाल्यास रुग्णांनी कुठे जावं? एखाद्या गर्भवती महिलेची डिलिव्हरी होणार असेल तर त्यांनी कुठे जावं? एखाद्याला हार्ट अटॅक आल्यावर त्यांनी कुणाची मदत घ्यावी? वैद्यकीय सेवा ही एक पवित्र सेवा आहे. त्यामुळे, ती बंद करता कामा नये. संकटाच्या काळात रुग्णांना असंवेदनशीलता दाखवू नका.


रक्तदान करण्याचं आवाहन

दरम्यान, राज्यात एकूण ४ हजार २२८ संशयितांची चाचणी झाली. त्यापैकी ४ हजार ०१७ रुग्णांचे अहवाल निगेटिव्ह आले आहेत. तर १९ रुग्ण बरे झाल्यानंतर त्यांना डिस्चार्ज सुद्धा देण्यात आला आहे. राज्यातील विमानसेवा स्थगित करण्यात आल्या आहेत. कोरोनाव्हायरसचा प्रादुर्भाव परदेशातून येणाऱ्या रुग्णांपासून होत आहे. आता संक्रमित झालेल्यांवर उपचार कसे करावे आणि त्यांना बरे करून घरी कसे पाठवावे यावर सरकार भर देत आहे. यासोबतच, कोरोना आणि लॉकडाउनमुळे राज्यात रक्ताचा तुटवडा निर्माण झाला आहे. त्यामुळे सर्वांनी रक्तदान करण्यासाठी पुढाकार घ्यावा असं आवाहन राजेश टोपे यांनी केलं.




संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा