Advertisement

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी बीमएसीचं धारावीत अनोखं पाऊल

धारावीत कोरोना लसीकरणाला नागरिकांकडून कमी प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी पालिकेने आता अनोखं पाऊल उचललं आहे.

कोरोनाविरोधातील लढ्यासाठी बीमएसीचं धारावीत अनोखं पाऊल
SHARES

मुंबईतील धारावीत आता पुन्हा एकदा कोरोना रुग्णांची संख्या वाढू लागली आहे. त्यामुळे महापालिका प्रशासनाने धारावी कोरोनामुक्त करण्यासाठी कंबर कसली आहे. धारावीत कोरोना लसीकरणाला नागरिकांकडून कमी प्रतिसाद मिळत असल्याचं दिसून आलं आहे. त्यामुळे लसीकरणाबाबत जनजागृती करण्यासाठी पालिकेने आता अनोखं पाऊल उचललं आहे.

पालिकेने तेलगू,उर्दू, तुलू, हिंदी आदी भाषांमध्ये लसीकरण करून घेण्यासाठी आवाहन करणारी पत्रकं छापली आहेत. धारावीकारांच्या थेट जवळ जाण्यासाठी पालिकेने हा प्रयत्न केला आहे. आशियातील सगळ्यात मोठी झोपडपट्टी म्हणून धारावीची ओळख आहे. धारावीत वेगवेगळ्या भाषिक रहिवाशांचे छोटे छोटे समूह आहेत. या ठिकाणी दक्षिण भारतीय भाषा बोलणारे हजारो रहिवासी आहेत. 

धारावीत तेलगू, तुलू, तामिळ, उर्दू भाषिकांची संख्या मराठी भाषिकांच्या तुलनेत जास्त आहे. त्यांना लसीकरण केंद्रापर्यंत पोहोचवायचं असेल तर त्यांना त्यांच्या मातृभाषेत आवाहन करणं गरजेचं आहे. त्यामुळे पालिकेच्या जी उत्तर प्रभागाने उर्दू, तुलू, तेलगू हिंदी भाषेत पत्रक भिंतीवर चिटकवली आहेत.

धारावीतील लसीकरण केंद्रावर रोज १ हजार लोकांचं लसीकरण करण्याची सोय आहे. म्हणजे तीन दिवसात ३००० जणांचं लसीकरण व्हायलं हवं होतं. मात्र, फक्त २५३ जणांचं लसीकरण करण्यात आलं. त्यामुळे लसीकरण करून घेण्यासाठी पालिकेने इतर भाषांमध्ये पत्रक छापत आवाहन केलं आहे. 

असं लिहिलं आहे या पत्रकात

धारावीत ६० फूट रोडवरील सिविक सुविधा केंद्र म्हणजेच सायन हॉस्पिटलमध्ये कोविड १९ चं लसीकरण केंद्र सुरू केलं जात आहे. ब्लड प्रेशर, मधुमेह किंवा इतर आजार असलेल्या ४५ वर्षांच्या  नागरिकांना आणि ६० वर्षावरील नागरिकांना लस दिली जात आहे. सकाळी ९ ते ५ या काळात लोकांना लस दिली जाणार आहे. आधी वेबसाईटवर रजिस्ट्रेशन करून मग इथे लस दिली जाईल किंवा ज्यांचं रजिस्ट्रेशन झालं नाही अशांना इथे रजिस्ट्रेशनची सोय करण्यात आली आहे तरी या सेवेचा लाभ घ्यावा.

Read this story in हिंदी
संबंधित विषय
Advertisement
‘मुंबई लाइव्ह’च्या ताज्या बातम्यांसाठी सब्स्क्राईब करा