Advertisement

टक्कल पडलेल्यांनो घाबरू नका, केस उगवण्याचा आलाय नवा फॉर्म्युला


टक्कल पडलेल्यांनो घाबरू नका, केस उगवण्याचा आलाय नवा फॉर्म्युला
SHARES

सध्या तरूणांच्या डोक्यावरचे केसही अकाली झडू लागले आहेत. एक-एक करत गळणाऱ्या केसांकडे जाणीवपूर्णक कानाडोळा केल्यानंतर एकेदिवशी आरशात पाहताना अचानक डोक्यावर टक्कल पडल्याचे जाणवायला लागते. मग सुरू होते धडपड... पुन्हा केस उगवण्याची... अन् आहेत ते टिकवण्याची... मित्रमंडळी आणि वडिलधाऱ्यांकडून मोफतचे सल्ले मिळतात. केमिस्टमध्ये जाऊन विविध तऱ्हेची सौंदर्यप्रसाधने, औषधे आजमावून पाहिली जातात. सरतेशेवटी थकूनभागून त्वचारोग तज्ज्ञाकडे धाव घेतली जाते. डॉक्टरांच्या महागड्या उपचारांतून फार काही हाती लागतेच असेही नाही. पण आता टक्कल पडलेल्यांनी फार निराश होण्याचे कारण नाही. लवकरच बाजारात QR 678 नावाचा फॉर्म्युला येत असून हा फॉर्म्युला डोक्यावरचे गेलेले केस नैसर्गिकरित्या परत उगवण्यासाठी मदत करणार आहे.

टक्कल घालवण्यासाठी मुंबईतील दोन डॉक्टरांनी नवा फॉर्म्युला शोधून काढला असून या फॉर्म्युल्याला जागतिक पातळीवर मान्यता देखील मिळाली आहे. डॉ. देबराज शोम आणि डॉ. रिंकी कपूर या दोघांना या फॉर्म्युल्यासाठी अमेरिकेत पेटंट मिळालं आहे. 2008 मध्ये हा फॉर्म्युला विकसीत करण्यात आला होता. लवकरच हा फॉर्म्युला मुंबईतील बाजारात दाखल होणार आहे.

वैयक्तिकरित्या संशोधन करुन जागतिक पातळीवरचं पेटंट मिळणं तसं कठीण. त्यामुळे पेटंट मिळाल्याचा आम्हाला आनंद झाल्याची प्रतिक्रीया डॉ. शोम यांनी दिली आहे. तसंच या फॉर्म्युल्याची पहिली क्लिनिकल चाचणी देखील झाली आहे. या संशोधनाचा अहवाल एका टॉप मेडिकल जर्नलला पाठविणार असल्याचंही डॉ. शोम यांनी सांगितलं.

डॉ. कपूर आणि डॉ. शोम यांनी बनवलेला QR 678 हा फॉर्म्युला खरंच नावीन्यपूर्ण आहे. टक्कल पडलेल्या जागी इंजेक्शनद्वारे हा फॉर्म्युला त्वचेत टाकला जातो. टकलावरीव उपचाराची ही पद्धत अत्यंत वेगळी आणि उपयुक्त आहे. त्याचसोबत, जगभरात प्रचलित असलेल्या स्टेम सेलच्या उपचार पद्धतीपेक्षा हे तंत्र जास्त परिणामकारक आहे. केसांच्या वाढीसाठी पोषक 5 घटकांच्या कॉम्बिनेशनचा शोध आम्ही लावला आहे. जे त्वचेतच असतात. मात्र त्यांची वाढ थांबलेली असते. त्यांची संख्या इंजेक्शन्सद्वारे वाढवली जाते आणि केसांची नैसर्गिक वाढ होते असं ही डॉ.शोम यांनी सांगितलं.

डॉ. शोम हे सैफी रुग्णालयात फेशिअल प्लास्टिक सर्जन आहेत. तर, डॉ. कपूर कॉस्मेटिक डर्माटॉलॉजिस्ट (त्वचारोगतज्ज्ञ) असून 'द एस्थेटिक क्लिनिक्स'च्या संचालक आहेत. सध्या केस गळतीवर स्टेम सेल्सची उपचार पद्धती वापरात आहे.

डॉ. शोम यांनी स्टेम सेल उपचार पद्धती आणि QR678 या दोन उपचार पद्धतीतला फरक समजावताना सांगितलं की “स्टेम सेल उपचार पद्धतीत डोक्याच्या त्वचेखालील रक्तप्रवाह वाढवण्यावर भर दिला जातो. तर QR 678 हा नैसर्गिकपणेच टाळूच्या त्वचेत असतो. केस वाढण्यासाठी हा घटक कारणीभूत ठरतो. टक्कल पडण्यामागे QR 678 चं प्रमाण कमी होणं, प्रदूषण, अनुवांशिक ही कारणं असू शकतात. आमच्या थेरपीमध्ये, इंजेक्शनद्वारे टाळूत हा घटक सोडला जातो. यामुळे केसांची वाढ होते. तसंच या थेरपीमुळे काही साईड इफेक्टही होत नाहीत. या एका इंजेक्शनची किंमत 6 हजार रुपये आहे. अशा किमान 4 ते 10 इंजेक्शन्सची रुग्णाला आवश्यकता भासू शकेल. ”

अर्थात हा फॉर्म्युला प्रत्येकावर यशस्वी होणार याची खात्री डॉक्टर देऊ शकत नाहीत. ज्यांच्या त्वचेत केसांच्या वाढीसाठी पोषक घटक काही प्रमाणात आधीपासून आहेत, त्यांच्यावर ही उपचार पद्धती यशस्वी ठरेल, असंही डॉ. शोम म्हणतात. त्यासाठी आधी त्वचेची तपासणी केली जाऊन मगच ही उपचार पद्धती करायची की नाही ते डॉक्टर ठरवू शकतील.

टक्कल पडण्याची कारणे -

  • तंबाखू आणि धूम्रपानाचं सेवन
  • अति प्रमाणात दारूचे सेवन केल्याने शरीरातील टॉक्झिनचे प्रमाण वाढते. शिवाय शरीरातून लोह आणि पाण्याची पातळी कमी होते. परिणामी शरीरातील ऑक्सिजनची पातळी कमी होऊन केसांना हानी पोहोचून केस गळू लागतात.
  • अनुवांशिक कारणांमुळे देखील केस गळतात
  • ताणतणाव, हृदयविकार तसेच थायरॉईड यासारख्या आजारांवरील औषधोपचारांचा परिणाम केसांवर होतो आणि केस गळती सुरू होते.
  • आहारात लोह, कॅल्शियमचे प्रमाण कमी झाल्यास त्याचा परिणाम केसांवर होतो.
  • हेअर कलर्स, शॅम्पू किंवा कंडिशनरमध्ये असलेल्या केमिकल्समुळे केस गळतात
  • फंगल इन्फेक्शन तसेच डोक्यात होणारा कोंडा या बाबी देखील केस गळतीला कारणीभूत ठरू शकतात.
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा