Advertisement

तिसरी लाट थोपवण्यासाठी नवी मुंबईत टारगेटेड टेस्टींग

कोणत्याही इमारतीत अगदी 1 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळला तरी त्या इमारतीस हॉटस्पॉ़ट जाहीर करून तेथील सर्व रहिवाशांचे टेस्टींग केले जात आहे.

तिसरी लाट थोपवण्यासाठी नवी मुंबईत टारगेटेड टेस्टींग
SHARES

मागील महिन्याभरापासून नवी मुंबई महापालिका क्षेत्रातील कोरोना बाधितांची कमी होताना दिसत आहे. मात्र जागतिक परिस्थिती लक्षात घेता जपान, इंग्लडसह इतर देशात चौथी लाट आल्याचे आढळून येते. त्यामुळे आपल्याकडे तिसरी लाट येण्याची दाट शक्यता आहे. 

लसीकरणाप्रमाणेच तिसरी लाट थोपवण्यासाठी नवी मुंबई महापालिकेने टारगेटेड टेस्टींगवर भर दिला आहे. नवी मुंबई महानगरपालिका मागील 1 महिन्यापासून टारगेटेड टेस्टींगचे धोरण राबवित आहे. त्यानुसार कोणत्याही इमारतीत अगदी 1 कोरोना पॉझिटिव्ह रूग्ण आढळला तरी त्या इमारतीस हॉटस्पॉ़ट जाहीर करून तेथील सर्व रहिवाशांचे टेस्टींग केले जात आहे. याकरिता संबंधित महापालिका नागरी आरोग्य केंद्राच्या माध्यमातून दैनंदिन कार्यवाही करण्यात येत असून त्यांच्या कार्यक्षेत्रातील हॉटस्पॉटमध्ये टेस्टींग कॅम्प घेण्यात येत आहे. तेथे अँटिजेन टेस्टप्रमाणेच प्राधान्याने कोमॉर्बिड, ज्येष्ठ नागरिक, कोरोना सदृष्य लक्षणे असणा-या व्यक्ती यांची आरटी-पीसीआर टेस्टही करण्यात येत आहे. 

महापालिकेची स्वत:ची अत्याधुनिक लॅब असल्याने 24 तासात तपासणी अहवाल मिळत आहे अशी माहिती महापालिका आयुक्त अभिजीत बांगर यांनी दिली आहे. मात्र, टेस्टींग कॅम्प राबविताना नागरिकांच्या मनात टेस्टींग अनिवार्य का?, मागच्याच महिन्यात टेस्ट केली होती मग आता पुन्हा का?, पॉझिटिव्ह आलो तर काय? अशाप्रकारे टेस्टींगबाबत अनेक शंका उपस्थित होत असल्याचे आढळून आले आहे.

 एखाद्या इमारतीत एक व्यक्ती पॉझिटिव्ह आली तर त्या इमारतीत असलेल्या लिफ्ट, लॉबी, पॅसेज, जिने अशा सार्वजनिक जागांवरून त्या व्यक्तीमार्फत इतरांना कोरोना संसर्ग होण्याची शक्यता जास्त असते. तसेच महत्वाचे म्हणजे कोणतीही लक्षणे न दिसणा-या ज्या पॉझिटिव्ह व्यक्ती टारगेटेड टेस्टींग केल्यामुळे आढळतात, त्यांची टेस्ट झाली नसती तर त्या व्यक्ती विविध ठिकाणी फिरल्यामुळे अनेक व्यक्तींच्या संपर्कात येऊन कोव्हीडचा प्रसारक ठरल्या असत्या. त्यामुळे हॉटस्पॉट क्षेत्रातील टारगेटेड टेस्टींग जलद रूग्णशोधासाठी व कोव्हीडला आहे तिथेच रोखण्यासाठी अत्यंत महत्वाचे आहे हे प्रत्येकाने लक्षात घेणे गरजेचे असल्याचे आयुक्तांनी स्पष्ट केले आहे.

मागील 4 आठवड्यांपासून नवी मुंबई महानगरपालिकेच्या वतीने हॉ़टस्पॉट क्षेत्रातील टारगेटेड टेस्टींग केले जात आहे. काही इमारतींमध्ये तर कोणतीही दृश्य लक्षणे नसणा-या 5 किवा 5 पेक्षा जास्त व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत. ज्यांची लक्षणे नाहीत म्हणून टेस्ट केली गेली नसती आणि त्यांच्यामार्फत कोव्हीडचा प्रसार झाला असता. त्यामुळे कोव्हीडचा विषाणू आहे तिथेच रोखण्यासाठी हॉटस्पॉट क्षेत्रातील टारगेटेड टेस्टींग अत्यंत महत्वाचे असून त्याचे प्रमाण वाढविण्याची गरज आयुक्तांनी अधोरेखित केलेली आहे.

लोकसंख्येच्या तुलनेत कोव्हीड टेस्टींग करण्यामध्ये नवी मुंबई महानगरपालिका राज्यात अग्रभागी आहे. 15 लाख लोकसंख्येच्या तुलनेत 13 लाखाहून अधिक टेस्टींग झालेले असून मागील 15 दिवसात 1 लाखाहून अधिक टेस्टींग केल्याची माहिती देत आयुक्तांनी महानगरपालिकेच्या आरटी-पीसीआर लॅबची क्षमतावृध्दी 5 हजार प्रतिदिन चाचणी इतकी करण्यात येत असल्याचे सांगितले आहे. 

Read this story in English
संबंधित विषय
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा