Advertisement

२०० मेट्रीक टन वाढीव आॅक्सिजनसह टँकर्सही द्या, महाराष्ट्राची केंद्राकडे मागणी

महाराष्ट्र कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची देखील आवश्यकता भासत आहे.

२०० मेट्रीक टन वाढीव आॅक्सिजनसह टँकर्सही द्या, महाराष्ट्राची केंद्राकडे मागणी
SHARES

महाराष्ट्र (maharashtra) कोरोनाच्या दुसऱ्या लाटेला तोंड देत असून राज्यातील १६ जिल्ह्यांमध्ये रुग्णसंख्या वाढत असल्याने त्यांच्या उपचारासाठी ऑक्सिजनची देखील आवश्यकता भासत आहे. त्यामुळे राज्यात ऑक्सिजन मागणी वाढत असून केंद्र शासनाकडून सध्या होत असलेल्या पुरवठ्यात २०० मेट्रीक टन ऑक्सिजनचा वाढीव पुरवठा करण्यात यावा. लिक्विड ऑक्सिजनच्या वाहतुकीसाठी १० टॅंकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत, अशी मागणी राज्याचे मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिव राजीव गौबा यांना पत्र पाठवून केली आहे.

वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (uddhav thackeray) यांच्याकडून सातत्याने ऑक्सिजन, रेमडेसिवीर, रुग्ण शय्या यांचा आढावा घेतला जात आहे. राज्याला वाढीव ऑक्सिजनची गरज असून त्याबाबत केंद्र शासनाकडे मागणी करण्याबाबत मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी मुख्य सचिवांना निर्देश दिले होते. त्यानुसार मुख्य सचिव सीताराम कुंटे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळ सचिवांना पत्र पाठवलं आहे.

राज्यात सध्या ६ लाख ६३ हजार ७५८ सक्रिय रुग्ण आहेत. त्यातील ७८ हजार ८८४ रुग्ण ऑक्सिजनवर असून २४ हजार ७८७ रुग्णअतिदक्षता विभागात उपचार घेत आहेत. राज्यातील पालघर, रत्नागिरी, सिंधुदूर्ग, सातारा, सांगली, कोल्हापूर, सोलापूर, नंदूरबार, बीड, परभणी, हिंगोली, अमरावती, बुलडाणा, वर्धा, गडचिरोली आणि चंद्रपूर या १६ जिल्ह्यांमध्ये सातत्याने सक्रिय रुग्ण संख्या वाढत असल्याने ऑक्सिजनच्या मागणीतही वाढ होत आहे. प्रत्येक जिल्ह्यात ऑक्सिजन ऑडीट केलं जात असल्याचं मुख्य  सचिवांनी या पत्रात म्हटलं आहे.

हेही वाचा- स्पुटनिक लस राज्यात आणणार, किंमतीवर चर्चा सुरू- राजेश टोपे

नियोजन कागदावर

राज्यात ऑक्सिजनची वाढती मागणी आणि गरज लक्षात घेता सध्या केंद्र शासनाकडून होत असलेल्या ऑक्सिजन पुरवठ्यात २०० मेट्रीक टनांची वाढ करण्यात यावी. ऑक्सिजन लिफ्टींगची सुविधा राज्याच्या सोयीची असावी. यापूर्वी नेमून दिलेले ओडीशा येथील आरआयएनएल, विझाग आणि जिंदाल स्टिल येथील ऑक्सिजन उपलब्धतेचं नियोजन कागदावर राहिलेलं आहे.

जवळून पुरवठा हवा

सध्या गुजरात जामनगर येथून दिवसाला १२५ मेट्रीक ऑक्सिजन पुरवठा होत असून त्यात १०० मेट्रीक टनाने वाढ करून दिवसाला २२५ मेट्रीक टन आणि भिलाई येथून २३० मेट्रीक टन पुरवठा व्हावा, अशी विनंतीही मुख्य सचिवांनी केली आहे. भौगोलिकदृष्ट्या ही दोन्ही ठिकाणे महाराष्ट्राच्या जवळ असून त्यामुळे वाहतुकीचा कलावधी कमी होण्यास मदत होतानाच रुग्णांना वेळेवर ऑक्सिजन देण्यासाठी मदत होईल, असंही त्यांनी म्हटलं आहे.

टॅंकर्सही द्या

लिक्विड ऑक्सिजन वाहतुकीसाठी सिंगापूर, दुबई व अन्य देशांतील तेल उत्पादक कंपन्यांकडून केंद्र शासनाला आयएसओ टॅंकर्स  मिळाले आहेत. त्यातील किमान १० टॅंकर्स महाराष्ट्राला उपलब्ध करून द्यावेत. जेणेकरून ओडीशातील अंगुल येथून रोरो सेवेच्या माध्यमातून लिक्विड ऑक्सिजन आणणं सोपं होईल, असंही मुख्य सचिवांनी या पत्रात म्हटलं आहे.

(maharashtra needs more 200 metric ton oxygen)


संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा