Advertisement

कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती; नियमांची कठोर अंमलबजावणी


कोरोनाच्या तिसऱ्या लाटेची भीती; नियमांची कठोर अंमलबजावणी
SHARES

मुंबईसह आसपासच्या परिसरात कोरोनाच्या रुग्णांच्या संख्येत हळूहळू वाढ होत आहे. ही वाढ लक्षात घेता व कोरोना साथीच्या तिसऱ्या लाटेची भीती, ‘डेल्टा’चा प्रादुर्भाव आणि संसर्गाला अटकाव या उद्देशाने सध्याच्या प्रतिबंधात्मक नियमांची कठोर अंमलबजावणी करण्याचे निर्देश मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल सिंह चहल यांनी सोमवारी अधिकाऱ्यांना दिले. ५ पेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास संबंधित इमारत प्रतिबंधित करा, मास्कविना फिरणाऱ्यांविरोधातील दंडात्मक कारवाई आणखी तीव्र करा आणि चाचण्यांचे प्रमाण वाढवा, असे आदेश आयुक्तांनी महापालिका अधिकाऱ्यांना दिले.

तिसऱ्या लाटेच्या शक्यतेच्या पार्श्वभूमीवर पालिका आयुक्त चहल यांनी पालिका अधिकाऱ्यांची आढावा बैठक सोमवारी घेतली. दूरदृश्य प्रणालीद्वारे आयोजित या बैठकीला अतिरिक्त पालिका आयुक्त अश्विनी भिडे, पी. वेलरासू, डॉ. संजीव कुमार, सुरेश काकाणी यांच्यासह पालिका अधिकारी, तज्ज्ञ डॉक्टर, पालिका रुग्णालयांचे अधिष्ठाता आणि मुंबई पोलीस दलातील अधिकारी उपस्थित होते.

इमारतीत ५ किंवा त्यापेक्षा अधिक रुग्ण आढळल्यास ती प्रतिबंधित करण्यात येते. या नियमाची अंमलबजावणी अधिक प्रभावीपणे आणि कठोरपणे करण्याचे निर्देश महापालिका आयुक्तांनी दिले. त्यामुळं संबंधित इमारतींमधील नागरिकांची काही प्रमाणात गैरसोय होऊ शकते. तथापि, कोरोना प्रतिबंधाच्या दृष्टीने हे गरजेचे असून, यासाठी सर्व संबंधितांनी सहकार्य करावे, असे आवाहन महापालिका प्रशासनाने केले आहे.

मुंबई महापालिकेची सर्व रुग्णालये आणि जम्बो कोरोना रुग्णालये यांना सतर्क आणि सुसज्ज राहण्याचे निर्देश देण्यात आले आहेत. सर्व रुग्णालयांमधील खाटा, रुग्णवाहिका, मनुष्यबळ, आवश्यक साधनसामग्री, औषधोपचार विषयक बाबी, औषधांचा साठा इत्यादी बाबींचा आढावा घेऊन संभाव्य गरजेनुसार अद्ययावत करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

महापालिकेच्या सर्व २४ विभागांमध्ये कार्यरत असणारे नियंत्रण कक्ष अद्ययावत करावेत आणि तेथील मनुष्यबळ, तांत्रिक सेवा-सुविधा इत्यादी बाबींचा आढावा घेऊन गरजेनुसार आवश्यक त्या सुधारणा करण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले. सार्वजनिक शौचालयांचे आणि महापालिकेच्या सर्व रुग्णालयांमधील शौचालयांचे दिवसांतून ५ वेळा र्निजतुकीकरण करण्याची सूचनाही त्यांनी केली.

मास्कविना फिरणाऱ्यांविरोधातील दंडात्मक कारवाई आणखीतीव्र करण्याचे निर्देश आयुक्तांनी २४ प्रशासकीय विभागांना दिले. त्यासाठी आवश्यकतेनुसार ‘क्लिन-अप मार्शल’ची तात्पुरती नियुक्ती करण्याचे निर्देशही त्यांनी दिले.  मुखपट्टीविना फिरणाऱ्यांविरोधातील कारवाई आणखी कठोर करण्याच्या सूचनाही आयुक्तांनी मुंबई पोलिसांना केल्या.

मुंबईत २६६ कोरोना चाचणी केंद्रे कार्यान्वित करण्यात आली आहेत. ज्यांना कोरोनाची लक्षणे असतील, त्यांनी केंद्रांत जाऊन चाचणी करणे आवश्यक आहे. प्रतिबंधित इमारतींमधील सर्व रहिवाशांची टप्प्याटप्प्याने चाचणी करण्याचे निर्देश देण्यात आले आहेत.

प्रवेशबंदी सील करण्यात येणाऱ्या इमारतींमध्ये इतरांना प्रवेश करण्यास मुभा नसेल. त्या इमारतींतील रहिवाशांना बाहेर पडण्यास मनाई असेल. अशा इमारतींमध्ये विविध कामांसाठी येणारे कामगार, वाहनचालक यांनाही या कालावधीत इमारतींमध्ये प्रवेश मिळणार नाही. इमारत सील करण्याविषयीची प्रतिबंधात्मक उपाययोजना अधिक प्रभावीपणे राबविली जावी, यासाठी सर्व टाळेबंद इमारतींच्या प्रवेशद्वारावर पोलीस बंदोबस्त ठेवण्याचे निर्देश आयुक्तांनी दिले.

Read this story in हिंदी or English
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा