Advertisement

केईएम रुग्णालयातील बर्न केअर सेंटरचे उद्घाटन

या केंद्रामध्ये आता पुरुष, महिला आणि मुलांसाठी प्रगत उपचार सुविधा उपलब्ध आहेत.

केईएम रुग्णालयातील बर्न केअर सेंटरचे उद्घाटन
SHARES

परेल येथील महापालिकेच्या अखत्यारित असलेल्या केईएम रुग्णालयातील नूतनीकरण करण्यात आलेल्या बर्न केअर सेंटरचे शनिवारी उद्घाटन करण्यात आले. या केंद्रामध्ये आता पुरुष, महिला आणि मुलांसाठी प्रगत उपचार सुविधा उपलब्ध आहेत.

दरवर्षी सुमारे 150 ते 170 रुग्णांवर उपचार करण्याची क्षमता आहे. रुग्णालय प्रशासनानुसार, या अद्ययावत सुविधांमुळे गुंतागुंतीच्या प्रकरणांचे प्रभावी व्यवस्थापन होणार असून जळीत रुग्णांना सर्वसमावेशक आणि उच्च दर्जाची सेवा मिळणार आहे.

प्रगत सुविधा आणि आयसीयू उपलब्ध

नूतनीकरण केलेल्या केंद्रामध्ये 12 पूर्णतः कार्यक्षम खाटा असून अत्याधुनिक अतिदक्षता विभाग (आयसीयू) उपलब्ध आहे. येथे व्हेंटिलेटर, मल्टी-पॅरामीटर मॉनिटर्स आणि डायालिसिस मशीनसारखी अत्याधुनिक उपकरणे बसवण्यात आली आहेत.

केईएम रुग्णालयाच्या अधिष्ठाता डॉ. संगीता रावत यांनी सांगितले, “या युनिटमध्ये आधुनिक फर्निचर, सुधारित प्रकाशयोजना आणि रुग्णांचा ताण कमी करण्यासाठी दूरदर्शन सुविधा देण्यात आल्या आहेत. संसर्ग टाळण्यासाठी नियंत्रित प्रवेश व्यवस्था ठेवण्यात आली असून रुग्ण आणि कर्मचाऱ्यांची हालचाल सुरळीत राहील, याची विशेष काळजी घेण्यात आली आहे. स्वतंत्र उपचार क्षेत्र तयार करण्यात आले असून आपत्कालीन परिस्थितीसाठी वैद्यकीय पथके सदैव सज्ज असतात. तसेच सर्वसमावेशक सुरक्षितता आणि उपचार प्रोटोकॉल्स अंमलात आणण्यात आले आहेत.”

प्लास्टिक सर्जरी विभागाच्या प्रमुख डॉ. विनिता पुरी यांनी सांगितले,“अशा रुग्णाच्या आयुष्यावर वैद्यकीय, भावनिक आणि सामाजिक पातळीवर खोल परिणाम होतो. केवळ उपचारांपुरते मर्यादित न राहता, बर्न केअर सेंटरचे महत्त्वाचे कर्तव्य म्हणजे रुग्णांना मानसिक आधार, सन्मान आणि नव्या आशेची भावना देणे. सुरक्षित वातावरण आणि करुणामय, सन्मानपूर्वक उपचार देणे हेच आमच्या सेवांचे केंद्रबिंदू आहेत.”



Read this story in हिंदी
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा